वाह ! उस्ताद
 महा एमटीबी  29-Dec-2017

 
 
लहान मुलांच्या खोड्याच फार असतात. पण कधी कधी त्यांच्या याच खोड्यांमध्ये कदाचित त्यांच्यातील सुप्त कलागुणही दडलेले असू शकतात. मात्र, पालकांना ते ओळखावे लागतात. एकदा का ते ओळखले की, पालकांना त्यांच्या पाल्यांच्या ’त्या’ कलागुणांना योग्य दिशा देण्यासाठी योजना आखता येते. अथर्व लोहारच्या पालकांनीही नेमके तेच केले. अथर्वच्या कलागुणांना वेळीच हेरल्यामुळे अथर्व वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी छोटा ‘उस्ताद’ ठरला आहे.
 
माणूस तर निसर्गातील लहान-लहान लाल मुंग्यांनाही घाबरतो. कारण, त्या दिसायला जरी लहान असल्या तरी चावल्यानंतर रक्त काढू शकतात. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही कमी लेखण्याची चूक आपण करता कामा नये. कारण, पुढे-मागे हीच लहान मुलं कधी, कोणता मोठा पराक्रम करतील, याचा थांग नाही. अथर्वच्या बाबतीतही नेमके हेच घडले. त्याच्या हाताची तबल्यावर अगदी लीलया थिरकणारी बोटं पाहून भले भले तबलावादकही अगदी तोंडात बोटं घालतील. बँकॉकमधील थायलंड येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय ’कल्चरल ऑलिम्पियाड परफॉर्मिंग आर्ट’ या आंतरराष्ट्रीय तबलावादन स्पर्धेत सहा वर्षांच्या अथर्वने चक्क सुवर्णपदकाची कमाई केली. अंबरनाथच्या अथर्वने त्याच्या वयापेक्षा मोठ्या म्हणजे ८ ते १० या वयोगटात हे सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या या कामगिरीमुळे अंबरनाथ शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
 
वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षापासूनच अथर्वला तबल्याचा नाद लागला. त्याआधी मात्र तो घरातील कोणतीही वस्तू घ्यायचा आणि त्यावर मस्त ठेका धरायचा. ही बाब अथर्वची आई शीतल लोहार यांच्या लक्षात आली. स्वतःला ही संगिताची आवड असल्याने त्यांनी साहजिकच अथर्वच्या या कलेला प्रोत्साहन द्यायचे ठरविले आणि तसे प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याच्यातली ही कला हेरूनच त्याच्या आजोबांनी त्याला वाढदिवसाला भेट म्हणून तबला दिला आणि तिथून त्याच्या कलेला वेगळी कलाटणी मिळाली.
 
गुरुशिवाय योग्य ज्ञान नाही. म्हणूनच अथर्वची आई त्याला बर्‍याच संगीत विद्यालयात प्रवेशासाठी घेऊन गेली. मात्र, अथर्व फक्त तीन वर्षांचा असल्याने त्याला संगीत विद्यालयात प्रवेश द्यायला बहुतेकांनी नकार दिला. मात्र, अथर्वच्या आईने धीर न सोडता नाही. अथर्वला कला सादर करण्याची एक संधी द्या आणि मग ठरवा, असे आवाहन अथर्वच्या आईने संगीत विद्यालयांच्या भेटीवेळी संबंधितांना केले. मग काय, असेच एकदा अथर्वने आपले अप्रतिम तबलावादन सादर केले. त्याचे वादन ऐकून आनंदी होऊन सुनिल शेलार यांनी त्यांच्या गुरुकृपा संगीत विद्यालयात अथर्वला प्रवेश दिला. लहान वयातील अथर्वच्या बोटातील जादू बघून शेलार यांनी पुणे येथील अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या राष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत अथर्वला सहभागी होण्यास भाग पाडले. या स्पर्धेत २२ राज्यातील तब्ब्ल सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते आणि अथर्वने या स्पर्धेत लहान मुलांच्या गटातून पहिले पारितोषिक मिळविले. त्यामुळे त्याची ‘कल्चरल ऑलिम्पियाड परफॉर्मिंग आर्ट’ या पाचव्या आंतरराष्ट्रीय तबला वादन स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा थायलंड येथे झाली. मात्र, या स्पर्धेत भारतातून त्याच्या वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले नव्हते. त्यामुळे अथर्वला ८ ते ११ या वयोगटात या स्पर्धेत भाग घ्यावा लागला आणि विशेष म्हणजे त्याने याही वयोगटात सुवर्णपदकाची कमाई केली.
 
अथर्वचे वडील रेल्वे सुरक्षा दलामध्ये कार्यरत आहेत. अथर्वचा मूड आणि शाळा सांभाळून त्याची आई त्याचा तबलावादनाचा सराव घेते. तसेच आठवड्यातून दोन दिवस संगीत शिक्षक त्याच्या घरी जाऊन त्याला तबला शिकवतात. अथर्व सध्या पहिलीत शिकत आहे. तसेच तो इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न करतो. त्याने याच क्षेत्रात नाव कमावावे, असे मत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. तेव्हा, अशा या छोट्या उस्तादाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
 
 
- पूजा सराफ