वैद्य खडीवाले अशीही एक आठवण
 महा एमटीबी  29-Dec-2017
 
 
 
 
साधारणपणे २००५ ची गोष्ट. पुण्याचे माजी आमदार स्व. अरविंद लेले यांच्या चरित्र लेखनाचे काम चालू होते. अशा प्रकारच्या कामाचा कोणताही पुर्वानुभव नसताना हे काम करण्याची जबाबदारी करंबेळकरांनी मला दिली. पुण्यात ज्यांना भेटून डॉ. लेलेंची माहिती जमा करता येईल अशा सुमारे दोनशे लोकांची यादी मिलिंद लेलेंनी माझ्या हाती दिली. तो आधार घेऊन डॉ. लेलेंबाबत माहिती जमा करण्यास सुरूवात केली. दर शनिवार रविवार पुण्यात राहून वेगवेगळ्या व्यक्तिना भेटू लागलो.
 
अशाच एका शनिवारी पूर्वनियोजित वेळ ठरवून नारायण पेठेत वैद्य प. य. खडीवाले यांना भेटायला गेलो. आधीच वेळ ठरवल्यामुळे मला लगेच भेटता येईल असे वाटले होते. मी तडक त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. विवेकचे कार्ड दिले. लाकडी बाकाकडे बोट दाखवत ते म्हणाले 'तिथे बसा तुमचा नंबर आला की बोलू' मी ही त्यांच्या आज्ञेचे पालन करत बाकावर जाऊन बसलो आणि तासाभरांनी बाकावर खुरटत खुरटत वैद्य खडीवाल्याच्या समोर पोहचलो.
 
 
बोला,
 
 
डॉ. लेलेंचे चरित्र लिहितो आहे, तुम्ही त्यांचे मित्र आहात. तुमच्या आठवणी सांगा,
 
भिंतीवरच्या फोटोकडे बोट दाखवत खडीवाले म्हणाले.' या सर्वांना ओळखता का ?
 
मोरोपंत पिंगळे आणि तात्या बापट वगळता मला कुणालाही ओळखता आले नाही. मी ती दोन नावे सांगितली आणि बाकी कुणीही परिचयाचे नाही असे सांगितले.
 
'उठा, चालायला लागा, लायकी नाही तुमची चरित्र लिहिण्याची, आधी सगळी माहीती करून घ्या आणि मग पुस्तक लिहा. निघा आता 'खडीवाले गरजले. मी ही यंत्रवत उठलो आणि निघालो. 'थांबा निघाला कुठे? इथे आलेला पाहुणा चहा कॉफी घेतल्याशिवाय जात नाही.' मला नको आहे' मी थोडा तिरसट झालो.
 
'तुम्हाला हवा की नको हा प्रश्न नाही. इथे येणारा प्रत्येकजण काही तरी घेऊन जातो.' खडीवाले बोलले.
 
'मी ही अपमान घेऊन जातोय' असे मनात म्हणत मी न थांबता बाहेर पडलो. ही वैद्य खडीवाल्यांची पहिली भेट. मनात कायम घर करून रहाणारी. खडीवाल्यांनी ज्या शब्दात बोळवण केली ते शब्द मनाला सारखे सलत राहिले आपली लायकी काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी बेभान होऊन डॉ. लेलेंचे २८० पानाचे चरित्र लिहिले अडवाणीजीच्या हस्ते त्याचे पुण्यात प्रकाशन झाले. पुस्तकाच्या लेखनाची सुरूवात ते प्रकाशन सोहळा हा दोन वर्षांचा प्रसव वेदनेचा काळ होता आणि या दोन वर्षात खडीवाल्यांच्या वाक्याची साथसोबत ही सातत्याने होती. जे लिहायचे ते उत्तम जे आपली लायकी सिद्ध करेल. दोन वर्षाच्या परिश्रमातून डॉ. अरविंद लेलेंचे पुस्तक प्रकाशित झाले.
 
प्रकाशनाच्या दुसऱ्याच दिवशी प्रभादेवी कार्यालयात पुण्याहून फोन आला माझ्यासाठी "मी वैद्य खडीवाले बोलतोय, अरविंदाचे चरित्र तुम्ही उत्तम प्रकारे साकारले आहे. धन्यवाद" फोन बंद.
 
मधल्या काळात वैद्य खडीवाले यांची बरीच माहिती मला मिळाली. त्याचा सेवाभाव, संघनिष्ठा आणि जे ठरवले ते तडीस नेण्याची तळमळ अशा अनेक गोष्टींबरोबरच त्यांचा लिहिता हात लोकसत्ता मधून अनुभवता आला. आर्युवेदासारखा अवघड विषय ते सहजपणे मांडत असत.
 
वैद्य खडीवाले यांच्या निधनाने एक परखड आणि निष्ठावान तपस्वी आपल्यापासून दूर गेला आहे. त्यांना शतशः नमन आणि भावपूर्ण श्रद्धाजंली.
 
 
- रवींद्र गोळे