सीमाभागातील नद्यासंबंधी भारत करणार चीनबरोबर चर्चा
 महा एमटीबी  29-Dec-2017

 
नवी दिल्ली : भारत-चीन या दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीवाटप तसेच इतर मुद्यांसाठी भारत सरकार पुन्हा चीनबरोबर चर्चा करणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये ब्रह्मपुत्रा आणि सीमावर्ती भागातील इतर नद्यांसंबंधी पुन्हा एकदा नव्याने चर्चा करण्यात येईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
 
दरम्यान या चर्चेसाठी भारत सरकारकडून चीनला आमंत्रण देण्यात आले असून नद्यांची सुरक्षा आणि दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे, असे भारताने म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चीनकडून लवकरच उत्तर येईल व दोन्ही देशांमध्ये यासंबंधी चर्चा सुरु होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी वाटपासंबंधी देखील या बैठकीत महत्त्वाची चर्चा होईल, असे सरकारने सांगितले आहे.
 
ब्रह्मपुत्र नदीच्या पाणी वाटपावरून भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरु आहे. अनेक वेळा दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊन देखील यासंबंधी तोडगा अद्याप निघालेला नाही. ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी चीनमध्ये वळवण्यासाठी चीन या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याच्या देखील तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यावर भारताने देखील वारंवारपणे आक्षेप घेतलेला आहे. परंतु चीनने याकडे सातत्याने दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे भारत सरकारचा हा नवीन प्रयत्न कितपत यशस्वी होतो, या बद्दल सध्या अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.