निकामी प्लास्टिक, कॉंक्रिट, रबर यांचा फुटपाथच्या कट्‌ट्यासाठी वापर
 महा एमटीबी  29-Dec-2017
देशाचा आणि राज्याचा विकास जसा होत आहे, त्या प्रमाणात वाया जाणारे आणि उपद्रव होऊ शकणारे घटक मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ प्लास्टिक. प्लास्टिकचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. तात्पुरता वापर करून आपण फेकून दिलेले प्लास्टिक हजार वर्षे तरी नष्ट होत नाही. त्यामुळे जमिनीत मुरणारे पाणी अडविले जाते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. यावर सुचविलेले उपाय फारसे उपयुक्त ठरत नाहीत, असे दिसून येते. निर्माण होणारे प्लास्टिक आणि त्याचा कचरा ही मोठी समस्या आहे आणि भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ती अधिक विक्राळ स्वरूप धारण करीत आहे.
 
 
प्लास्टिकप्रमाणेच जुने घर पाडून नवे घर बांधताना किंवा कोणतीही इमारत बांधताना आधीचे कॉंक्रिट काय करायचे? त्याची विल्हेवाट कशी लावायची का? हा मोठा प्रश्न असतो. बहुधा ते वायाच जाते. ते कुठे फेकायचे याबाबत देखील मोठी समस्या निर्माण होते. अनेक ठिकाणी हा कॉंक्रिटचा कचरा फेकण्यास आक्षेप घेतला जातो. त्या त्या ठिकाणची मनपा किंवा नगरपालिका कुठेतरी त्याची व्यवस्था लावते. मात्र, समस्या सुटत नाही. प्लास्टिक आणि कॉंक्रिट याप्रमाणेच रबराचा देखील खूप मोठा वापर होतो. विशेषतः मोठ्या वाहनांचे टायर, ट्यूब यासाठी वापरलेले रबर काय करायचे हा प्रश्न भेडसावतो. त्याबरोबरच अनेक रबरी वस्तू फेकून दिल्या तरी त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होत असतो. अशा तर्‍हेने या तिन्ही वस्तू मानवी जीवन, पशुपक्षी जीवन आणि एकूणच पर्यावरण यांच्या दृष्टीने एकदा वापरून झाल्या की, धोकादायक ठरतात. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध नेते, शास्त्रज्ञ यांनी याबाबत अनेकदा मते मांडून टाकाऊतून टिकाऊ करण्याबाबत भूमिका मांडली आहे.
 
 
 
 
 
 
पिंपरी-चिंचवड, दापोडी येथील अवघा २२ वर्षीय तरुण उद्योजक वरुण रमेश साळुंखे यांनी आपले बी. ई. सिव्हील शिक्षण पूर्ण केल्यानंतर या दिशेने प्रवास सुरू केला आणि या तिन्हींच्या संयोगातून फूटपाथच्या कडेला लावले जाणारे कट्टे तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. ग्रुवला कन्स्ट्रक्शन ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर ओ. पी. सी. प्रा. लिमिटेड या नावाने त्यांनी कंपनी स्थापन केली असून पुण्यातच या नव्या उत्पादनास सुरुवात केली आहे. पुण्यात साळुंखे भवन दापोडी, पुणे येथे त्यांचे हे कामसुरू आहे. या तीन वेगवेगळ्या वेस्टेज मटेरियलपासून सोल्युशन म्हणून प्लास्टिक, कॉंक्रिट, रबर यांच्या कचर्‍याचे रिसायकलिंग ऍण्ड सोल्युशन प्रोडक्ट कर्ब स्टोन बनविले.
 
 
 
 
 
 
 
फुटपाथसाठी वापरला जाणारा हा कट्टा अनेक दृष्टीने उपयुक्त आहे. हे कट्टे फक्त २ इंच रोवले तरी कामभागते. सध्या लावले जाणारे कट्टे सिमेंटचे असतात. त्यासाठी ६ इंच जमिनीखाली रोवावे लागते. या नव्या तंत्रात मेल-फिमेल सिस्टिम असल्याने, जोडण्यासाठी वेगळे कॉंक्रिट लागत नाही. काढल्यानंतर पुन्हा वापरता येऊ शकते. याचे वजन फक्त १४ किलो आहे, तर सध्या वापरला जाणारा कॉंक्रिटचा कट्टा २५ किलोचा असतो, तसेच यात पाण्याची बचत होते. कॉंक्रिट ७ ते ८ टक्के पाणी शोषते. नवा कट्टा फक्त ०.०३९८ टक्के पाणी शोषण करतो. किमान १५ वर्षे चालून पुन्हा त्यानंतरदेखील रिसायकल होऊ शकतो. हल्ली बनविला जाणारा डांबरी किंवा कॉंक्रिट रस्ता तुटला तर फेकून देतात त्याऐवजी फुटपाथ कट्टा वेस्ट वापरला गेला, तर बांधकाम करताना पुन्हा उपयोगात येऊ शकतो. आय आर सी ८६ : १९८३ डिझाईन टेस्टिंग आय एस ५७५८ : १९८४ नुसार त्याला मान्यता मिळालेली आहे. इंडियन स्टॅण्डर्डनुसार स्वस्त आणि परवडणारे आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येऊ शकणारे विविधप्रकारे वापर करता येईल, असा हा कट्टा आहे. याबरोबरच पेव्हर ब्लॉक, माईल स्टोन, ब्रिक्स, मेन हॉल कव्हर, विविध प्रकारे या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. त्याला रिफ्लेक्टर टेप लावल्यास जास्त टिकते. १७० डिग्री कोनातून लाईट लावला तरी चालते, अपघात टाळू शकतात, वेस्ट वापरून होते, असे अनेक लाभ सांगता येतील. साळुंखे यांनी स्थापन केलेली कंपनी स्टार्टअप मान्यताप्राप्त आहे. विशेष म्हणजे, याचे पेटंट आपलेच आहे, परदेशात असे उत्पादन कोठेच उपलब्ध नाही. डिझाईन आणि प्रक्रिया यांचे पेटंट आहे.
 
 
 
 
 
भारतासारख्या देशात हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त असून वाया जाणारे प्लास्टिक, रबर, कॉंक्रिट वापरण्याची कल्पनाच भन्नाट आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामे सुरू असतात. मनपा, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी बांधकामे यात देखील विविध प्रकारे हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकते. तसा कोणी विचार केला तर तंत्रज्ञान पुरविण्याची साळुंखे यांची तयारी आहे. वाया जाणार्‍या वरील वस्तूंचा चांगला वापर करून त्यांचे दुष्परिणाम रोखता तर येतीलच, तसेच त्यांना किंमत देखील मिळू शकेल. त्याला केंद्र सरकारच्या ’नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया’ची मान्यता देखील मिळालेली आहे. अशा प्रकारचे उत्पादन म्हणजे नव्या भारताची नांदी असून खर्‍या अर्थाने स्टार्ट-अप यशस्वी होत आहे, याची पावतीच म्हणायला हवी. त्यासाठी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. यातून अनेक विकासकामे उभी राहत आहेत. आणखी काही काळानंतर सकारात्मक बदल होणार आहेत, त्याची ही छोटीशी झलक आहे.
 

-पद्माकर देशपांडे