नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूचे गूढ
 महा एमटीबी  29-Dec-2017

१८५७ चा राष्ट्रीय उठाव फसला. या क्रांतीचे प्रणेते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची कैद टाळण्यासाठी नेपाळच्या राजाकडे राजकीय आश्रय देण्याची विनंती केली. उलट इंग्रजांनी नानासाहेबांना असा आश्रय मिळू नये म्हणून नेपाळच्या राजावर जबर दडपण आणले.
 
अशा स्थितीत नेपाळच्या हद्दीत गडाजवळ देवखरी या ठिकाणी ६ ऑक्टोबर १८५८ रोजी नानासाहेबांचा शेवटी तापाने मृत्यू झाला. इंग्रजांना तसे कळविण्यात आले. अधिकृतरित्या प्रकरण संपलं.
 
मात्र, या वार्तेवर इंग्रजांसकट कुणाचाच विश्वास बसलेला नव्हता. १८६१ साली कराचीत हरजीभाई, १८६३ साली अजमेरात आप्पाराम, तर १८७४ साली ग्वाल्हेरात जमनादास गर्क हनवंता हे इसम पकडले गेले. ते नानासाहेब असल्याचा वहीम होता. इंग्रजांनी अर्थातच त्यांची कसून चौकशी केली. पण, आरोप खोटा ठरला.
 
गुजरातेत भावनगरजवळ सिहोर येथेही नानासाहेब गुप्त वेषाने राहात असल्याचा प्रवाद होता. उत्तर प्रदेशात कनोजजवळ सराई मिरान या गावी गंगेच्या किनार्‍याजवळ विश्वनाथ मंदिरात एक बाबा राहात असे. लोक त्याला ‘सराई मिरानचा बाबा’ म्हणूनच ओळखत.
 
काही काळाने म्हणजेच सन १८८५-८६ साली हाच बाबा नैमिषारण्यात जानकीकुंडाजवळ राहायला आला. पुढे काही वर्षांनी तो नैमिषारण्याच्या जवळच्या कैलासन गावी जाऊन राहिला. जानकीकुंड व कैलासन या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे २० वर्षे वास्तव्य झाल्यावर कार्तिक शुद्ध १३ ला तो कैलासन इथेच मरण पावला. लोक त्याला ‘कैलासन बाबा’ किंवा ‘कालिसदन बाबा’ म्हणून ओळखत असत.
 
नैमिषारण्यात ललिता देवीचं देऊळ आहे. त्याची संगमरवरी फरशी या बाबाने बसवली. तसंच त्याने कालिकादेवी आणि शिव अशी दोन मंदिरं त्याने नव्याने बांधली. त्यासाठी त्याने कोणाहीकडून वर्गणी जमवली नव्हती. तरीही तो दर शुक्रवारी मजुरांना पगार देत असे. पैसे कमी पडल्यास तो दाट जंगलात जात असे आणि पैसे घेऊन येत असे. जानकीकुंडापाशी तो सर्वांना विशेषत: मुलांना मिठाई व पैसे वाटत असे.
 
स्थानिक लोकांच्या मते, तो पुण्याकडचा राजा होता. १९५४ साली उत्तर प्रदेश सरकारने १८५७ च्या क्रांतीबद्दल सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीने वरील सर्व साक्षी व हकिकती साक्षेपाने नोंदवून ठेवलेल्या आहेत. नानासाहेब पेशव्यांवर साडेनऊशे पानांचा उत्कृष्ट, साधार ग्रंथ लिहिणार्‍या आनंदस्वरुप मिश्र यांनी त्यांच्या ‘नानासाहेब पेशवा अॅंड फाईट फॉर फ्रीडम’ मध्ये हा सगळा वृत्तांत दिला आहे.
 
यावरुन असाच निष्कर्ष निघतो की, आपल्या मृत्यूची हूल उठवून नानासाहेब नैमिषारण्यात शिरले आणि सुमारे २० वर्षांनी म्हणजे १९०६ साली मरण पावले.
 
आता महाराष्ट्रातले आधुनिक काळातले समर्थ रामदास, म्हणून ज्यांचा गौरव केला जातो अशा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातील वृत्तांत पाहू. या चरित्राचे लेखक प्राचार्य केशवराव बेलसरे हे अतिशय विद्वान असे प्राध्यापक होते व अस्सल साधनांवर आधारित असेच चरित्र त्यांनी लिहिलेले आहे.
 
ब्रह्मचैतन्य महाराज किंवा गणुबुवा यांचा जन्म १८४५ सालचा. वयाच्या १२ व्या वर्षी ते गुरुशोधार्थ घरातून बाहेर पडले. म्हणजे नेमकं १८५७ साल येतं. क्रांतीच्या धामधुमीतच ते उत्तर भारतात सर्वत्र फिरले. मग त्यांना आदेश मिळाला की, येहळेगावला जा. येहळेगाव हे तत्कालीन निजाम संस्थानातील नांदेडजवळचं अगदी आडबाजूचं गाव होतं.
 
या आदेशानुसार गणुबुवा १८५८-५९ च्या सुमारास येहळेगावी तुकाराम चैतन्य या महापुरुषाकडे गेले आणि सुमारे नऊ महिने त्यांच्या सेवेत राहून त्यांनी आत्मज्ञानाचा लाभ करुन घेतला. गणुबुवांचे ‘ब्रह्मचैतन्य’ हे नाव गुरुंनीच ठेवले.
 
मग गुरुआज्ञेप्रमाणे महाराज हिमालयाकडे निघाले. वाटेत काही काळ उज्जैनला घालवून महाराज सरळ नैमिषारण्यात आले. १२५-१५० वर्षांपूर्वी नैमिषारण्य हे एक घनदाट अरण्य असून तिथे सर्व प्रकारची वन्य श्वापदं, अजगरं, नाग वगैरे होते. हे स्थान अत्यंत पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. महर्षि शौनक आदि ८८ हजार ऋषींनी ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार या ठिकाणी तपश्चर्या केली होती. महर्षि व्यासांनी वेद आणि पुराणांची रचना याच ठिकाणी केली व सूताने ऋषींना महाभारताची कथा याच ठिकाणी ऐकवली होती.
 
महाराज या ठिकाणी दोन वर्षं राहिले. आतापर्यंतचा घटनाक्रम ध्यानी घेता, हा कालखंड १८६०-१८६२-६३ असा असावा. या मुक्कामात महाराजांची नानासाहेब पेशव्यांशी गाठ पडली. ते नेपाळमधून नैमिषारण्यात आले होते. महाराजांनी त्यांना अभय देऊन राहण्यासाठी एक मोठी गुहा दाखवली. पुढे नानासाहेबांनी त्या गुहेत बर्‍याच सोयी करुन घेतल्या. निजण्यासाठी पलंग, बसण्यासाठी चांदीच्या कड्यांचा झोपाळा होता. नानासाहेबांचा वेष मात्र बैराग्याप्रमाणे म्हणजे लंगोटी, रुद्राक्षांची माळ, पायात चंदनी खडावा असा होता. त्यांच्याजवळ पुष्कळ जडजवाहीर होतं. दोन सेवक होते. त्यापैकी एक दर आठवड्याला अयोध्येला जाऊन शिधा घेऊन येत असे. पुढे पुण्याला ‘केसरी’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु झाल्यावर, शिध्याबरोबर ते ही येत असे व नानासाहेब नेमाने ‘केसरी’ वाचत असत. त्यांची पत्नी व बाकी कुटुंबीय नेपाळात होते. दरवर्षी ते पशुपतेश्वराच्या दर्शनाला काठमांडूला जात व सर्व कुटुंबीयांना, नेपाळच्या राजाला भेटून येत. पुढे हा नेमबंद पडला.
 
सुरुवातीला हा अज्ञातवास नानासाहेबांना असह्य झाला. आपलं राज्य गेल्याचं दु:ख अनिवार होऊन त्यांना रात्ररात्र झोप येत नसे. याबाबत महाराजांजवळ त्यांनी मार्गदर्शन मागितलं असता, महाराज म्हणाले, ‘‘अशा रीतीने आपलं राज्य जावं, वनवास भोगावा लागावा आणि पुन्हा सैन्य जमवून इंग्रजांशी टक्कर घेण्यास साधनांची अनुकूलता नसावी, ही विधिघटनाच होय. मुसलमानी सत्तेशी झुंजणे आणि इंग्रजी सत्तेशी झुंजणे यात फरक आहे. आता प्रथम देशाचे मन तयार करण्याची जरुरी आहे. ते करायला राजेलोक उपयोगी नाहीत. मध्यम स्थितीतील इंग्रजी विद्या आत्मसात केलेली पुढारी माणसेच योग्य आहेत. यापुढील राजकारणाची दिशा निराळी आणि ते करणारी माणसेही निराळी. ती मंडळी आपापल्या कार्याला आरंभ करीतच आहेत. आपली राजकीय कर्तबगारी आता संपली. आपण आपले उर्वरित आयुष्य भगवंताच्या सेवेत घालवणे हेच उत्तम.’’
 
हे विचार पटायला नानासाहेबांना वेळ लागला, पण एकदा ते पटल्यावर त्यांचं मन शांत झालं. त्यांची उदासीनता आणि कष्टीपणा गेला. त्यांना अभय देऊन महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही निर्धास्त असा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या.’’
 
पुढील काळ नानासाहेबांनी रामनामात आणि ज्ञानेश्वरी, दासबोधाच्या वाचन-चिंतन-मननात घालवला.
 
दि. १५ ऑक्टोबर १९०६ हा दिवस महाराज हर्दा इथे होते. संध्याकाळी चारच्या सुमारास महाराजांनी अचानक भक्त मंडळीबरोबर भांडण उकरुन काढलं आणि ते नैमिष्यारण्यात जायला निघाले. हर्द्याहून लखनौ, तिथून अयोध्या असं झाल्यावर महाराज बरोबर असलेल्या कुर्तकोटी या शिष्याला म्हणाले, ‘‘मी इथून एकटा नैमिषारण्यात जाणार आहे. मला पंधरा दिवस लागतील.’’ तेव्हा कुर्तकोटी हर्द्याला परतले.
 
दि. १४ नोव्हेंबर १९०६ रोजी महाराज नैमिषारण्यांतून प्रयागमार्गे हर्द्याला आले. त्यावेळी त्यांच्याबरोबर एक संन्यासी होते. पुढे चार-पाच वर्षांनंतर महाराजांच्या तोंडून त्यावेळचा वृत्तांत लोकांना समजला.
 
त्यावेळेस नानासाहेबांचं वय ८२ वर्षांचं असावं. गेलं वर्षभर त्यांना क्षीणता जाणवू लागली होती. त्यांना थंडी सोसत नसे. चटकन कफ होत असे. यावेळी त्यांना ताप भरला. छाती कफाने भरली. सहा दिवसांनंतरही ताप उतरेना, तेव्हा हा साधा ताप नाही हे त्यांना कळून चुकलं. ते महाराजांची वाट पाहू लागले. बरोबर सातव्या दिवशी सकाळी महाराज त्यांच्यासमोर उभे राहिले. दृष्टादृष्ट होताच दोघांच्यांही डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. महाराज त्यांना म्हणाले, ‘‘नानासाहेब, आपण जिंकले आहे. आता घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही कशाचाही विचार न करता नामात राहा. भगवंत आपल्या उशाशी आहे.’’ नवव्या दिवशी दुपारी त्यांची अस्वस्थता वाढली. महाराजांनी त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन मुखात गंगा घातली. थोड्या वेळाने डोळे उघडून त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि ‘‘हे राम! महाराज, रामा, चल मी येतो!’’ असे शब्द उच्चारुन प्राण सोडला. महाराजांनी स्वहस्ते त्यांना अग्नी दिला व प्रयागला स्वत: त्यांच्या अस्थि गंगेत टाकल्या.
 
या वृत्तांतावरुन ही घटना १९०६ सालच्या ३०-३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी घडली असावी असं दिसतं.
 
आज घडीला नैमिषारण्य हे दाट जंगल उरलेलं नाही. उत्तर प्रदेशच्या लखनौ-लखीमपूर रस्त्यावर सीतापूर या तालुक्याच्या गावापासून ४० कि.मी पश्चिमेकडे नैमिषारण्य-मिश्रिख ही तीर्थक्षेत्राची गावं लागतात. ही गावं उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन यादीवर असल्यामुळे, ती पाहण्यासाठी भरपूर देशी-विदेशी पर्यटक जात असतात. गोमती नदीच्या तीरावर वसलेली ही प्राचीन तीर्थक्षेत्रं नैसर्गिकदृष्ट्या सुंदर आहेत. मात्र, नानासाहेब पेशवे किंवा कालिसदन बाबांची गुहा किंवा इतर सिद्धपुरुषांच्या तपश्चर्येच्या जागा इत्यादी बाबतीत कुणीही काहीही बोलत नाही.
 
सुमारे १० कि.मीच्या परिघाच्या या तीर्थक्षेत्र परिसरात अजूनही काही गूढ ठिकाणं आहेत, असं खाजगीत सांगितलं जातं. तिथे सर्वसामान्य माणसं जात नाहीत किंवा गेलीच तर परत येत नाहीत, असंही सांगितलं जातं. सर्वच गोष्टी सर्वांनाच माहिती व्हाव्यात अशा नसतात एकंदरीत!
 
- मल्हार कृष्ण गोखले