हिंदू अस्मितेचा सातासमुद्रापार लढा
 महा एमटीबी  28-Dec-2017
 

पाश्चात्त्यांमधील धर्मांधांनी हिंदू धर्माची खिल्ली उडविण्याचे घृणास्पद प्रकार वेळोवेळी घडले. भारतीय देवदेवतांच्या प्रतीमा चपलांवर, अंत:वस्त्रांवर छापण्याचाही निर्लज्जपणा झाला. त्यातच भारतीयांना गरीब आणि अस्वच्छ म्हणून जगासमोर हेटाळणीचेही कित्येक प्रसंग न विसरण्याजोगे. असाच एक संतापजनक प्रकार अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात घडला. हिंदू धर्म आणि संस्कृतीविषयी दिशाभूल करणारी आणि अपमानित करणारी माहिती चक्क तेथील पाठ्यपुस्तकात छापण्यात आली. पण, अमेरिकेतील हिंदूबांधव व संस्थांनी एकत्र येऊन या विरोधात जवळपास दशकभर रितसर कायदेशीर लढा दिला आणि हिंदू धर्माविरोधी तो मजकूर पाठ्यपुस्तकातून हद्दपार करण्यात यश मिळविले. तेव्हा, सातासमुद्रापार हिंदू अस्मितेसाठी अमेरिकन हिंदू समाजाने दिलेल्या या लढ्याची ही कहाणी...
 
विविध विषयांवरील पाठ्यपुस्तकांमधील मजकूर हा मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्गापर्यंत शिक्षण व्यवस्थेतून पोहोचत असतो. त्यामुळे तो बिनचूक, संदर्भदृष्ट्या व्यवस्थित तपासलेला आणि कुठल्याही जाती, धर्म अथवा व्यक्तीला हीन लेखणारा नसावा. ही नियमावली सहसा जगभरातील शिक्षण क्षेत्रात पाळली जाते. पण, तरीही काही अपवादात्मक घटना घडतात आणि पाठ्यपुस्तकांमधील मजकूर दिशाभूल, अर्थाचा अनर्थ करुन जातो. असा गैरप्रकार आपल्याकडे अधूनमधून चर्चेत असतोच. पण, अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील पाठ्यपुस्तकांतही यापेक्षाही एक वंशविद्वेषक आणि खेदजनक प्रकार तेथील हिंदू बांधवांच्या निदर्शनास आला.
 
कॅलिफोर्नियातील हॉटन मिफ्लीन हायकोर्टाच्या ग्रेड के-६ आणि ग्रेड्‌स ६-८ या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू धर्मातील तथ्यांच्या मांडणीचे, संस्कृतीच्या चित्रणाचे एकाप्रकारे विकृतीकरणच केले गेले. हा प्रकार नजरचुकीने झालेला नक्कीच नसावा, कारण शैक्षणिक मजकूर निवडीची अधिक कडक नियमावलीची अमेरिकेत अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे हा प्रकार मुद्दाम घडला असावा, या संशयास नक्कीच वाव आहे. हिंदू धर्म आणि संस्कृती म्हटले की वेदांचा उल्लेख येतोच. वेद हे भारतीय संस्कृतीचा चेहरा आहेत. वेदातील तत्वज्ञान आजही सर्वोच्च आणि कालातीत मानले जाते. पण, कॅलिफोर्नियातील पाठ्यपुस्तकांत मात्र वेद म्हणजे मंत्र-तंत्र आणि मोहिनी घालणारे जादुई ग्रंथ असल्याची निराधार माहिती प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे एवढी मोठी चूक ही केवळ अज्ञानापोटी होऊ शकत नाही आणि यामागे निश्चितच हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षड्‌यंत्र असल्याचे हिंदू अमेरिकनांचे एकमत झाले. अशी एखादी घोडचूक असती तरी ठीक, पण नाही, या पाठ्यपुस्तकात हिंदू धर्माशी संबंधित माहितीत महर्षी व्यास आणि वाल्मिकी यांचा साधा उल्लेखही नाही. तेव्हा, अशा एक ना अनेक हिंदू धर्माला चुकीच्या पद्धतीने मांडणार्‍या बाबी घेऊन हिंदू एज्युकेशन फाऊंडेशन आणि हिंदू अमेरिकन समाजाने पाठ्यपुस्तका विरोधी आवाज उठविला. कॅलिफोर्नियाच्या शिक्षण खात्याला जाब विचारण्यात आला. तेथील तमाम हिंदू बांधवांनी पत्रव्यवहार केला. सोशल मीडियावरही हजारोंच्या संख्येने याविषयी जनजागृतीसाठी मोहीम राबविण्यात आली. हिंदू समाज प्रसंगी रस्त्यावरही उतरला आणि त्यांनी हिंदू धर्माविषयीच्या अशा बदनामीकारक माहितीविषयी तीव्र निषेध नोंदवला. लवकरात लवकर ही चूक पाठ्यपुस्तकातून मागे घेण्यासाठी हिंदू अमेरिकन बांधवांनी शिक्षण अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि ही संतापजनक बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आनंदाची बाब म्हणजे, दशकभराहून अधिकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेरीस या पाठ्यपुस्तकांतील असा हिंदूविरोधी मजकूर पाठ्यपुस्तकांतून हद्दपार करण्यात आला. त्यामुळे हिंदू अमेरिकन समाजाने सातासमुद्रापार हिंदू अस्मितेसाठी दिलेल्या या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
खरं तर धर्मांध पाश्चिमात्त्यांचा भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्वापार पूर्वग्रह दुषितच राहिला आहे. त्यातच अशा प्रकरणांमुळे या तथ्याला अधिक पुष्टी मिळते. म्हणजे, पुन्हा याच पाठ्यपुस्तकांतील हिंदू संस्कृती आणि परंपरेच्या खच्चीकरणाचे उदाहरण द्यायचे झाल्यास- एका प्रकरणात प्राचीन हिंदू संस्कृतीचा उल्लेख आढळतो. पण, ही संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत माहितीसोबत छायाचित्राच्या माध्यमातून दर्शविण्यासाठी चक्क भारतातील झोपडपट्टया आणि अस्वच्छतेचा आधार घेतला गेला. त्यामुळे पाठ्यपुस्तकावर भाबडेपणाने विश्वास ठेवणार्‍या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच भारतीय संस्कृती ही गरिबी, दुर्गंधी आणि मागास असल्याचे बाळकडू देण्यात नेमके कोणाला आणि कोणते स्वारस्य आहे? प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुरावे देणारी अनेक आकर्षक आणि ऐतिहासिक छायाचित्रे उपलब्ध असताना मुद्दाम घाणेरड्या वस्तीचे ‘इंडिया’ म्हणून पाठ्यपुस्तकांत दर्शन कितपत योग्य? ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही नेमकी याच मुद्यावर चर्चा रंगली होती. भारतीय संस्कृतीच्या आणि हिंदू धर्माच्या अशाच अतिरंजित आणि पुरातन मांडणीमुळेच मग परदेशात भारतीयांविषयी, हिंदूंविषयी मनात विष कालवले जाते आणि मग त्याची परिणती भारतीय विद्यार्थ्यांवर, नागरिकांवर वंशद्वेषाने झालेल्या हल्ल्यांतून दिसून येते. त्यामुळे हिंदू सहिष्णू आहेत, मवाळ आहेत, धर्माविषयी त्यांना फारशी आस्था-आपलुकी नाही, अशा आविर्भावात वावरणार्‍या हेकेखोर अमेरिकनांना एकप्रकारे हिंदू बांधवांनी चांगलीच चपराक लगावली आहे. तेव्हा, भारतीय संस्कृतीचा अविष्कार असलेला योग मुक्तहस्ते स्वीकार करणार्‍या याच धर्मांध पाश्चात्त्यांनी आता तरी हिंदूंवर, भारतीयांवर अशी प्रतिमा मलीन करणारी चिखलफेक थांबवावी, हीच अपेक्षा.
 
 
- विजय कुलकर्णी