शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पिक घ्यावे -कृषीमंत्री फुंडकर
 महा एमटीबी  28-Dec-2017अकोला : 'राज्यातील शेतक-यांनी परंपरागत शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करण्यावर भर द्यावा. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्च आणि जास्त उत्पादन देणारे पिके घ्यावीत' असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तीन दिवसीय राज्यस्तरिय भव्य कृषी प्रदर्शनी व चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दयावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याचबरोबर गोधनामुळे शेतकऱ्यांच शेती समृध्द होत असते त्यामुळे शेतक-यांनी आपल्या गोधनाची देखील वाढ करण्याकडे लक्ष दिली पाहिजे, असे ते म्हणाले. कृषी विद्यापीठांनी देखील संशोधन करुन नवनवीन वान संशोधीत करावे, असे सांगुन येत्या दोन वर्षात कापसाचे नविन वाण शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील सामान्य शेतक-यांना वीज, पाणी व शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटीबध्द यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यात जलसाक्षरता निर्माण झाली आहे. हे अभियान असे निरंतर सुरु राहिले तर जमीन जलमय होण्यास वेळ लागणार नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने ५ हजार कोटीचे कामे खारपाणपटयात करण्यात येणार असुन यामुळे खारपानपटटा समुध्द होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.