महामार्गातूनच विकास!
 महा एमटीबी  28-Dec-2017
 
 
 
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ. केनेडी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते वाक्य आपल्याला केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयांमध्ये ठळकपणे वाचायला मिळते. शिवाय, नितीन गडकरी आपल्या भाषणांमधूनही त्या वाक्याचा आवर्जून उल्लेख करीत असतात- ‘‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत असे नाही; तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे,’’ असे ते प्रसिद्ध वाक्य आहे. हेच वाक्य २४ तास डोक्यात ठेवून नितीन गडकरी अगदी झपाटल्यासारखे रस्तेविकासाचे काम करीत आहेत. कोणत्याही देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर त्यासाठी दळणवळणाची उत्तम साधनं असावी लागतात. रस्ते हा त्याचाच एक भाग आहे. जेवढे रस्ते चांगले असतील, तेवढी वेगवान अन् सुलभ वाहतूक शक्य होईल, हे ओळखून गडकरींसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याने, सध्या देशात दररोज २८ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट गाठले असून, पुढल्या वर्षी हे उद्दिष्ट दररोज ४० किलोमीटरपर्यंत गाठण्याचा गडकरींचा निर्धार आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात रस्तेविकासाचा हा वेग फक्त दोन किलोमीटर प्रतिदिवस हा होता, हे लक्षात घेतल्यास गडकरींच्या कामाचा आवाका आपल्या सहज लक्षात येईल.
 
नितीन गडकरी हे महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना त्यांनी राज्यभर रस्ते, पूल, उड्डाण पूल बांधले अन् स्वत:चे नाव रस्तेविकासाच्या क्षेत्रात अजरामर केले! पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे हा देशातील पहिला सहापदरी जलदगती महामार्ग सिमेंट काँक्रीटने बांधून पूर्ण करत, गडकरी यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रादेशिक भेदभाव न करता राज्यातील सगळ्या भागांचा समतोल रस्तेविकास साधण्याचा प्रयत्न केला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच सुपुत्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बनविण्याचे आणि मुंबईला पोहोचण्यासाठीचे अंतर कमी करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग जनतेच्या सेवेत रुजू झाल्यास नागपूरहून मुंबईला केवळ सहा तासांत पोहोचता येणार आहे. बाकी जिल्ह्यांमधून तर त्यासाठी आणखी कमी वेळ लागणार आहे. हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्यातून जाणार असल्याने, या दोन्ही प्रदेशांचा विकास झपाट्याने होण्यासही मदत मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यास राज्याच्या रस्तेविकासात विदर्भातील दोन मोठ्या नेत्यांचे कायमस्वरूपी योगदान नोंदविले जाणार आहे.
 
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे दोन वर्षांत तयार करून तो जनतेच्या सेवेत रुजू करण्यात आला. सरकारी तिजोरीतून एक पैसाही न वापरता- (बीओटी) ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर गडकरी यांनी हा रस्ता बांधला आणि इतिहास घडविला. मुंबई-पुणे सहापदरी महामार्ग तयार करण्यासाठी बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीची स्थापना केली होती. एमएसआरडीसी आजही कार्यरत आहे. याच एमएसआरडीसीमार्फत नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्याचे काम जानेवारीत प्रारंभ होणार आहे. सध्या भूसंपादनाचे काम सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी त्याला गतीही मिळाली आहे.
 
या ठिकाणी एक बाब लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे, राज्यात जेव्हा भाजपा आणि सेनेचे सरकार सत्तेत येते, त्या वेळी विकासकामांना गती मिळते. १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार होते आणि आता २०१४ च्या ३१ ऑक्टोबरपासून राज्यात युतीचेच सरकार आहे. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम खाते विदर्भातल्या नितीन गडकरी यांच्याकडे होते आणि आता वैदर्भीय असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद आहे. वैदर्भीय नेत्याने एकदा एखादे काम करायचे ठरविले, तर ते पूर्णत्वास जातेच! हा अनुभव आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी ज्याप्रमाणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दोन वर्षांत आश्चर्यकारक रीत्या बांधून जनसेवेत रुजू केला, त्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग २०१९ पर्यंत बांधून नागरिकांच्या सेवेत रुजू करतील, यात शंका नाही.
 
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा एकूण ७०० किलोमीटर लांबीचा आहे. १० जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार असून, या १० जिल्ह्यांमधील २६ तालुके आणि ३९२ खेडी या महामार्गाला जोडली जाणार आहेत. शिवाय, या महामार्गालगत २० पेक्षा जास्त कृषिसमृद्धी केंद्रे उभारली जाणार आहेत. ७०० किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण महामार्ग आणि त्यालगत निर्माण करायच्या सोईसुविधा, कृषिसमृद्धी केंद्रे यांसाठी एकूण ४९ हजार ११० एकर जमीन लागणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांकडून जमिनी ताब्यात घेण्याचे काम प्रगतिपथावर आहे. काही ठिकाणी शेतकर्‍यांचा विरोध असला, तरी राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना फायदे समजावून सांगितले जात असल्याने, या शेतकर्‍यांचा विरोध मावळेल अन् लवकरच महामार्गाचे भूमिपूजन होऊन हा महामार्ग राज्यातील जनतेच्या सेवेत रुजू होईल, याची खात्री वाटते.
 
या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाडाच नव्हे, तर खान्देशातील शेतकर्‍यांचा, उद्योजकांचा माल थेट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे कमी वेळात पोहोचविता येणार आहे. त्यामुळे येथील शेतीला नवसंजीवनी प्राप्त होईल आणि उद्योजकांनाही प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे महामार्गालगतच्या सगळ्या शहरांमधील उद्योगही भरभराटीस येतील. मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील आणि या भागातील लोकांचे उत्पन्न वाढून राहणीमान उंचावेल. असे जर होणार आहे आणि मुख्यमंत्री स्वत: या कामात लक्ष घालताहेत, तर याचे महत्त्व विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या लक्षात यायला नको? हा महामार्ग तयार झाला तर त्यामुळे राज्याच्या प्रगतीला हातभार लागणार आहे आणि राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला या प्रगतीचा लाभ होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. साहजिकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीची लोकप्रियताही वाढीस लागणार आहे. त्याचा धसका घेतलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांची दिशाभूल सुरू केली आहे. त्यातूनच काही शेतकरी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध करीत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आपला पराभव अटळ आहे आणि समृद्धी महामार्ग झाला तर त्यावर आताच शिक्कामोर्तब होईल, हे लक्षात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकर्‍यांना उचकावण्याचे काम चालविले आहे. पण, विरोधक यात यशस्वी होणार नाहीत अन् समृद्धी महामार्ग ठरल्या वेळेत पूर्ण होईल, याची मला खात्री आहे.
 
 
देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. ते विचारी नेतेही आहेत. त्यांना सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले पाहिजे, याची कळकळ आहे. त्यामुळे राज्याचा झपाट्याने अन् सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी ते रात्रंदिवस झटत आहेत. समृद्धी महामार्ग तयार करण्याचे त्यांचे स्वप्न, त्यांची दूरदृष्टीही राज्याला दाखवून देते आहे. आतापर्यंत केलेल्या कामांमुळे आणि घेतलेल्या भूमिकांमुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून राज्यात लोकप्रिय झाले आहेत. परंतु, अर्जुनाचे जसे पक्ष्याच्या डोळ्यावरच लक्ष होते, तसेच लक्ष देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राच्या प्रगतीकडे, उन्नतीकडे आणि विकासाकडेच आहे आणि ते नक्कीच या राज्याला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर करतील, यात शंका नाही...!
 
- डॉ. वाय. मोहितकुमार राव
9545847799