शेतकऱ्यांच्या मदतीला ‘तो’ आला धावून
 महा एमटीबी  27-Dec-2017
आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. म्हणूनच तर आपल्याकडे शेतकऱ्यांच्या ’अन्नदाता’ अशी उपमा दिली जाते. परंतु, अलीकडच्या काळात बदललेल्या परिस्थितीमुळे शेतकरी राजा काहीसा अडचणीत सापडला आहे. एक ना अनेक अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पाचवीला पुजलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस, पाण्याची टंचाई, भारनियमन, शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या मालाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे खचून गेलेले शेतकरी थेट आत्महत्येचा अंतीम मार्ग पत्करतात. तेव्हा, गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय सातत्याने गाजत असला तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, असं म्हणून आपण सहज मोकळे होतो. खरंतर एखाद्या पोटच्या पोरासारखं बाराही महिने पिकांची डोळ्यात तेल घालून शेतकरी काळजी घेत असतो. पिकांना कीड लागू नये म्हणून कीटकनाशकांची फवारणी केली जाते. खरंतर अशा कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनr थोडी खबरदारी घेणे गरजेचे असते. परंतु, दुर्देवाने काही शेतकऱ्यांना याबाबतची शास्त्रशुद्ध माहिती नसल्याने त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. अशीच एक दुर्देवी घटना नुकतीच महाराष्ट्रामध्ये घडली होती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना २० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. तसेच २५ शेतकऱ्यांना आपले डोळे गमवावे लागले होते. यवतमाळ झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अहमदाबादमधल्या इंटरनॅशनल शाळेमध्ये शिकणार्‍या रोहन पारेख या १६ वर्षाच्या विद्यार्थ्याने शेतकर्‍यांची मदत करण्याचा दृढ निश्‍चय केला. शेतकऱ्यांना कीटकनाशकांपासून कोणतीही बाधा होवू नये, यासाठी त्याने काम करायचे ठरवले. शाळा आणि रोजच्या अभ्यासातून वेळ काढून कीटकनाशके हाताळताना शेतकर्‍यांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण रोहन सध्या देत आहे. यासाठी त्याने सर्वप्रथम ५०० शेतकर्‍यांना मोफत तोंडावर लावण्यासाठी मास्क उपलब्ध करून दिले आहेत.
 
 
शेतकऱ्यांनामध्ये याविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्थेची मदत त्याने घेतली आहे. सध्या रोहनने गुजरातच्या पाटना जिल्ह्यातील कुवरा आणि वाग्दोड गावांमधून या अभियानाची सुरूवात केली आहे. रोहन येथील शेतकऱ्यांना एक कीट देतो. या कीटमध्ये पूर्ण हात झाकले जातील असा असलेला शर्ट, हातमोजे, डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी चष्मा, एक चांगल्या दर्जाची चप्पल, अशी एक परिपूर्ण कीट शेतकर्‍यांना दिली जाते. कीटकनाशकांची फवारणी करताना या सर्व वस्तूंचा वापर कशा प्रकारे करायचा, याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. याबाबत रोहन सांगतो की, ‘‘शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच या विषयाचा मला स्वतः अभ्यास करण्याची गरज भासू लागली.’’ कीटकनाशकांच्या संदर्भात त्यांनी काही तज्ज्ञांच्या मदतीने तसेच इंटरनेटची मदत घेऊन याबाबतची अधिक माहिती घेतली. कीटनाशकांमध्ये कोणत्या घातक रसायनांचा वापर केला जातो, त्याने आरोग्यावर कोणते विपरित परिणाम होतात, तसेच कीटकनाशके हाताळताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, याचा संपूर्ण अभ्यास केला. स्प्रेमध्ये कीटकनाशके भरताना थोडी सावधगिरी बाळगावी, कीटकनाशकांची फवारणी करून झाल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावे. तसेच फवारणी करून झाल्यानंतर लगेचच पाणी किंवा अन्नपदार्थांचे सेवन करू नये तसेच शेतकर्‍यांना सुरक्षेसाठी उपलब्ध करून दिलेल्या साधनांचा नियमितपणे वापर करावा असे अनेक सल्ले रोहन व त्याचे सहकारी शेतकऱ्यांना देत आहेत. शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिकांसह धडे दिले जात असल्याने शेतकर्‍यांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.
- सोनाली रासकर