गोजैविक शेतीकडे महाराष्ट्राची वाटचाल
 महा एमटीबी  27-Dec-2017
 
 
 
 

 
 
शेतकरी कधीही ‘मी आणि माझं’ एवढ्यापुरता मर्यादित विचार करत नाही. पण, परिस्थितीमुळे शेतकर्‍यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न कालांतराने निर्माण झाला. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी कृषी तंत्रज्ञानातील कित्येक प्रयोग समोर आले. पण परवडणारे नसल्यामुळे त्यांची उपयोगिताही मर्यादित ठरली. यावर मात करत शेती आणि शेतकर्‍यांना जगवणारा असाच एक हरितमार्ग गोजैविक शेतीचा. नगरच्या विजय ठुबे यांनी आयटीतील चांगली नोकरी सोडली आणि गोशेतीचा अवलंब केला. पण, हा यशस्वी प्रयोग केवळ स्वत:च्या शेतीत करुन ते थांबले नाही, तर त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी शेतकरी तरुणांनाही हाताशी घेतले. तेव्हा, ठुबे यांनी सामाजिक आणि कृषीभान जपून फुलवलेल्या या गोजैविक शेतीची ही यशोगाथा...
 
जैविक शेतीला ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून गेली साठ वर्षे रासायनिक शेती करणारा महाराष्ट्र पुढील दोन वर्षांत शंभर टक्के गोजैविक शेती करू लागेल, असे वाटू लागले आहे. यातील एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, रासायनिक शेतीच्या तुलनेत गोजैविक शेतीला कष्ट थोडे अधिक आहेत. तरीही फायदे मात्र अनेक पटींनी आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रात एक गोजैविक शेतीचा जो प्रयोग गाजतो आहे, त्यावरून या प्रयोगाकडे तरुण शेतकरीही वळत आहेत, असे वाटते. सध्या गोशेतीचा अवलंब केलेले दोन अडीच हजार शेतकरी दहा-बाराच्या गटात एकत्र येऊन त्यांची उत्पादने दररोज साप्ताहिक बाजारात पोहोचवित आहेत. गेल्यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात आठवडी बाजाराचा प्रयोग सुरू झाला, त्यातून हा बदल झाला आहे. त्यात अनेकांचा पुढाकार होता. त्यात विजय ठुबे या तरुणाचे नाव घेण्यासारखे आहे. साप्ताहिक बाजारामुळे शेतीमालाला दोनपट ते तीनपट भाव मिळत आहे. रासायनिक खतांचा पर्याय बाजूला ठेवून फारशी गुंतवणूक नसलेली गाईच्या शेणापासून तयार केलेले अमृतपाणी वापरले जात असल्याने त्यातील मोठ्या खर्चाला फाटा देता येणे शक्य झाले आहे. त्यातील उत्पादने ही जैविक असल्याने त्याला मागणी तर व्यवस्थित आहेच, पण लोकांना चांगला शेतमाल दिल्याचे समाधानही आहे.
 
महाराष्ट्रात सध्या असे सव्वाशे आठवडी बाजार सुरू झाले आहेत. पण, यात पुढाकार घेतलेले विजय ठुबे यांचे म्हणणे असे की, अजून दोन हजार आठवडी बाजारांना महाराष्ट्रात वाव आहे. यातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, दि. ६ आणि ७ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे ‘राष्ट्रीय गोसेवा परिषद’ भरणार आहे. या परिषदेत या संबंधातील सर्व विषयांवरच चर्चा होणार आहे. (अधिक माहितीसाठी संपर्क- ७५८८८७३११६ आणि ९४०५९३७८१०) महाराष्ट्रात हा गोशेतीचा उपक्रम सर्वत्र राबविला जात आहे आणि त्याचे एक उदाहरण म्हणजे विजय ठुबे यांचे प्रयत्न. अशा सार्वजनिक कामात प्रयत्न करणार्‍याचे अभिनंदन होणे आवश्यक असते, पण तरीही ठुबे यांनी तरुणांनी गोशेतीसाठी कसा प्रयत्न करावा, याचा एक वस्तुपाठच समोर ठेवला आहे.
 
 

  
वास्तविक ठुबे हे पेशाने आयटी इंजिनिअर. अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञानावर आधारित कंपनीत चांगल्या हुद्द्यावरची नोकरी. त्यात चांगले यशही. तरीही कालांतराने त्यांना असे वाटू लागले की, नोकरीत मिळणारे हे यश आपल्याला शेतीत का मिळू नये? खरे म्हणजे, असा चांगला विचार मनात येऊनही यश मिळणे किती कठीण असते आणि त्याचे काय काय होते, हे सर्वांना परिचित आहे. त्यांची एक जमेची बाजू अशी होती की, घरची शंभर एकर जमीन. पण ती अतिशय मुरमाड आणि पडीक. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावाच्या पलीकडे दहा-बारा किलोमीटर. नगर जिल्ह्यातील दक्षिणेकडील हा भाग दुष्काळीच्या फूटपट्टीनेच मोजला जातो. पावसाचा दुष्काळ आणि समस्यांचे अमाप पीक हाच जणू नेहमीचा प्रकार. गेल्या काही वर्षांत कुकडीचे धरण झाल्याने पाणी त्या भागात आले आहे तरीही ते सर्वत्र पुरेसे आहे असे मात्र नाही. या सार्‍या परिस्थितीचा फायदा घेऊन या तरुणाने प्रथम गोजैविक पद्धतीने सुरुवात करून फक्त गवत खुलवले. शंभर एकरावर गवत हा प्रकारही जरा नवखा होता. त्या गवतावरच स्प्रिंकलने पाणी मारून त्याची वाढ चांगली करून घेतली. जसे जसे गवत वाढू लागले, तसतसे त्यांनी देशी गाई आणि म्हशी यांची संख्या वाढवली. सध्या त्याच्याकडे ७५ गीर, कांकरेज, डांगी, खिलार अशा देशी गाई आहेत आणि तेवढ्याच म्हशी आहेत. दहा किलो ताजे शेण यात अर्धा किलो शेण आणि पाव किलो मध यांचे मिश्रण शंभर मीटर पाण्यात मिसळायचे आणि ते पाणी गाळून घेऊन स्प्रिंकलने शेतावर मारायचे. याचा परिणाम असा झाला की, ती शेती पिकाऊ झाली. गेल्या तीन वर्षांत तेथे चांगला भाजीपाला, चांगल्या फळभाज्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे चांगली किंमत देणारी नगदी पिके येऊ लागली आहेत. सारे दूध पुण्याला येते. पहाटे दीड वाजल्यापासून धारा काढायला प्रारंभ करावा लागतो. ते दूध घेऊन ७० किमी अंतर कापून पहाटे चार-साडेचार वाजता दूध पुणे शहरात पोहोचलेले असते. विजय ठुबे (अधिक माहितीसाठी संपर्क- ९९२२९६९९३९) यांची ही गाथा म्हणजे गोशेती करणार्‍या प्रत्येकाची गाथा होण्याची शक्यता आहे. त्यांची शंभर एकर जमीन होती हे ठीक आहे, पण पंधरा-वीस गुंठ्यात पंधरा लाखांचे आले घेतल्याचे यश मिळाल्याचीही उदाहरणे आहेत.
 
 

 
 
यातील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, शेतीमध्ये रासायनिक खताचा खर्च एकराला पाच हजारांपासून ते तीस हजारापर्यंत जात असे. त्यासाठी ८० टक्के शेतकर्‍यांना कर्ज काढावे लागत असे. त्या ऐवजी दुभती गाय किंवा भाकड गाय जी मिळेल ती, त्याच्या शेणाच्या आधारे घरी अमृतपाणी करणे आणि त्यातून येणारे जैविक उत्पादन हा खरे म्हणजे ‘सोन्याला सुगंध’ येण्याचा प्रकार आहे. परवा एका मित्राने अनुभव सांगितला की, पुण्यात दीपबंगला भागात शनिवारी भरणार्‍या अशा साप्ताहिक बाजारातून त्याने मेथीची भाजी नेली आणि वहिनींनी ती केली. त्या भाजीची चव एखाद्या चविष्ट डिशप्रमाणे होती. अलीकडे मेथीची भाजी ‘डिश’प्रमाणे खाल्ली, असे कोठे सहसा ऐकायला मिळत नाही. पण, ती मेथीची भाजी शेजार्‍यापाजार्‍यात ‘डिश’च्या चवीने खाल्ली गेली. यातील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, शेतात चांगले उत्पादन घेणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच त्याला बाजारभाव मिळवणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे शेतकर्‍यांचा अनुभव असा की, शेतीमाल ठोक व्यापार्‍याला विकणे आणि स्वत: विकणे यात यात दुप्पट फरक पडतो. खरे म्हणजे, शेतकर्‍याला हे परवडत नाही. कारण, एका बाजूला शेतातील कामे करायची की शहरात जाऊन साप्ताहिक बाजारात वेळ मोडत बसायचे, असे त्याला वाटू लागते. त्याकडे त्याचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या ५० वर्षांत शेती कधी यश देणारी झालीच नाही. आठवडीबाजाराचा रस्ता हा प्रथम त्रासदायक वाटणारा रस्ता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, भारतातील गोजैविक शेती उत्पादनाला जगभर फार मोठी मागणी आहे, एकेकाळी त्या निर्यातीतूनच भारतात सोन्याचा धूर निघत असे, असे म्हटले जायचे. पण हा स्वत: शोधत शोधत हुडकून काढण्याचा मार्ग आहे.
- मोरेश्र्वर जोशी