मानवता राष्ट्रापेक्षा स्वत:च्या फायद्यासाठी अधिक
 महा एमटीबी  27-Dec-2017
 

 
 
 
कुलभूषण जाधव याच्या आई व पत्नीला पाकिस्तान सरकारने मानवतेच्या दृष्टीने कुलभुषणची भेट घेऊ दिली, असा गाजावाजा झाला परंतु प्रत्यक्षात हा केवळ बनाव असल्याचे दिसून आले. या उलट रोहिंग्याकडे मानवतेच्या दृष्टीने भारताने पहावे असा गळा काढणारे धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी कुलभूषण जाधव यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मानवाधिकारांचा आणि मानवतेचा वापर राष्ट्रापेक्षा स्वत:च्या लाभासाठीच करतांना दिसून येते.
 
 
१९४८ ला जगात मानवाधिकारांची घोषणा झाली. सुरवातीला मर्यादित असलेला हा कायदा हळूहळू जगात पसरून मान्य होऊ लागला. भारतात १९९३ ला मानवाधीकार कायदा सुरू झाला आणि विविध मानवाधिकार संघटनांचे पेवच फुटले. मानवाला मानवी जाचातून सोडवण्यासाठी व त्याच्यावरील अमानुष अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा कायदा सुरू झाला. मानवता हा त्याचा मुळ हेतू. सुरवातीला मानवाधीकार या गोष्टीकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. आतंकवाद्यांसाठी मानवाधिकाराचे संरक्षक जागृत झाले.
 
 
मानवाधीकाराचा स्वार्थासाठी प्रचंड वापर होऊ लागला. ईस्त्राईल आणि पॅलेस्टाईन मधील युध्दा संघर्षामुळे काही समुदायाचा लोकांना दु:ख होऊन भारताने मानवतेच्या दृष्टीने याकडे पहावे आणि निषेध करावा इथपर्यंत मानवतावाद्यांची मजल गेली होती. मानवता भारतात जागृत आहे याचा आनंद वाटतो परंतु तिला धार्मिक रंग आहे याचे दु:ख होत आहे. अतिरेकी सैनिकांवर गोळीबार करतात, काश्मिरमध्ये सैनिकांवर दगडफेक होते. आणि सैनिकांनी प्रतिउत्तर दिले की, मानवाधिकार जागृत होतो.
 
 
भारतीय काही धर्मनिरपेक्ष नागरिकांना रोहिंग्याकडे मानवतेच्यादृष्टीने भारताने पहावे असा दृष्टांत झाला. त्यांच्यासाठी याआधी मानवतावाद्यांचे प्रेम उफाळून आले. असेच प्रेम अफजल गुरू आणि अजमल कसाबसाठी सुध्दा उफाळून आले होते. पण कुलभूषण जाधव याच्याबाबतीत कोणत्याही धर्मनिरपेक्ष समजल्या जाणा­या नेत्यांना मानवतेची जाणिव झाली नाही. पाकिस्तानने कुलभूषणच्या आई आणि पत्नीला त्याची भेट घेण्याची मुभा दिली याचा मानवतावाद्यांना प्रचंड आनंद झाला. तो त्यांना काही अंशी लपविण्यात त्यांना यशही आले. पण ही भेट पार्किंग लॉटमधील एका शिपिंग कंटेनरमध्ये झाली यावरून ही मानवता किती पोकळ होती हे दिसून आले. देशातील कथीत मानवतावाद्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. भारतात जळू प्रमाणे असलेल्या या मानवातावाद्यांना विशिष्ट लोकांची दाढी धरण्यातच मानवता दिसते.
 
 
या सर्व घटना पाहता मानवाधिकार हा मानवतेसाठी नसून केवळ विशिष्ट लोकांच्या सुरक्षेसाठीच वापरण्याचे ठेवणीतील अस्त्र आहे. जेव्हा सर्व शस्त्र आणि अस्त्र बोथट होतात तेव्हा हे शस्त्र उपद्रव देण्यासाठी वापरले जाते हे मात्र निश्चित आहे.
 
- निलेश वाणी