कीर्तन परंपरेचा वारसा
 महा एमटीबी  27-Dec-2017
 

 
 
 
महाराष्ट्राला विविध कलांची संपन्न परंपरा लाभली आहे. त्यापैकीच कीर्तन ही एक कष्टसाध्य कला. कीर्तनासाठी उत्तम आवाज, संगीताचे ज्ञान, हजरजबाबीपणा, वक्तृत्व, कथाकथन, विनोद यांचे उत्तम ज्ञान असावे लागते. एका अर्थाने संमिश्र अशी ही कला. नवविधा भक्तीपैकी एक कीर्तन कला मानली जाते. कीर्तनाचे देखील अनेक प्रकार आहेत. वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन वगैरे. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात ‘राष्ट्रीय कीर्तनकार’ म्हणून ह.भ.प श्रीकृष्ण महाराज सिन्नरकर यांचे नाव सर्वांना परिचयाचे आहे. भारतीय परंपरा आणि ईश्वर भक्ती यांचा देशप्रेमाशी मिलाफ साधून त्यांनी आगळी कीर्तन सेवा जनता - जनार्दनाच्या चरणी रुजू केली आहे. सध्या त्यांची ही परंपरा त्यांच्या कन्या वैजयंती श्रीकृष्ण सिन्नरकर या पुढे नेण्यासाठी सरसावल्या आहेत. कीर्तनाच्या पूर्वरंगात एक अभंग घेऊन त्याचे विश्लेषण केले जाते, तर उत्तररंगात विविध गोष्टींवर मार्गदर्शन केले जाते. हे तंत्र जाणून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती करीत आहेत.
 
 
वैजयंती यांचे वडील ह.भ.प श्रीकृष्ण महाराज सिन्नरकर यांचे वडील स्व. वामनराव प्रल्हादशास्त्री भट हे देखील कीर्तनकार होते. नव्या पिढीत मात्र वैजयंती यांच्या दोन भगिनी किंवा बंधू कीर्तनाकडे वळले नाहीत. स्वतः वैजयंती एम.कॉम असून त्यादेखील आताच कीर्तनाकडे वळल्या आहेत. अलीकडे त्यांनी संगीत शिक्षण सुरु केले. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाने कीर्तन सेवा सुरु केली. त्यांच्या वडिलांना महाराष्ट्रातून निमंत्रणे येत, त्या ठिकाणहून म्हणजे जाफराबाद (औरंगाबाद जवळील), देऊळगाव राजा (बुलढाणा) येथे त्यांची कीर्तने झाली असून त्याला शेकडो श्रोते उपस्थित होते. महाराजांची कन्या देखील उत्तम कीर्तन करते, अशी प्रशस्ती तेथील ग्रामस्थांनी दिल्याने आणखी निमंत्रणे येऊ लागली असून या क्षेत्रातील त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
कीर्तन करणार्‍या महिला तशा कमीच! त्यापैकीच एक असणार्‍या वैजयंती यांनी आपली या क्षेत्रात एक विशिष्ट छाप सोडली आहे. त्यांनी यापूर्वी आंदोलनेही केली आहेत. तसेच विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा आवर्जून सहभाग असतो. यापूर्वी त्यांनी वरणगाव, शिरपूर, बुलढाणा, धुळे, लासलगाव, नाशिक, विंचूर अशा अनेक ठिकाणी प्रवचने आणि व्याख्याने दिली आहेत. संख्याच सांगायची तर शंभरावर भरेल. याशिवाय ‘दिव्य दृष्टी’ संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दिव्यांगांसाठी विविध उपक्रमराबविले आहेत.
 
 
नाट्य स्पर्धांत भाग घेऊन पारितोषिके मिळविली आहेत. तसेच २०१६ च्या महिला दिनी महिला पोलिसांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. कुंभमेळ्यातील ‘ग्रीन गोदा’ कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग होता. आपल्या प्रभाग १ मध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाद्वारे ‘कपडा बँक’ चालवून त्यांनी अनेकांना मदत केली. तवली फाटा येथे २०१६ मध्ये झालेल्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन उपक्रमातही त्या सहभागी होत्या. ‘यंग गार्ड’ या आगामी चित्रपटात शिक्षिकेची भूमिका त्यांनी साकारली आहे. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये देखील त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. काव्यवाचनाची वैजयंती यांना आवड असून पत्रकार म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. साहित्य आणि लेखनाबरोबरच क्रीडा प्रकारांतह त्यांनी रुची आहे. व्हॉलीबोल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कराटे यांचे प्रशिक्षण घेऊन अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. अशा प्रकारे विविध गुणांनी संपन्न असलेल्या वैजयंती यांनी कीर्तन क्षेत्रात प्रवेश केला असून भावी काळात त्यात त्या आणखी प्रगती करून देव आणि देशसेवेचा वारसा पुढे नेतील, अशी सार्थ अपेक्षा आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
 
 
-पद्माकर देशपांडे