आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. बाळकृष्ण तिटकारे
 महा एमटीबी  26-Dec-2017
 
 
 
 
 
 
कर्जत : कर्जत तालुक्यातील आदिजन विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. बी. यु. तथा बाळकृष्ण तिटकारे यांची निवड करण्यात आली आहे.
 
कर्जत तालुक्यातील आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार भाऊसाहेब राऊत यांनी आदिजन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना करून तालुक्यात कशेळे आणि चिंचवली-डिकसळ येथे माध्यमिक शाळा सुरू केल्या.
 
या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर राऊत हे सलग एकवीस वर्षे अध्यक्षपदी होते. नुकतेच त्यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी संस्थेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदासाठी डॉ. तिटकारे यांची एकमताने निवड करण्यात आली. याच सभेत संस्थेच्या सचिवपदी डॉ. गिरीश राऊत यांची आणि खजिनदारपदी राहुल तिटकारे यांची निवड करण्यात आली आहे.