‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी
 महा एमटीबी  26-Dec-2017
 

 
 
तेरी अकड की रस्सी जल जाएगी
पकड मे इसकी आग हैं
ऐसी धाकड हैं, धाकड हैं!!
 
‘दंगल’ सिनेमातलं हे गाजलेलं गाणं आणि परवा याच गाण्याच्या शब्द अन् शब्दाचा प्रत्यय ‘महाराष्ट्र केसरी’च्या अटीतटीच्या रांगड्या खेळात आला. पुणे जिल्ह्यातील भुगाव येथे ’महाराष्ट्र केसरी’चा अविस्मरणीय सामना पार पडला आणि पुण्याच्याच अभिजीत कटकेने ’महाराष्ट्र केसरी’चा बहुमान पटकावला. धाकड अभिजीतची या खेळातील आणि कालच्या स्पर्धेतील आगीसारखी पकड पाहता, त्यामागच्या अभिजीतच्या अविरत परिश्रमाचा परिचय येतो. गेल्याच वर्षी विजय चौधरीने अभिजीत कटकेवर मात करून सलग तिसर्‍यांदा ’महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकाविला होता. त्यामुळे अभिजीतला गेल्या वर्षी विजेता पदाला मुकावे लागले होते. मात्र, यावर्षी त्याने अटळ जिद्दीने आणि अंगमेहनतीने ‘महाराष्ट्र केसरी’वर आपले नाव कोरले. अभिजीत हा पुण्याच्या गणेशपेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान. सध्याचे त्याचे वजन १२२ किलो. त्याला पैलवानीच्या या प्रवासात अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले. अभिजीतने २०१५ साली ’युवा महाराष्ट्र केसरी’चा मान मिळविला होता. त्यानंतर २०१६ साली त्याने ’ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती’त कांस्यपदक मिळविले. त्यानंतर अभिजीतला ‘महाराष्ट्र केसरी’ सोबतच ‘हिंद केसरी’च्या सामन्यात उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, जमखिंडीतल्या ’भारत केसरी’ किताबाने त्याच्यात वेगळाच जोश निर्माण केला.
 
लहान वयातच अभिजीतने कुस्तीत फार चांगली पकड मिळवली. कटके घराण्यामध्येच पैलवानीची परंपरा असल्याने कुस्ती तशी अभिजीतच्या रक्तातच. त्याच्या रूपाने कुस्तीच्या मैदानात उतरणारी कटकेंची ही पाचवी पिढी. या वर्षीच्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या स्पर्धेत उपविजेता ठरलेला किरण भगत हा अभिजीतचा जरी प्रतिस्पर्धी होता, तरी ते दोघे खूप चांगले मित्रही आहेत. अभिजीत गादी (मॅट) तर किरण कुस्तीच्या माती विभागात सरस आहे. अंतिम सामन्यात अभिजीत आधीपासूनच आघाडीवर होता. मात्र, तरीही किरणनेही चांगली लढत दिली. यावेळी अभिजीतची अंतिम सामन्यापर्यंत लढतीची दुसरी वेळ होती, तर किरणची पहिली वेळ होती. असे असूनही दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली आणि अभिजीतने १०-७ अशा फरकाने हा सामना पदरात पाडला.
 
अभिजीत आर्मी स्पोट्‌र्समध्येदेखील सराव करतो. त्याचबरोबर अभिजीत इयत्ता १२ वीची परीक्षा देत आहे. प्रत्येक खेळामध्ये अव्वल राहण्यासाठी योग्य असलेला व्यायाम, दैनंदिन सराव, पैलवानांचा खास खुराक हे सर्व अभिजीत नित्यनेमाने करतो. प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन योग्य वेळी योग्य खेळी करणे हे अभिजीतला खास जमते. ज्यूस, बदाम, थंडाई, तूप, आठवड्यातून चार वेळा मांसाहार असा त्याचा आहार आहे. रोज २ ते ३ हजार आणि महिन्याचा ६० ते ७० हजार रुपये इतका अभिजीतच्या खुराकीचा खर्च आहे. ’महाराष्ट्र केसरी’चा मानकरी ठरलेल्या अभिजीतला चांदीची गदा व गाडी देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या किरण भगतला बुलेट बाईकची भेट मिळाली. अभिजीतला ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ’महाराष्ट्र केसरी’ हा किताब देण्यात आला. सगळ्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्राच्या ’धाकड पुत्रा’चे त्याच्या कामगिरीबद्दल खूप कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी खूप सार्‍या ताकदवान शुभेच्छा.
-पूजा सराफ