एसी लोकल...जरा जपून
 महा एमटीबी  26-Dec-2017
 
 
 
भारतातील पहिलीवहिली एसी लोकल मुंबईत अखेरीस धावली. मुंबईकरांना कित्येक वर्षांपासून भूरळ घातलेल्या या एसी लोकल सेवेचे थंडगार स्वप्न ऐन थंडीत नाताळच्या मुहूर्तावर रुळावर उतरले. हौशी मुंबईकरांनीही एसी लोकलच्या तिकिटांच्या दरांवर काहीशी नाराजी व्यक्त करत किमान एकदा तरी गारेगार लोकलमधून प्रवास करुन बघू म्हणून गर्दी केली. एसी लोकलच्या तिकिटांच्या दरांपासून ते लोकलच्या वेळापत्रक आणि वातानुकूलित सेवांची चर्चाही सर्वत्र रंगली. या लोकलच्या प्रत्येक डब्यात टीसी असेल असेही कळले. तेव्हा, सध्या सगळे आलबेल असले तरी आगामी काळातही हीच परिस्थिती निरंतर राहो, ही सदिच्छा. पण मुंबईची गर्दी, अल्लड आणि बेशिस्त प्रवाशांचा कटू पूर्वानुभव पाहता एसी लोकल रेल्वे प्रशासनाने अशा धेंडांपासून जपली म्हणजे मिळविले. कारण, काही महिन्यांपूर्वीच कोकणातून गोव्यात धावणार्‍या आलिशान तेजस एक्सप्रेसची काय दुर्दशा झाली होती, ते वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुरुवातीपासून नागरी प्रवाशी शिस्तीचा बडगा उगारत अशा उपद्रवी प्रवाशांना वेळीच शासन करणे क्रमप्राप्त ठरेल. दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे, एसी लोकलचे कालांतराने हाल मुंबईच्या एसी बस सेवेप्रमाणे होणार नाहीत, याचीही काळजी रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागेल. कारण, एसी म्हटल्यावर चार पैसे जादा मोजावे लागतात. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी मध्यमवर्गीय मुंबईकर आपला खिसा कितपत हलका करतील, ते पाहावे लागेल. एसी बसच्या बाबतीतही नेमके हेच घडले. एसी बसचे भरमसाठ दर आणि त्यातही अनियमित, रस्त्यात बंद पडणारी वेळकाढू सेवा मुंबईकरांच्या प्रवासातूनच ‘बेस्ट’च्या ढिसाळ कारभारामुळे कायमची हद्दपार झाली. त्यामुळे मुंबईकरांचा एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर काय...ही शक्यताही दुर्लक्षित करुन अजिबात चालणार नाही; अन्यथा असा पांढरा हत्ती पोसण्यामध्ये सरकारला सहसा कुठलेही स्वारस्य बहुदा नसतेच. त्यातही फर्स्ट क्लासने प्रवास करणारे एसी लोकलला प्रथमपसंती देतील, हा काहींचा दावा पूर्णत: योग्य नाही. कारण, एसी लोकलचे तिकीट, पास काढून जर ती लोकल चुकली, तर दुसरी एसी लोकल येईपर्यंत प्रतीक्षा कोण करणार? फर्स्ट क्लासचा पास, तिकीट नंतरच्या लोकलही चालून जाईल, पण एसी लोकलच्या फेर्‍या मर्यादित आहेत. त्यातही शनिवार-रविवारी देखभाल-दुरुस्तीची सुट्टी बरं का... असो... तर तमाम मुंबईकरांना पहिल्या एसी लोकलच्या शुभेच्छा. आपला सगळ्यांचा प्रवास असाच अधिकाधिक सुखकारक होवो, ही आशा करुया...
 
करचुकवेगिरीचा कळस
 
आपल्या कराच्या रकमेतूनच देशाचा विकास होत असतो. अगदी करभरणा करण्यासाठी भारतीयांना प्रोत्साहित करणार्‍या ‘जनहितार्थ जारी’ जाहिरातींचा आशयही याच मुद्याला केंद्रस्थानी ठेवतो. पण, तरीही कर भरणार्‍या भारतीयांचे प्रमाण अजूनही अत्यल्पच (खरं तर नगण्यच!) म्हणावे लागेल. कारण, आयकर खात्याने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, केवळ १.७ टक्के भारतीयांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा आयकर सरकारी तिजोरीत जमा केला आहे. आता ‘सव्वासो करोड देशवासीयों’च्या आपल्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारतात हे १.७ टक्के प्रमाण म्हणजे जेमतेमदोन कोटी नागरिक! करभरणा करणार्‍या भारतीयांची ही संख्या निश्चितच चिंताजनक असली तरी त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे, आयकर रिटर्न फाईल करणार्‍यांची संख्या बर्‍यापैकी वाढली आहे. २०१४-१५ साली ३.६५ कोटी नागरिकांनी रिटर्न फाईल केले होते, तर या वर्षी हेच प्रमाण ४.०७ कोटींवर पोहोचले आहे. रिटर्न फाईल करणार्‍यांचे प्रमाण जरी वाढले असले तरी प्रत्यक्ष करभरणा करणार्‍यांचे प्रमाण मात्र केवळ २.०६ कोटीच आहे. कारण, (नील) रिटर्न फाईल करताना आपण आयकर मर्यादेतच बसत नसल्याचे अनेकांनी आयकर खात्याला कळवले आहे.
 
त्याचबरोबर गतवर्षीपेक्षा यंदा जमा झालेला आयकरही मोठ्या प्रमाणात घटल्याचे या आकडेवारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. २०१४-१५ साली १.९१ लाख कोटी इतका आयकर सरकार दरबारी जमा झाला होता, पण यंदा हे प्रमाण कमी होऊन १. ८८ लाख कोटींवर पोहोचले आहे. म्हणजेच, थोडक्यात चार लाख कोटी रुपयांचा आयकर यंदा कमी जमा झाला. उलट, नोटाबंदी, बोगस कंपन्यांवर टाकलेल्या धाडी, आयकरसंबंधीचे कडक नियमआणि एकूणच जागरुकता यामुळे हे प्रमाण वाढणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात तसे होताना मात्र दिसून आलेले नाही. सध्या अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर भरावा लागत नाही. त्यातच आगामी अर्थसंकल्पात हीच मर्यादा वाढवून तीन लाख करण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यासंबंधीचे चित्र आगामी काळात अधिक स्पष्ट होईलच. पण, भारतीयांनी मात्र करचुकवेगिरीची आपली सवय सोडून देशहिताच्या दृष्टीने करभरणा केलेच पाहिजे. कर चुकवणार्‍यांवर नजर ठेवायला सरकारी यंत्रणा आहेतच, पण तरी आपल्या खिशातले चार पैसे वाचवण्यासाठी आपण देशाचे मात्र नुकसान करतोय, हे ध्यानात ठेवावे.
 
-विजय कुलकर्णी