फिलिपिन्समध्ये वादळामुळे २३० जणांचा मृत्यू
 महा एमटीबी  26-Dec-2017मनिला :
फिलिपिन्स सागरामध्ये निर्माण झालेल्या टेम्बीन चक्रीवादळमुळे फिलिपिन्समध्ये आतपर्यंत २३० जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक लोक या वादामुळे जखमी झाले आहेत. या वादळामुळे फिलिपिन्सचे जनजीवन पूर्णपणे उद्धवस्त झाले असून हे वादळ आता व्हियेतनामच्या दिशेने पुढे सरकू लागले आहे, त्यामुळे व्हियेतनामच्या किनारपट्टी जवळील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला व्हियेतनाम सरकारने दिला आहे.

टेम्बीन चक्रीवादळमुळे फिलिपिन्समधील पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणची वीज आणि दूरध्वनी सेवा खंडित झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यामुळे शहरांमधील पायाभूत सुविधा देखील उद्धवस्त झाल्या आहेत. या वादळामुळे १० हजाराहून अधिक लोकांवर विस्थापित होण्याची पाळी आली आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना देखील पूर असल्यामुळे नागरिक वाहून गेल्याच्या घटना देखील अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अशा संकटसमयी सर्व नागरिकांनी न घाबरता एकत्र राहावे, असे आवाहन फिलिपिन्स सरकारने केले आहे. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी सरकारकडून मदत शिबिरे सूर करण्यात आली असून नागरिकांनी त्याचा देखील लाभ घ्यावा, असे देखील सरकारने म्हटले आहे.

दरम्यान व्हियेतनामकडे हे वादळ सरकू लागल्यानंतर व्हियेतनाम सरकारने देखील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. व्हियेतनामची किनारपट्टी आणि संभाव्य धोक्याच्या ठिकाणाहून नागरिकांना काढण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. व्हियेतनाम सरकारने आतापर्यंत २७ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आले आहे.