सालेमची रजनीकांत
 महा एमटीबी  25-Dec-2017
 


 
 
 
रजनीकांत हा प्रथितयश तामिळ नट मूळचा मराठी मातीतला. शिवाजी गायकवाड असे त्यांचे नाव, नंतर तामिळनाडूत जाऊन तिथे अभिनयात नाव कमावून तमिळी जनतेच्या गळ्यातला तो ताईत झाला. अशीच एक मराठमोळी रजनीकांत जिने तमिळनाडूत उत्कृष्ट कार्य केले आहे. 'रोहिणी भाजीभाकरे' या रणरागिणीचे नाव. रोहिणी मूळच्या सोलापूरच्या. शेतकरी कुटुंबातल्या असल्याने एका शेतक-याची काय अवस्था असते याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. रोहिणी यांचे वडिल २ एकरहून कमी जमिनीत ज्वारीचे उत्पादन घेत आणि शेतीसंबंधित त्यांना ब-याच अडचणी येत, त्या फक्त जिल्हाधिकारी सोडवू शकतो असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यांच्या घरातील एका तरी व्यक्तीने जिल्हाधिकारी व्हावे असे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. हे स्वप्न रोहीणी यांनी पूर्ण केले. शासकीय महाविद्यालयात रोहिणी यांनी अभियांत्रिकीत पदवी मिळवली नंतर कुठल्याही खाजगी शिकवणी न लावता आयएएसच्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्या. 
 
 
तामिळनाडूतील सालेमजिल्ह्यात १७० वर्षात २२७ जिल्हाधिकारी होऊन गेले पण रोहिणी यांना पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून मान मिळाला. पण यावरच त्यांचे यश नाही. भारतीय नोकरशाही ही अजगरासारखी आहे. ती हलतच नाही अशी ओरड जनसामान्यात केली जाते. पण सालेमजिल्ह्यात रोहिणी या आपल्या कामामुळे कमालीच्या लोकप्रिय झाल्या. एक कार्यक्रमआटोपून जात होत्या. वाटेत राजपल्लयमगावातील शाळेत वर्ग चालू असण्याच्या वेळेत विद्यार्थी बाहेर खेळत होते. शिक्षकेतर कर्मचा-यांकडे विचारणा केली असता त्यांना कळले की शिक्षक संपावर गेले आहेत. वेळ न दवडता त्यांनी १५ मिनिटे मुलांना इंग्रजी आणि तमिळचे धडे दिले. मिळालेला वेळ त्यांनी असा सत्कारणी लावला. नंतर राज्याच्या शिक्षण खात्यात संपर्क साधून तिथे शिक्षकांची सोय करून दिली. सरकारी नोकरांची मने आटून गेलेली असतात, नियमांवर बोट ठेवून आपले कामकरणारे जिल्हाधिकारी लोकांनी पाहिलेले असतात. पण नियमहे सुशासनासाठी असतात आपला बचाव करण्यासाठी नाही, याचा विसर ब-याच अधिका-यांना पडलेला असतो. ग्रामीण भागातल्या असल्याने त्यांना ग्रामीण प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्या रुग्णालयाला अनेपक्षितपणे भेटी देतात.
 
 
दिवस रात्र जिल्ह्याच्या कार्यासाठी त्या व्यग्र असतात. यात त्यांना साह्य होते ते त्यांच्या पतीचे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तसेच या यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा सक्षम पती आहे. रात्री उशिरापर्यंत रोहिणी यांना काम करावे लागते. त्यांचे पती विजेयेंद्र बिरादरी हे स्वतः स्वयंपाक करतात आणि आपल्या मुलाचा सांभाळ करतात. ‘बेटर इंडिया’ या वेबसाईटने देशातील १० जिल्हाधिका-यांचा सन्मान केला आहे. त्यात रोहिणी भाजीभाकरे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक अभियानात त्या व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून सक्रीय असून त्याचा आढावा घेत असतात. आता त्यांनी प्लास्टिकमुक्त जिल्ह्याचा संकल्प केला आहे. एखाद्या परराज्यात काम करायचे म्हटले की भाषेची अडचण येते. तामिळनाडू सारख्या राज्यात तर अधिकच. रोहिणी यांनी तमिळ भाषेवर प्रभुत्व मिळवत लोकांशी संवाद साधला आणि लोकांच्या जिल्हाधिकारी झाल्या. या संपूर्ण यशात त्यांच्या वडिलांचा आणि पतीचा सिंहाचा वाटा आहे. पती शासकीय सेवेतच असल्याने आपल्या पत्नीचे कार्य त्यांनी समजून घेतले. सालेमच्या लोकांनीही त्यांना आपले मानले आहे. मातीशी घट्ट असलेल्या रोहिणी तिथली एक सेलिब्रिटीच आहे. रोहिणी भाजीभाकरे यांना सालेमची रजनीकांत म्हटल्यास वावगे ठरू नये.
- तुषार ओव्हाळ