निसर्गातील सफाई कर्मचारी गिधाड
 महा एमटीबी  25-Dec-2017
 


 
 
रामायणात देखील सीतेला वाचविण्यासाठी रावणाशी लढलेला जटायू गिधाड सर्वांनाच आठवत असेल. देशात इतके प्रकारचे प्राणी पक्षी आहेत. इतक्या प्रजाती आहेत. ते जगताना जसे एकमेकांवर अवलंबून असतात तसेच त्यापैकी काही प्राणी, पक्षी मेलेल्यांच्या मृतदेहावर अवलंबून असतात. ते म्हणजे गिधाडे. गिधाडांना मृतभक्षक म्हटले जाते. कारण ते फक्त मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात.
 
गिधाडे निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहेत. अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा दुवा असतात. गिधाड हा पक्षी गरूड पक्ष्यापेक्षाही मोठा आणि ताकदवान असतो. तरीही तो शिकार न करता मृतप्राण्यांच्या देहावरच जगतो. गिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींचे मृतदेहांचा फडशा पाडणे हे एकच कार्य असले तरी या सर्व जाती एकमेकांच्या साह्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात व साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेऊन विहार करणे पसंत करतात. भिन्न-भिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. आणि प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. विशेष म्हणजे त्यांच्याजवळ शिकार करण्यासाठी इतर शिकारीठेवण जरी असली (बाकदार चोच, टोकदार नखे इ.) तरी त्यांच्याकडे शिकार करण्याचे तेवढे कौशल्य नसते. या गिधाडांमधील एक इजिप्शियन गिधाड नावाची जात आहे. या जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरतात. त्यामुळे गिधाडांची याच गिधाडावर नजर असते. जेव्हा हे गिधाड खाद्य हेरते तेव्हा ते साहजिकच खाद्य जिथे असेल तिथे उतरते. त्याला उतरताना पाहून इतर गिधाडे पण उतरू लागतात व सगळ्या गिधाडांना खबर मिळते, की खाद्य मिळाले आहे. खाद्यापाशी पोहोचल्यावर गिधाडे बराच वेळ वाट बघत असतात. ही सर्व गिधाडे राज गिधाड येण्याची वाट बघत असतात. मृतदेहांची कातडी बहुधा अत्यंत जाड झालेली असते व बहुतांशी गिधाडांना ती भेदणे आवाक्याबाहेरचे असते. राज गिधाडाने येऊन पहिले काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचे काम चालू होते व पाहता पाहता पूर्ण मृतदेहाचा अक्षरक्षः फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.
 

 
 
 
गिधाडाच्या भारतात काही जाती आढळतात. त्यापैकी -
१. राज गिधाड - हे भारतीय उपखंडात आढळणारे गिधाड आहे. याला लाल डोक्याचे गिधाडही म्हटले जाते. ते मोकळा, शेतीचा प्रदेश आणि अर्ध वाळवंटी प्रदेशात आढळतात. त्याचबरोबर पानगळीची जंगले, नद्यांचे खोरे आणि दर्‍यांमध्येसुद्धा आढळतात. ते समुद्रसपाटीपासून ३००० मी. उंचीपर्यंत आढळतात.
 
२. पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड)- पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते. याचा आकार सुमारे घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते. सगळे शरीर मळकट पांढर्‍या रंगाचे असते. डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात. चोच पिवळी असते. उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात. तर शेपटी पाचरीसारखी, पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक-एकटे किंवा जोडप्याने राहतात.
 
३. काळे गिधाड (सिनेरियस गिधाड) - काळे गिधाड एक मोठा शिकारी पक्षी आहे जो युरेशियातल्या बर्‍याचशा भागात आढळतो. हा जगातील दोन सर्वात मोठ्या गिधाडांच्या प्रजातींपैकी एक आहे. हे पक्षी डोंगराळ, पर्वतमय भागात राहतात. विशेषत: उंचावरील कुरणांसारख्या शुष्क अर्ध-खुल्या प्रदेशात ते राहतात. युरोपमध्ये ते १०० ते २००० मी. उंचापर्यंत आढळतात. आशियात ही गिधाडे आणखी जास्त उंचावर आढळून येतात. या प्रजातीची गिधाडे अतिशय उंचावर उडू शकतात.
 
त्याशिवाय लांब चोचीचे गिधाड, युरेशियन ग्रिफॉन गिधाड, पांढरपाठी गिधाड अशाही काही जाती आहेत. भारतात एकेकाळी गेल्या १५ ते २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचे खाद्य कमी पण झालेले नाही. त्यांच्या लोकसंख्येला मुख्य फटका बसला आहे ते औषधे व रसायनांमुळे. पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध देतात आणि असे औषध घेतलेले प्राणी मेल्यानंतर गिधाडांच्या खाण्यात आल्याने ते औषध त्यांच्या शरीरात जाते त्यामुळे गिधाडांच्या शरीरात अनेक व्याधी होतात व ती मरतात. गिधाडे सुंदर नाहीत आणि ते मृतदेह खात असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना असते. परंतु निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे काम ते करत आहेत. गिधाडे नसतील तर मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका असतो. म्हणून गिधाडांना वाचवले गेले पाहिजे. भारत सरकारने या औषधांवर बंदी आणलेली आहे आहे परंतु त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही. ती आणणे अत्यंत गरजेचे आहे.
 


 
ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील चिरगाव येथे गिधाड संवर्धन प्रकल्प राबविण्यात आला होता. सीस्केप संस्था आणि वनविभागाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला असून आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. कोकणात गिधाडांच्या संख्येत मोठी घट दिसून आली. विशेष म्हणजे आशिया खंडात दुर्मिळ समजली जाणारी पांढर्‍या पाठीची गिधाडे कोकणात अजूनही आढळून येतात. त्यामुळे या गिधाडांचे संवर्धन करणे हे लक्षात घेऊन गिधाड संवर्धन प्रकल्प राबविण्यात आला. चिरगाव येथे जेथे एकेकाळी गिधाडांची एक-दोन घरटी दिसत होती. तिथे आता ३० ते ३५ घरटी पाहायला मिळत आहेत. तसेच गिधाडांची संख्या ८० हून अधिक झाली आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’, ‘रॉयल सोसायटी फॉर द प्रोटक्शन ऑफ द बर्डस् यांच्या सल्ल्यानुसार, हरियाणा-पश्चिम बंगाल-आसाम या राज्य सरकारांनी अनुक्रमे पिंजोर-बुक्सा-रानी या ठिकाणी गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे चालू करून, जगात केवळ १ टक्का शिल्लक राहिलेल्या प्रजातींच्या पिल्लांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. डायक्लोफिनॅकचा अंशही नसलेले बकर्‍याचे मांस या पिल्लांना खाऊ घालण्यात येते. मे २०१३ पर्यंत या संगोपन केंद्रांतील गिधाडांची संख्या २५० च्या वर गेली आहे. गिधाडे ही नैसर्गिक कचरा निर्मुलन करणारी एक महत्त्वाची प्रजाती आहे.
 
गिधाडांचे घरटे नारळाच्या झाडावर किंवा त्याच्या आसपासच्या झाडांवर असते. गिधाडांच्या वास्तव्यामुळे, त्यांच्या हालचालींमुळे तसेच त्यांच्या अतिउष्ण विष्ठा झाडांवर पडल्याने त्या झाडांचे उत्पादन कमी होते. त्यामुळे नारळाच्या बागेच्या मालकांचा या गिधाडांना तेथून हुसकावून लावण्याचा आणि त्यांची झाडावरील घरटी पाडून टाकण्याचा प्रयत्न असतो.
 
सध्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गिधाड संवर्धनाचे काम चालू असताना त्यांच्या अस्तित्वाची परिस्थिती सुधारली नसली तरी त्यांचे अस्तित्व टिकले आहे. मात्र, निसर्गचक्राच्या साखळीतील गिधाड हा महत्त्वाचा दुवा असल्याने तो वाचविणे आवश्यक आहे. आणि याची जाणीव संपूर्ण मानवजातीने ठेवणे आवश्यक आहे.
 
- पूजा सराफ