गुजरातचा धडा!
 महा एमटीबी  25-Dec-2017
 

 
संसद अधिवेशन १५ डिसेंबर रोजी म्हणजे गुजरात निकालांपूर्वी तीन दिवस अगोदर सुरू झाले. पहिल्या दिवशी सरकारच्या एका अति उच्चपदस्थाशी भेट झाली असता, गुजरातमध्ये भाजपा १०० पेक्षा खाली जाणार नाही आणि काँग्रेस ८० पेक्षा वर जाणार नाही, असा अंदाज मी वर्तविला होता. यावर या अति उच्चपदस्थाची प्रतिक्रिया होती, गुजरातचा लंबक एकदम आर या पार होण्याची मुळीही शक्यता नाही. कारण ते गुजरातच्या प्रकृतीत नाही. या अति उच्चपदस्थाचा अंदाज बरोबर ठरला.
 
गुजरातचे निकाल भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांना दिलासा देणारे ठरले. गुजरातची सत्ता कायम राखता आली, हा भाजपासाठी दिलासा होता, तर वाढलेल्या जागा हा काँग्रेससाठी दिलासा होता. आपले मतदान १.२५ टक्क्यांनी वाढले, हा भाजपासाठी समाधानाचा मुद्दा होता, तर आपले मतदान २.४५ टक्क्यांनी वाढले, हा काँग्रेससाठी समाधानाचा मुद्दा होता.
 
मोदींची जादू
 
गुजरातमध्ये मोदींची जादू आहे, हे या निवडणुकीतही दिसले. तीन वर्षांपूर्वी मोदींनी गुजरात सोडल्यानंतर राज्य प्रशासन ढेपाळले, असे जनतेला वाटत होते. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आपल्या क्षमेतेने राज्य सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. गुजरातला वादळ-पाऊस या नैसर्गिक आपत्तींनी झोडपले असताना, रुपानी यांनी बर्‍यापैकी कामगिरी केली. पण, प्रत्येक वेळी त्यांची तुलना मोदींशी केली जात होती. कोणत्याही दोन व्यक्तींशी तुलना केली जाऊ शकत नाही. मोदींच्या तुलनेत रुपानी कमी पडत होते. ही उणीव मोदींनी प्रचारात भरून काढली आणि त्याचा फायदा भाजपाला झाला.
 
राहुलची उपलब्धी
 
काँग्रेसची प्रतिमा मुस्लिम लीगचा लहान भाऊ की मोठा भाऊ, अशी झाली होती. गुजरातच्या निवडणुकीत राहुल गांधींनी ही प्रतिमा बदलविण्याचा प्रयत्न केला व त्यात त्यांना यशही मिळाले. काँग्रेसच्या जागा वाढल्या आणि मतेही वाढली. विशेष म्हणजे राहुल गांधींची स्वत:ची अशी जी प्रतिमा तयार झाली होती, ती त्यांनी नव्याने तयार केली. राजकारण असो की कोणतेही क्षेत्र असो, त्यात यश मिळविण्याची अभिलाषा असणे यात काहीच गैर नाही. मात्र, ते यश मिळविण्यासाठी अपार परिश्रम करावे लागतात. आज गुजरातमध्ये मोदींची जादू चालते तो काही केवळ शब्दांचा खेळ नसतो, तर त्यामागे असतात राज्य चालविताना त्यांनी घेतलेले परिश्रम. हाच नियम राहुल गांधींनाही लागू होतो. गुजरातमध्ये त्यांनी परिश्रम घेतले. काँग्रेस नेत्यांसाठी हा एक सुखद धक्का होता. गुजरातमध्ये आम्हाला एकही जागा मिळाली नाही तरी आम्ही राहुलजींना दोष देणार नाही. कारण, त्यांनी गुजरातची निवडणूक परिश्रमाने लढविली, असे काँग्रेसनेते खाजगीत बोलत होते.
 
गुजरातचा धडा
 
गुजरातचा धडा भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी आहे. गुजरात नावाच्या बालेकिल्ल्यात आपल्याला अटीतटीची झुंज का द्यावी लागली, याचा विचार भाजपाला करावा लागणार आहे. गुजरातच्या रक्तात हिंदुत्व आहे. भाजपाजवळ संघटनात्मक ताकद आहे. मोदींसारखा नेता आहे. राज्याच्या जनतेशी तिच्या भाषेत संवाद करू शकणारा नेता असताना पक्षाला मोठे यश मिळाले नाही, याचा विचार पक्षाला करावा लागेल. सामाजिक समीकरण आणि युवा-शेतकरी यांचाही विचार पक्षाला-सरकारला करावा लागेल.
दुसरीकडे, काँग्रेसलाही आपल्या पराभवाचा विचार करावा लागेल. २२ वर्षे भाजपा सत्तेत असतानाही, त्याचा फायदा आपल्या का उठविता आला नाही, हा काँग्रेससमोरील प्रश्न राहणार आहे.
 
भावी गुजरात
 
गुजरातमध्ये काँग्रेसला भाजपा व मोदींचा मुकाबला करता आला नाही, याचे कारण राज्यात काँग्रेसजवळ नेतृत्व नव्हते. शक्तिसिंह गोहील, अर्जुन मोढवाडिया हे नेते होते. दोघेही या निवडणुकीत पराभूत झाले. काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजावता आली नाही. ती पोकळी भरून काढली हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकोर या नेत्यांच्या उदयाने. हार्दिक पटेलला कमी वयामुळे निवडणूक लढविता आली नव्हती. जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकोर हे दोघेही निवडून आले आहेत. येणार्‍या काळात ते भाजपाची डोकेदुखी ठरणार आहेत. गुजरातमधील या नेत्यांचा उदय दिल्लीतील घटनाक्रमाची आठवण करून देणारा आहे. दिल्लीत शीला दीक्षित सरकार १५ वर्षे टिकले. मागील २४ वर्षांत भाजपाला दिल्ली विधानसभा जिंकता आलेली नाही. कारण, दिल्लीच्या जनतेचा विश्वास संपादन करू शकेल असे नेतृत्व भाजपाला देता आले नाही. फक्त विजेचे वाढते बिल, हा एक मुद्दा भाजपाने हाती घेतला असता, तर शीला दीक्षित १५ वर्षे राज्य करू शकल्या नसत्या. आणि जेव्हा जनतेने काँग्रेसला पराभूत केले, विजय मिळाला तो आम आदमी पक्षाला. कारण, भाजपाला दिल्लीत योग्य नेतृत्व देता आले नाही.
 
हीच स्थिती गुजरातमध्ये काँग्रेसची झाली. गुजरातमध्ये काँग्रेसला नेता लाभला नाही. कारण, अहमद पटेल यांनी कुणाला समोर येऊ दिले नाही आणि अहमद पटेल यांचे नेतृत्व, रक्तात हिंदुत्व असणार्‍या गुजरातला मान्य होऊ शकत नव्हते. समोर मोदींसारखा नेता आणि दुसरीकडे नेतृत्वविहीन काँग्रेस! दिल्लीत ज्याप्रमाणे केजरीवाल यांचा उदय झाला, गुजरातमध्ये हार्दिक पटेल-मेवाणी-अल्पेश ठाकोर यांचा उदय झाला. यात एक फरक होता. केजरीवाल काँग्रेसच्या विरोधात होते, तर गुजरातच्या त्रिकुटाने काँग्रेसचा हात धरला.
 
गुजरातचा परिणाम
 
गुजरात निकालांचा परिणाम विरोधी पक्षांनी राहुल गांधींना नेता मानण्यात होऊ शकतो. याचा संकेत लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे. आम्ही सोनिया गांधींचे नेतृत्व स्वीकारले होते, आता आम्हाला राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यात अडचण नाही. अखिलेश यादव यांनी तर उघडउघड राहुल गांधींचे अभिनंदन केले आहे. भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनाही राहुलला नेता मानण्यास तयार असल्याचे दिसत आहे.
 
पुन्हा सीबीआय
 
युपीए राजवटीत झालेल्या टु-जी घोटाळ्याचा निवाडा लागला आणि सारे आरोपी निर्दोष सुटले. एक लाख ७६ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे म्हटले जात होते. माजी सीएजी विनोद राय यांनी तसा अहवाल दिला होता. हा आकडा अतिशयोक्ती करणारा आहे, असे त्या वेळी बोलले जात होते. घोटाळा झाला तर मग पुरावा कुठे गेला? विशेष न्यायाधीश सैनी म्हणतात, मी सात वर्षे सुनावणी केली. सुटीच्या काळातही केली. मी दररोज पुराव्याची प्रतीक्षा करीत होतो, पण माझ्यासमोर पुरावा आणला गेला नाही. न्या. सैनी यांच्या निकालपत्रात सीबीआयवर जबर तोशेरे ओढण्यात आले आहेत. सर्व महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून सीबीआयला फटकारण्यात आले आहे. आरुषी हत्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले होते. त्याचीच पुनरावृत्ती या प्रकरणात होत आहे. न्या. सैनी यांनी सीबीआयच्या चुकारपणाच्या अनेक बाबी समोर आणल्या आहेत. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयासमोर जे साक्षीदार आले, त्यांच्यापैकी एकालाही सीबीआयने प्रश्नही विचारले नाहीत. या निवाड्याने द्रमुक पक्षाला बळ मिळणार असून, त्याचा परिणाम तामिळनाडूच्या राजकारणावर होणार आहे. तामिळनाडूत सध्या अण्णा द्रमुकचे सरकार आहे. हे सरकार रडतखडत चालत आहे. न्यायालयाच्या निवाड्याने द्रमुकला जणू संजीवनी मिळणार आहे. विशेष म्हणजे निकालानंतर लगेच राहुल गांधी यांनी द्रमुक नेत्यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शुक्रवारी आणखी एका निवाड्यात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श खटला चालविण्याची परवानगी देणारा महाराष्ट्र राज्यपालांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरविला. याचा अर्थ, राज्यपालांसमोर सादर करण्यात आलेले दस्तावेज सबळ नव्हते. या सार्‍याचा विचार सत्ताधारी पक्षास करावा लागणार आहे. आजवर सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती, आता सीबीआयचीच चौकशी करण्याची वेळ आली आहे!
 
रवींद्र दाणी