'पौर्णिमेचा कोकणकडा '
 महा एमटीबी  23-Dec-2017
 
लहानपणापासूनच मला 'रात्र ' ह्या विषयाचं मोठं आकर्षण वाटत आलंय. सूर्य मावळला की अंधार का होतो किंवा कसा होतो असे बरेच प्रश्न तेव्हा मला पडत असत. मला अजूनही आठवतंय की, आजोळी मी रात्री नदी किनारी जायचो. उद्देश एकच की दिवसा दिसणारी नदी, ही रात्री कशी दिसते बघणं. बस्स. पौर्णिमा बघून रात्रीच्या थंड वाऱ्यात आणि सुस्तावलेल्या वाळूवरून नदी किनारा गाठायचा. रात्र ह्या विषयावरचा अभ्यास दौरा संपला की, निमूटपणे घरी यायचं. पुढे शाळा आणि कॉलेज, नोकरी, व्यवसायच्या पसाऱ्यात ते सगळं हरवलं. बहुतांश लोकांची हीच कहाणी असेल. पण माझ्या कहाणीला थोडी कलाटणी मिळाली. माझ्या आयुष्यात सह्याद्री आला आणि हरवलेल्या गोष्टी सापडायला लागल्या. कळत नकळत सह्याद्री माऊलीने माझ्यासाठी खूप काही केलं. आपल्या रोजच्या दैनंदिन जगण्यात स्वतःचं असं जगणंच मुळी राहून गेलंय. मानवी संवेदना टिकून ठेवणं हे एक आव्हान होऊन बसलंय इतके आपण दुर्दैवी होऊन बसलोय. देवाने अतिशय सुंदर गोष्ट निर्माण केली - मानव. पण आज त्याच मानवाला आपलं सौन्दर्य न्याहाळायला घड्याळाचा आधार घ्यावा लागतो. ही अशी गुंतागुंत सोडवण्यासाठी आपल्याला निसर्गाशी गट्टी करायलाच हवी. निसर्ग देवता कोणालाच नाराज करत नाही.
 
 
 
 
माझ्यावर तिचा जरा जास्तच लळा दिसतो. दरवेळेस मला कोणते ना कोणते उपहार ती देत असते. आता ह्याच फोटोचं बघा. माझ्या आजवरच्या 'नाईट फोटोग्राफी 'मधलं हे सर्वात संस्मरणीय ठरलं. घरातून निघताना पौर्णिमेची तारीख बघूनच हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. आम्हा समस्त भटक्या लोकांची पंढरी असणारा असा लाडका हरिश्चंद्रगड. इथे एकदा माणूस आला कि तो इथलाच होऊन जातो. जीव ओवाळून टाकावा असा रौद्र भीषण, अजस्त्र , अक्राळ विक्राळ पण तितकाच नितांत सुंदर असा भव्य 'कोकणकडा'. मी कड्यावर पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा मनात एकच विचार आला कि 'मला जर हजार फूट लांब हात असते तर मी ह्याला कडकडून मिठी मारली असती. असा छातीशी कवटाळलं असतं आणि माझ्या नसानसात स्फुरण चढवलं असतं'. काही क्षणातच सह्याद्रीने मला भानावर यायची आज्ञा केली. मी सुद्धा ती नम्रपणे स्वीकारली. शांत बसून राहिलो कड्यावर. एकटाच. निश्चल. पण कणखर. मी मघाशी 'हरवलेल्या गोष्टी ' म्हणत होतो त्या ह्याच. एका सेकंदात माणसाचा अहंकार , मीपणा गायब करण्याची ताकद ह्या सह्याद्रीमधे आहे. निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत ह्याची जाणीव कोकणकड्यावर झाल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे कोकणकडा काय अफाट चीज आहे हे इथे प्रत्यक्ष आल्याशिवाय समजूच शकत नाही. १८००फूट खोल आणि अर्ध चंद्राकार पसरलेला असा हा कोकणकडा नुसता पायी फिरायचं म्हंटलं तरी तासभर सहज लागतो. ह्याच्या विशिष्ठ अश्या अर्ध वर्तुळ आकारामुळे इथे बारा महिने तुफान वारा असतो. पावसाळ्यात तर पवन राजा उचांक गाठतो. जणू काही हा राजा एखाद्या युद्धावरच निघाला असावा. इतकं सगळं असूनही कड्यावर सूर्यास्त मात्र अतिशय रमणीय व स्वर्गीय असतो. इथून सूर्य नारायण अस्ताला जाताना बघणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटतं. आपल्याला देवाने दृष्टी दिली ह्याचं खर्याअर्थाने चीज होतं ते कोकणकड्यावर. बरेचवेळा मी कॅमेरा मधून फोटो काढायलाच विसरलोय. एक प्रकारची वैचारिक समाधी इथे लागते.
 

 
 
असा हा कोकणकडा एकदा तरी पौर्णिमेच्या रात्री शूट करावा अशी फार इच्छा होती. अखेर योग्य जुळून आला. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मी कोकणकडा गाठला. पावसाळा नुकताच संपला होता त्यामुळे छान हिरवळ सर्वदूर पसरली होती. कड्यावरच तंबू टाकायचं ठरलं. चांदोबा मोठ्या दिमाखात माझं स्वागत करत आपलं डोकं हळू हळू वर काढत होता. त्याच्या शीतल प्रकाशात मन सुखावून गेलं. दिवसभर पडलेले कष्ट एका क्षणात गायब झाले. जसं एखाद्या भळभळणाऱ्या जखमेवर कोणी थंडगार चंदन ओतावं. अगदी तसं. पुन्हा एकदा वैचारिक समाधी अवस्था. रात्र शांत, मन शांत आणि शरीर सुद्धा शांत. आता माझ्या बाजूला होता कॅमेरा, समोर होता कोकणकडा आणि माझ्यावरती होता रात्रीचा जादूगार चन्द्र.
 

 
 
भेटूया पुढच्या लेखात अश्याच एका भन्नाट जागेवर. फिरत राहा आणि सह्याद्रीवर प्रेम करत राहा.
 
 
- अनिकेत कस्तुरे