अंधश्रद्धेचा बळी..
 महा एमटीबी  22-Dec-2017

 
 
११ वर्षाच्या सानिया भेकरेला शौचाला त्रास होत होता. तिच्यावर घरगुती उपचार केले पण तिला बरेच वाटेना. १६ डिसेंबरच्या रात्री रोजी सानिया, सानियाचे वडील अंबाजी, आई मिनाक्षी, मावशी माधुरी आणि १४ वर्षाचा भाऊ यश घरी होते. त्यावेळी अचानक रात्री सानियाच्या आईने अंगात देवी आल्याची बतावणी केली. अंगात देवी आली आहे आणि आपण सानियाला बरे करू, म्हणत ती सानियाच्या अंगावर बसून तिचे पोट दाबू लागली. सानियाच्या तोंडात आणि गुप्तांगात हात घालून अघोरी प्रकार करू लागली. वेदनेने तडफडत असलेल्या सानियाने करूण किंकाळ्या फोडू लागली. आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मग सानियाच्या मावशीने तिचे हातपाय पकडले आणि मिनाक्षीने तिचे तोंड दाबून धरले. सानियाची हालचाल थंडावली. यावर मिनाक्षी आणि माधुरीने घरात उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले की, सानिया बरी झाली. आता थोड्याच वेळात उठेल. पण सकाळ झाली तरी सानिया उठली नाही. श्‍वास गुदमरून कोवळ्या सानियाचा मृत्यू झाला होता.
 
 
दुःख, संताप. अपरिमित वेदना. यापलीकडे मनात भावना उमटतच नाहीत, नव्हे या घटनेमुळे शब्दच आटून गेले आहेत. अंधश्रद्धा, अंधश्रद्धा म्हणून असावी तरी किती? इतकी की, नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्यालाही अंधश्रद्धेच्या नरक यातनेत जाळायचे? सानियाचा खून तिच्या आईने, मावशीने केला. देवी देवतांना बदनाम करून त्यांच्या नावाने स्वतःची तुंबडी भरणार्‍यांविरुद्ध गेली कित्येक शतके समाजाने एल्गार पुकारला आहे. पण तरीही स्वतःच्या मुलीचा जीव घेणार्‍या मिनाक्षीसारख्या स्त्रिया समाजात आजही आहेत. अंधश्रद्धेला समाजात थारा नाहीच. पण तरीही चिमुकली सानिया अघोरी इलाजाने बरी होऊ शकते, अशी घृणास्पद अंधश्रद्धा बाळगत सानियाचा, मृत्यू उघड्या डोळ्याने पाहणारे भेकरे कुटुंब समाजात आजही आहे. बरं, सानियाचा दुर्देवी मृत्यू दुर्गम भागात झाला नाही तर मुंबईच्या जवळ विरारला झाला. ही घटना घडत असताना त्याचे पडसाद शेजारी गेलेच नसतील? काहीही असो सानिया मेली, अंधश्रद्धेला बळी गेली, हेच सत्य आहे. या अंधश्रद्धेने अजून किती बळी जाणार आहेत? अजून किती समाजाचे नुकसान होणार आहे?
 
चक्रव्यूह तोडूया
 
नोंद : या सत्य घटना आहेत.
 
स्थळ - मुंबई गोरेगावच्या आरे कॉलनीतला एक वनवासी पाडा. मोठी माणसं पहिल्या धारेची घेऊन आपल्याच विश्‍वात. दाराशी खेळणारी, झाडांच्या सावलीत बसलेली काही लहान मुलेही याच तंद्रीत म्हणजे त्यांच्या पालकांनी त्यांनाही दारू पाजलेली का? तर मोठी माणसं दारू प्यायलेली किंवा लहान मुलांना दारू पाजलेली होती कारण दारू प्यायलेल्या व्यक्तीला भूत झपाटत नाही, अशी यांची मान्यता. अर्थात ही मान्यता नाहीच. ही अंधश्रद्धाच.
 
 
काल परवाच सोशल मीडियावर एक संदेश फिरत होता. कुंकू लावलेल्या, घुंगट घेतलेल्या स्त्रिया आणि तिलक लावलेले पुरुष बसलेले. समोर स्टेजवर एक पुरुष आणि सफेद कपड्यातल्या स्त्रिया. इतक्यात पुष्पा दिवाडकर नावाची स्त्री वेदनेने विव्हळत येते. तिच्या मणक्याचे हाड तुटल्यामुळे ९ वर्षापासून ती अंथरूणात असून १ वर्षापासून तिच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. ती चालूच शकत नाही पण स्टेजवरचा तो पुरुष तिला डोळे बंद करायला लावतो. मग सुटाबुटातला पुरुष ’’ओ हो तारा सरा सरा,’’असे काहीसे ओरडून म्हणतो, ’’पवित्र येशूच्या नावाने तुझ्या किडन्या बर्‍या होतील. आताच बर्‍या होतील. होतील, होतील, होतील..’’ आणि काय आश्‍चर्य ती पुष्पा नामक बाई उठून उभी राहून आनंदाने नाचते, येशूचे आभार मानते. समोरचे हिंदूसादृश्य लोक या दृश्याने भारावून रडताहेत. उड्या मारताहेेत हे दृश्य. ही घटना म्हणजे शुद्ध फसवणूकच आहे पण तरीही समाजात हे सुखेनैव चालले आहे. वर त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल, अशी व्यवस्थाही होत आहे.
 
 
असो. रे रोडचा मिरादातार दर्ग्याला कसे विसरता येईल? एका चांगल्या घरची दोन मुलांची आई असलेली मर्‍हाटमोळी स्त्री. नवर्‍याची नोकरी सुटली. मुलांचे शिक्षणाचे, खाण्याचे वांधे. विचार करून करून ती स्वतःशी बडबडू लागली. अशा लोकांना भूतच लागते, असा समज. भूत काढायला कुठे न्यायचे तर मिरादातार दर्ग्याला. सर्व जातीधर्मपंथाचे हजारो लोक तिथे आपल्या कुटुंंबातल्या भूत लागलेल्या व्यक्तीला घेऊन येतात. भूत लागलेल्या व्यक्तींना लिंगभेद, वयाची मर्यादा न ठेवता साखळदंडात बांधले जाते. महिनोन्महिने ठेवले जाते. तिथे काय होत असेल? प्रश्‍नच, प्रश्‍न.. वेळ आली आहे या अंधश्रद्धेचा चक्रव्यूह तोडण्याची..
 
- योगिता साळवी