शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा
 महा एमटीबी  21-Dec-2017

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणी

 

 
 
 
पनवेल : ''ज्यांचे उत्पन्न केवळ शेती आहे, अशा सर्व शेतकरी कुटुंबांना खास बाब म्हणून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा,'' अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली.
 
पनवेल तालुका आणि उरण तालुका जो खारफुटीचा भाग आहे, तेथील खारबंदिस्तीच्या तुटण्यामुळे या परिसरातील बहुतांश शेती ही सातत्याने पाण्याखाली जाते, हजारो एकर जमीन पाण्याखाली जाण्याची ही पद्धत गेली तीन ते चार वर्षे प्रथा पडल्यासारखी झालेली आहे आणि त्या ठिकाणी बंदिस्तीची कामे वेळच्या वेळी न झाल्याने येथील शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्याचा उल्लेख ठाकूर यांनी या मुद्द्यात आवर्जून केला.
 
पनवेल तालुक्यातील खारफुटीचा भाग असलेल्या केळवणे, पुनाडे व शेणी येथील बंधारा तुटल्यामुळे हजारो एकर जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची हजारो एकर शेतजमीन गेल्या चार ते पाच वर्षांपासून समुद्राच्या खार्‍या पाण्याखाली बुडाली, त्यामुळे जमीन नापीक होऊन शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
शेतजमिनींच्या नुकसानीचे पंचनामे होऊनसुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाच्या लाभार्थी यादीत या परिसरातील शेतकऱ्यांची नावे नसल्याने शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांकडे शेती उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यामुळे त्यांच्या मनात पसरलेली नैराश्याची भावना तसेच प्रचंड असंतोषाबाबत शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट करून अन्नसुरक्षा अंतर्गत योजनेची तातडीने मदत करण्यासाठी त्वरित कार्यवाही व उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.