देवराई फुलविण्याचे स्वप्न
 महा एमटीबी  21-Dec-2017

गेल्या २० वर्षांपासून सातत्याने तन-मन-धनाने वृक्षसेवा करून शेखर गायकवाड म्हणून ओळखल्या जाणार्‍या, पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या चंद्रशेखर गायकवाड यांनी नाशिक परिसरात वृक्ष लागवडीचा प्रकल्प साध्य केला आहे. आतापर्यंत सुमारे लाखभर वृक्षांची लागवड त्यांनी केली असून त्यापैकी ९० टक्के झाडे नुसती जिवंतच नसून चांगली फोफावली आहेत. डीएमई शिक्षण झालेल्या सटाणा तालुक्यातील रहिवासी असलेल्या गायकवाड यांचे वडील कृषी विभागात अधिकारी होते. मात्र पर्यावरण क्षेत्राची काही पार्श्वभूमी नव्हती. ते राहत असलेल्या उपनगर भागात शेखर गायकवाड यांनी सामूहिक वृक्षारोपणाची संकल्पना नाशिकमध्ये रूजवली. त्यांनी एकट्याने शहराच्या छोट्याशा कोपर्‍यात झाडे लावण्याचे काम१९९४ पासून चालू केले होते. झाडे लावण्यासोबतच जखमी पक्ष्यांना वाचवणे आणि पक्ष्यांसाठी घरटी वाटणे ही कामे गायकवाड यांनी केली आहेत. त्यांनी पक्ष्यांसाठी पंधरा हजार घरटी वाटली आहेत. त्यासाठीचा खर्च ते स्वतःच करतात. ती घरटी प्लायवूडपासून बनवली जातात. त्याशिवाय, शहरात कोठे जखमी पक्षी आढळला की, त्याची सुटका करून त्यावर उपचार करण्यातदेखील गायकवाड आघाडीवर असतात. उपचारासाठी येणार्‍या पक्ष्यांमध्ये पतंगांच्या मांज्यामध्ये अडकून जखमी होणार्‍या पक्ष्यांची संख्या जास्त असते, असे त्यांनी सांगितले.
 
 
रिक्षाचालकापासून उद्योजकापर्यंत सर्वांना पर्यावरणाचं महत्त्व कळावं म्हणून नाशकात दहा हजार नागरिकांकडून दहा हजार झाडं लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली आणि ती यशस्वीदेखील झाली! प्रारंभी कोणत्याही संस्थेच्या मार्फत कामन करणार्‍या शेखर गायकवाड यांनी गेल्यावर्षी ’आपलं पर्यावरण’ या नावाने ग्रुप स्थापन केला आहे. त्या ग्रुपने गेल्या दशकभरात एक लाख झाडे ग्रामीण भागात लावली आहेत. त्यांची ’निसर्गसेवा’ पाहून सुजाता काळे नावाच्या शिक्षिका नाशिकमध्ये ट्यूशनची सर्व मिळकत दर महिन्याला गायकवाड यांच्याकडे आणून देऊ लागल्या आहेत. गायकवाड यांनी वनमहोत्सवासाठी आवाहन केल्यानंतर लोकांमधून सहा लाख रुपयांची वर्गणी जमा झाली. पुणेकरांनी वनमहोत्सवाला दहा हजार झाडांची भेट दिली. पुण्यातील पर्यावरणमित्र धनंजय शेडबाळे यांचे त्यात सहकार्य लाभले. गायकवाड यांच्या मदतनीसांच्या यादीत तुषार गांगुर्डे, राहुल आयरेकर, निलेश रोजेकर, अक्षय भोगले, सुरज मोरे, राजू भालेराव, शरद गायकवाड, सागर दळे आदी आहेत. तसेच त्यांच्या पत्नी गौरी गायकवाड यांनीदेखील पूर्ण सहकार्य केल्याने मोठे कामउभे राहत आहे. गौरी बी.कॉम. पर्यंत शिकलेल्या आहेत. त्यांचा प्रेमविवाह झाला. त्या शेखर गायकवाड यांच्या बर्‍याच कार्यक्रमांचे नियोजन करतात. मग आंदोलन असो की, दहा हजार झाडांची लागवड. कार्यकर्त्यांना जेवण देण्यापासून त्यांच्या व्यक्तिगत मदतीपर्यंत गौरी यांची मदत असते.
 
देवराई ही आपल्याकडील एक पारंपरिक संकल्पना. देवासाठी सोडलेले रान म्हणजे देवराई. बहुतेक जिल्ह्यांत देवराया आहेत. मात्र या नैसर्गिक आहेत. त्यात मानवाचा हस्तक्षेप नाही. गायकवाड यांनी नाशिकजवळील सातपूर येथे फाशीचा डोंगर भागात देवराई फुलविण्याचे स्वप्न पाहिले. गेल्या वर्षी तेथे पंधरा हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्यात तिवस, पळस, धावडा, चिंच, कांदोळ, वरस, बकुळ, आपटा, हळदु, शमी अशा सुमारे १५८ प्रजातींचा समावेश आहे. दोन वर्षात तेथे देवराई फुलेल आणि अनेक पक्षी येतील, असे त्यांनी सांगितले. नाशिकमधील बांधकामव्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेने वनमहोत्सवासाठी सहा लाख रुपयांचे कुंपण तयार करून दिले. सातपूरच नव्हे तर उपनगर, गांधीनगर, म्हसरूळ अशा विविध भागांत त्यांनी वाढविलेले वृक्ष डौलाने नांदत आहेत. स्वच्छता, गणेशमूर्ती दान अशा अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.
 
 
- पद्माकर देशपांडे