समाजस्वास्थ्यासाठी!
 महा एमटीबी  20-Dec-2017

 
 
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीची ओळख ही फक्त लैंगिकच राहिली होती. आजही स्त्रीची ओळख ही लैंगिकच आहे. एक मनुष्य म्हणून तिची ओळख पुसटशी. मुलगा आणि मुलगी जेव्हा वयात येतात तेव्हा मुलीला लगेच सावध राहण्याचे, मर्यादेत राहण्याचे सल्ले दिले जातात. हेच सल्ले मुलांना दिले जात नाही. आणि मुलीच्या कौमार्याला आपल्याकडे अवास्तव महत्त्व दिले जाते. लग्नापूर्वी एका स्त्रीचे शारीरिक संबंध असतील तर तिच्या इभ्रतीचे धिंडवडे काढण्यास आपण मोकळे. कालांतराने स्त्रीशिक्षण वाढले. स्त्रियांनी वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रांत केली पण एका पुरुषाप्रमाणे तिचे स्वातंत्र्य कमीच. तिच्या कौमार्याबद्दल लोकांच्या कमालीच्या अपेक्षा असतात. यात सर्व घटकांतील लोकांचा समावेश आहे. ग्रामीण भागात काही समाजात कौमार्याची चाचणीच केली जाते. यापैकी कंजारभट समाज. या समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूची कौमार्य चाचणी केली जाते. त्यात ती जर यशस्वी झाली तर ठीक पण तिचे कौमार्य लग्नाआधीच भंग झाले असेल तर नाना संकटांना तिला सामोरे जावे लागते. एखाद्या मुलाचे लग्नापूर्वी शारीरिक संबंध असतील तर त्यावर तितकी आगपाखड सोडा साधा विरोधही दर्शवला जात नाही. पण एखाद्या मुलीचे असे संबंध असतील तर घराण्याचे नाक कापले, असे समजले जाते. पण याच समाजातील काही तरुणांनी या चाचणीविरोधात एल्गार उभारला आहे. पुण्यातील कृष्ण आणि अरुणा इंदेकर यांनी सोशल मीडियातून विरोध करण्यास सुरुवात केली आहे. हे दाम्पत्य याच समाजाचे असून २० वर्षांपूर्वी या चाचणीला विरोध केला म्हणून त्यांना वाळीत टाकण्यात आले. वाळीत टाकूनही हे दोघे खचले नाही. चाचणी विरोधात त्यांनी आपला लढा कायमठेवला. समाजातील काही ज्येष्ठांनीही पाठिंबाही दिला पण त्यांना धमक्याही मिळाल्या. ग्रामीण भागात हे नित्याचेच आहे, असे समजून आपल्याला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शहरी भागात कौमार्य चाचणी होत नाही पण अपेक्षित वधू कुमारिका असण्याची अट ठेवणारे महाभागही आपल्याकडे आहेत. ही मानसिकता दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी लैंगिक गरजांकडे उदारपणे पाहणे गरजेचे आहे. ती एक नैसर्गिक गोष्ट असून ठराविक वयानंतर ती मूलभूत गरज असते. लग्नानंतरच ठेवलेले संबंध हे योग्य असतात, असा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याची समाजस्वास्थ्यासाठी नवी दृष्टी निर्माण करण्याची तातडीची गरज आहे.