सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ
 महा एमटीबी  20-Dec-2017

 
 
अनुलोम विकास मेळावा
 
अनुलोमतर्फे रवींद्र नाट्य मंदिराच्या परिसरात भरविण्यात आलेला रविवार, दि.१७ डिसेंबरचा ‘विकास मेळावा’ हा अनेक अर्थाने यशस्वी, लक्षणीय व जमलेल्या सर्वांकरिता चिंतनीय ठरला. संपूर्ण देशात जेव्हा विकासाचे वारे वाहत आहे. सरकार प्रयत्नपूर्वक लोककल्याणार्थ योजना बनवित आहे तेव्हा कोणीतरी या सरकारी योजना व लाभार्थ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा बनून या योजनांना समाजात तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तेच उद्दिष्ट घेऊन अनुलोमने आपली वाटचाल जुलै २०१६ मध्येे सुरू केली. या वाटचालीतला मैलाचा दगड म्हणून या विकास मेळाव्याचा उल्लेख व विवेचन करणे संयुक्तिक होईल.
 
 
अनुलोम संस्कृतीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांना जनसेवक म्हणतो. ‘सेवा है यज्ञ कुंड, समिधासम हम जले’ हे ब्रीद घेऊन जनसेवक कार्य करतात. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असणार्‍या क्षेत्राकरिता विकास मेळावा आयोजित करण्यात आला होता. या विकास मेळाव्याची तयारी गेली तीन महिने सुरू होती. आपल्या या विराट समाजात उपजतच सेवाभाव असणारे असंख्य बंधुभगिनी आहेत. अशा सर्व सेवाभावी बंधुभगिनींना एकत्र आणणे, त्यांचे कार्य ऐकून घेणे व त्यांना तज्ज्ञ लोकांकरवी योग्य मार्गदर्शन उपलब्ध करवून देणे हे नेमके उद्दिष्ट घेऊन ‘विकास मेळाव्याची’ मुहूर्तमेढ झाली.
 
 
विकास मेळाव्याकरिता अनुलोमच्या या एकूण ४३ जनसेवकांनी अक्षरशः मुंबई पिंजून काढली व अंदाजे २६०० विविध स्तराच्या संस्थांशी संपर्क केला होता. गाठीशी अनुभवाची शिदोरी असल्यामुळे निवडक ९५७ संस्थांना अनुलोमच्या या विकास मेळाव्यात निमंत्रित केले होते. त्यातील ५८५ संस्था प्रत्यक्ष उपस्थित झाल्या. या संस्थेचे दोन गट केले होते - १) नोंदणीकृत संस्था २) सामाजिक गट / संस्था आणि जे उत्साही ध्येयवेडी लोक आहेत, नेमके उद्दिष्ट ठरवून समाजकार्य करतात पण जे नोंदणीकृत नाहीत असे. या दोन्ही गटांना सुयोग्य मार्गदर्शनाकरिता विविध चार सत्रांची रचना केली व संपूर्ण दिवसाचा मेळावा ठरला.
 
 
ठरल्याप्रमाणे उद्घाटन सत्राला वंदनीय महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरिजी महाराज, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे उपस्थित होते. कोणत्याही शुभकार्यात धार्मिक अधिष्ठान अत्यंत आवश्यक असते व शिवरायांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा पुढे नेत धर्मदंड दाखवित महामंडलेश्वरांनी अत्यंत मोलाचे आशिर्वचन दिले. डिगे यांनी अत्यंत समर्पक शब्दात संस्था बांधणी व शिस्तबद्ध संस्था संचालनाचे पाठ गिरविले. त्यानंतरच्या ‘अनुभव- एक प्रेरणा’ या सत्रात सिंधुताई सपकाळ, युवकांमध्ये अत्यंत प्रिय व ध्येयवेडा असा सागर रेड्डी व गेली तीन तप कॅन्सर रोग्यांच्या मदतीला धावून जाणारे हरखचंद सावला यांनी सभागृहात टाळ्या व भावनेने भरलेले हुंदके ऐकले. मुळात ध्येयाकरिता झपाटलेल्या मंडळींसमोर या अनुभवी मंडळींनी आपल्या अनुभवाचे बोल मांडले. अवघा उपस्थित श्रोतृवर्ग भारावून गेला होता. या तिन्ही प्रेरक व्यक्तिमत्त्वांना एका सूत्रात गुंफण्याचे कार्य अरुणजी करमरकर यांच्या सारख्या साहित्यातील एका तेजस्वी नक्षत्राने केले.
 
 
संस्था चालविण्याकरिता प्रेरणेसोबत नेमके नीतिनियम माहीत असणे गरजेचे आहे, हे ध्यानात ठेवूनच यापुढील सत्राची योजना केली होती. चार्टर्ड अकाउंटंट असलेले व सध्या स्वतःला या प्रशिक्षणाच्या कार्याकरिता वाहून घेतलेले श्रीराम पटवर्धन यांनी नोंदणीकृत संस्थानासमोर मार्गदर्शन केले. एक बोलकी प्रतिक्रिया अशी होती की ‘कॉम्प्लायन्स’चा इतका किचकट विषय किती सहज व सोपा करून सांगितला हो त्यांनी!’ ही होय. तसेच निव्वळ भावनेपोटी संस्था सुरू करून वार्‍यावर न सोडून देता किती, कशी व केव्हा त्या संस्थेला फुलवित जावे, विकसित करावे या विषयावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या रिसर्च स्कॉलर स्मिता वायंगणकर यांनी. ’’वेळ खूप कमी पडला नाहीतर आम्हाला अजून बरेच विचारायचे, जाणून घ्यायचे होते हो स्मिताताईंकड़ून’’ ही प्रतिक्रिया बरेच काही सांगते.
 
 
समारोपाचे सत्र खूप गाजणार, हे सर्वांच्या ध्यानात आधीच आले होते कारण या सत्राला दोन अष्टपैलू व्यक्तिमत्त्व संबोधित करणार होते. अन्य सात मंत्रालय सांभाळणारे व उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे व मुंबईचे एका अर्थाने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता. आपल्या विशिष्ट शैलीत सरकार व सर्वसामान्य नागरिक यांना जोडण्याचे काम तावडे यांनी चोखपणे केले व उपस्थितांची मने जिंकली. त्या आधी आपल्या छोटेखानी भाषणात अजोय मेहता यांचे आश्वासक व विश्वास निर्माण करणारे संबोधन झाले. या समारोप सत्रात १०० हून अधिक संस्थांचा विनोद व अजोय यांचे हस्ते सत्कारही करण्यात आला. शहरी क्षेत्रातील शासकीय योजनांवर आधारित एक छोटी पुस्तिकेचे प्रकाशनही या प्रसंगी झाले. मेळाव्याचे स्वागत समितीचे अध्यक्ष रमेशभाई शाह व अनुलोमच्या मुंबई विभागाचे जनसेवक जयंतराव कंधारकरांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.
 
 
समाजाचे भले व्हावे व एक बलसंपन्न समाज निर्माण करावा या ध्येयाकरिता आपले जीवन झिजवण्याचे व्रत घेतलेल्या नोंदणीकृत संस्था व सामाजिक गटाचे सेवाव्रती तसेच मोलाचे मार्गदर्शन करणार्‍या वक्त्यांच्या उद्बोधनाने हा विकास मेळावा. हा विकास मेळावा येणार्‍या काळात सर्वांकरिता अत्यंत प्रेरक सिद्ध होईल तसेच जनसहभागाच्या माध्यमातून शासकीय योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचे अनुलोम चे उद्दिष्ट पूर्ण होईल यात यत्किंचितही शंका नाही.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने ’अनुलोम’ अर्थात ’अनुगामी लोकराज्य महाअभियान’ ही स्वयंसेवी संस्था ’सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात १ जुलै २०१६ पासून कार्यरत आहे.एकात्मिक विकास हे उद्दिष्ट घेऊन सर्व समाजाच्या विकासासाठी पुढील वाटचाल म्हणून ’अनुलोम’ने राज्यातील ८ विभागांत विकास मेळावे आयोजित केले आहेत. त्यातील मुंबई विभागाचा प्रथम विकास मेळावा १७ डिसेंबर २०१७ रोजी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी, मुंबई येथे झाला. अनुलोमचे जनसेवक या मेळाव्याबाबत आपले मनोगत व्यक्त करत आहेत अर्पणमस्तूच्या माध्यमातून.
 
 
 
मुंबईतील सामाजिक संस्था आणि सेवाभावी व्रती नागरिक यांचा एक मेळावा म्हणून विकास मेळावा घ्यायचे ठरले. हे शिवधनुष्य मुंबई ’अनुलोम’ने पेलले. मेळाव्याला मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. मुंबईतील विविध संस्थांच्या कार्याची माहिती देणारी प्रदर्शनेही भरविण्यात आली होती. जवळपास ६०० संस्थांचे १५०० प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित राहिले. सरकारी योजना जनसहभागाच्या मदतीने समाजातील अंतिम माणसापर्यंत पोहोचविणे व त्यातून समाजाचा विकास करणे, हे अनुलोमचे कार्य आहे. या कार्याला विकास मेळाव्याच्या माध्यमातून प्रेरणादायी ऊर्जा मिळाली आहे.
जयंत कंधारकर,
मुंबई विभागप्रमुख
 
 
सामाजिक आशय असलेल्या विकास मेळाव्याला कितीजण आले म्हणजे मेळावा यशस्वी झाला असे म्हणू शकतो? त्यावेळी चर्चा करताना उत्तर आले होते, संबंधित विषयातील ३००-४०० लोक आले तरी मेळावा यशस्वी झाला असे म्हणू शकतो. मात्र या सगळ्या विधानांना बाजूला सारत अनुलोम विभागप्रमुख जयंत कंधारकर आणि मेळावाप्रमुख प्रशांत देशपांडे यांनी सांगितले म्हणण्यापेक्षा आम्हा सगळ्यांना पटवून दिले की, आपण निदान १२०० लोकांच्या सहभागाचे लक्ष्य ठेवूया. हे लक्ष पार पाडण्यासाठी मग आम्ही ६ उपविभाग जनसेवक आणि ३५ भाग जनसेवक रात्रंदिवस तयारीला लागलो. प्रत्यक्ष मेळाव्याची वेळ सकाळी दहाची होती. आम्ही सकाळी ९ वाजता पोहोचलो. पाहतो तर काय लोक सकाळी वेळेआधीच मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले होते. आमचे १२०० चे लोकसहभागाचे लक्ष केव्हाच पार करून या मेळाव्याला १५०० च्या वर लोकांनी आपला सहभाग नोंदवला. अनुलोमच्या कामावर लोकांनी दाखवलेला हा विश्‍वास खूप आनंददायी आहे. या मेळाव्यातून मिळालेल्या प्रेरणेतून पुढची वाटचाल नक्कीच सुकर होईल. व्यक्तिगतरित्या अनुलोमचा प्रतिनिधी म्हणून मला या मेळाव्यातून सामाजिक संस्था, ज्यांच्यासाठी काम करायचे तो लोकसमूह आणि सरकारी योजना याविषयी या मेळाव्यातून परिघापलीकडचे अनुभवायला मिळाले.
अरविंद शिंदे,
उपविभाग जनसेवक, दक्षिण मुंबई
प्रथम ४ महिन्यांपूर्वी अतुल वझेंनी काही प्रतिष्ठित उद्योगपतींसोबत भेट घेऊन विकास मेळाव्याची संकल्पना मांडली. तेव्हा त्यातील भव्यता व उदात्त हेतू लक्षात आला. समाजातील वंचित घटकांसाठी काम करणार्‍या संस्थांना व समाजातील संवेदनशील अशा दानशूर व्यक्तींना एकत्र आणून अशा संस्थांना सर्वच बाबतीत बळ प्राप्त करून देणे व सक्षम करणे. त्यातून समाजाने एकात्मिक विकासाकडे वाटचाल करावी. सर्व वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागाचा विकास मेळावा संपन्न करण्याची पूर्वतयारी मुंबईच्या ४३ जनसेवकांनी सुरू केली. सर्वच संघाच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते असल्यामुळे कार्यक्रम व त्याचे नियोजन व्यवस्थापन उत्तम असे होईलच, असा विश्वास होता व सर्व क्षेत्रांत काम करणार्‍या संस्था व व्यक्ती तन मन धन समर्पित करून काम करत आहेत. त्यांना समाजातील फक्त दानशूरच नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने यथाशक्ती बळ प्राप्त करून दिले पाहिजे.
संतोष मेढेकर, 
उपविभाग जनसेवक, उत्तर पश्‍चिम मुंबई..
विकास मेळावा म्हणजे आनंद मेळावाच होता. त्या आनंदातही पुढच्या कालावधीत काय कार्य करायचे याची शिदोरी देणारे अत्यंत महत्त्वाचा मेळावा होता. एक अविस्मरणीय मेळावा असेच म्हणावे लागेल. आम्हाला प्रत्येकाला कामे ठरवून दिली होती. त्या त्या व्यवस्थेची जबाबदारी पार पाडताना खूप काही शिकायला मिळाले. आलेल्या संस्थांची नोंदणी करणे, त्यांची व्यवस्था करणे हे काम म्हणजे एक मोठा अनुभवच होता. संस्थांचा परिचय, त्यांची कामाची दिशा, त्यांनी केलेला संघर्ष आणि समाजाला त्यातून होणारा फायदा हे त्या संस्था प्रतिनिधींच्या माध्यमातून जाणून घेताना अनुलोमच्या माध्यमातून समाजकार्याची नेमकी दिशा कोणती असावी याचे अनेकविध मार्ग सापडले. या मेळाव्याला मान्यवरांनी आपले मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शनही उपस्थितांना दिशादर्शक होते. या संमेलनाने मला खूप आत्मविश्‍वास आणि कामाची दिशा ठरविण्याची संधी दिली आहे
मधू पवार,
उपविभाग जनसेवक, उत्तर पूर्व मुंबई
.
 
 
अनुलोमच्या माध्यमातून आम्ही जो विकास मेळावा मुंबईतील विविध नोंदणीकृत संस्था व सामाजिक गट यांना एकत्रित आणून त्यांना मार्गदर्शन व पुढील वाटचालीसाठी आवश्यक अशी माहिती व मार्गदर्शन देण्याचा एक अनोखा प्रयत्न केला आहे. दिवसभर झालेला पूर्ण कार्यक्रम व त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया ऐकल्यावर असे लक्षात येते की, आम्ही केलेले हे धाडस ही एकूणच सामाजिक कामात रस असणार्‍या संस्थांना व कार्यकर्ते यांना नितांत गरज होती. बहुतांश संस्था व सामाजिक गट यांनी ’’अशा प्रकारचे कार्यक्रम व मार्गदर्शन याची आम्हाला वेळोवेळी गरज भासेल तेव्हा आम्ही तुम्हाला संपर्क करू,’’ असे सांगितले. एवढेच नव्हे तर बर्‍याच जणांनी,’’पुढील काळात आवश्यक असेल तिथे आम्ही अनुलोम सोबत खांद्याला खांदा लावून काम करू,’’ अशाप्रकारे आश्वासनही दिले. अशा प्रतिक्रिया मिळाल्याने आमचा उद्देश सार्थ झाला असे वाटले आणि डोळे भरून आले.
 
काशिनाथ शिंदे, 
उपविभाग जनसेवक, दक्षिण मध्य मुंबई.
 
 
- प्रशांत देशपांडे