'देवा' !! 'टायगर' वरुन राजकीय शाब्दिक मारामारी सुरु
 महा एमटीबी  20-Dec-2017

 
मुंबई : अंकुश चौधरीचा 'देवा' आणि सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मराठमोळ्या अंकुशचा देवा हा चित्रपट अधिक चालेल का सलमानचा टायगर? या वरून सोशल मीडियावर वादळ उठले आहे. आणि याला एक राजकीय रंग आला आहे. मनसेने सर्व एकस्क्रीन धारकांना टायगर प्रदर्शित न करता देवा प्रदर्शित करण्याती तंबी दिली आहे. यामुळे देवाला अनेक राजकीय दिग्गजांचा पाठींबा मिळत आहे, तर काहींनी मनसेच्या या वर्तवणुकीवर टीका देखील केली आहे.
 
 
 
 
देवाच्या संघाने मनसेला सांगितले की त्यांना थिएटर्स मिळत नाहीयेत, त्यानंतर मनसेनं हे पाऊल उचलले असल्याचे आज मनसेतर्फे फेसबुक लाईव्ह दरम्यान सांगण्यात आले. तसेच मनसेने 'यशराज फिल्म' यांच्या वर दादागिरी आणि माज करण्याचा आरोप केला आहे. तसेच फेसबुकवर सध्या ‪#‎isupportdeva‬ हे हॅशटॅग देखील प्रसिद्ध होत आहे. मराठी चित्रपटांसाठी पाठींबा द्या असे आवाहन मनसेतर्फे यावेळी करण्यात आले. आपल्या राज्यात मराठी सिनेमांना स्क्रीन न मिळणे ही शोकांतिका आहे, असेही मनसेतर्फे यावेळी सांगण्यात आले तसेच जी सिनेमागृहे मराठी सिनेमांना स्क्रीन देणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
 
 
 
 
 
यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ''देवा सारख्या मराठी चत्रपटांना नक्कीच पाठींबा दिला पाहीजे मात्र त्यासाठी मनसेचे सिनेमागृह मालकांना धमकावणे सहन केले जावू शकत नाही. मनसेच्या गुंडांच्या गुंडगिरीला थांबविण्यासाठी टायगर जिंदा हैच्या प्रदर्शनावेळी सिनेमागृह मालकांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी." असे आवाहन केले आहे.
 
 
 
 
तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी मनसेच्या निर्णयाला पाठींबा देत 'देवा काय सर्व मराठी सिनेमांना आश्रय दिला पाहीजे, मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे." असे मत व्यक्त केले आहे.
 
 
 
 
नितेश राणे यांनी "महाराष्ट्रात 'देवा' ला मारुन 'टायगर' जिंदा राहत असेल तर ते सिनेमागृह कुठलाच टायगर वाचु शकणार नाही!! महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे!! असे वक्तव्य केले आहे.
 
 
 
 
दरम्यान अक्षय कुमार याने काल मराठीत स्वत:चा एक व्हिडियो पोस्ट करत देवाला पाठींबा दिला आहे. "देव तारी त्याला कोण मारी." असे म्हणत त्याने २२ डिसेंबर रोजी सगळ्यांनी "देवा एक अतरंगी" हा चित्रपट बघण्यासाठी आवाहन केले आहे. स्वत: बॉलिवुड मधील महत्वाचा कलाकार अक्षय याने देवाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे देवा आणि टायगर या दोन्ही चित्रपटांपैकी कुठल्या चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.