रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीला तत्पर सद्गुरूकृपा संस्था
 महा एमटीबी  20-Dec-2017
डोंबिवलीबईकरांसाठी रेल्वे सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. चाकरमान्यांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेतून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करणे क्रमप्राप्त ठरते. वाढती गर्दी व बेशिस्त प्रवासी यामुळे सद्यस्थितीत रेल्वे अपघातांचे प्रमाण हे वाढले आहे. अशा बळी पडणार्‍या अपघातग्रस्तांना रेल्वे प्रशासनाच्यावतीने मदत केली जाते पण ही मदत त्यांच्यापर्यंत काही वेळा विलंबाने पोहोचते. अशा प्रकारे प्रवासादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या सर्वांसाठी डोंबिवलीमधील ‘श्री सद्गुरूकृपा सामाजिक व कल्याणकारी संस्था’ कार्य करीत आहे. पूर्वेतील आयरे रोडवर श्रमपरिहार इमारतीत या संस्थेचे कार्यालय असून गेली १० वर्षे सातत्याने ते रेल्वे अपघातग्रस्त पीडितांसाठी काम पाहत आहेत. गरजूंना रुग्णालयातील वैद्यकीय खर्च देणे, ज्या कुटुंबाचा मुख्य आधार गेला आहे त्यांना आर्थिक मदत देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जबाबदारी घेणे, विवाह लावून देणे, अंत्यविधीसाठी मदतही या संस्थेने केली आहे.
 
 
संस्थेचे सध्या सुमारे ५०० च्या आसपास सभासद आहेत. २०१० मध्ये संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली. त्याद्वारे रेल्वे अपघातातील जखमींना मदत करण्यात येते. आतापर्यंत संस्थेने अनेक गरजूंना मदत केली असून आता नव्याने नवी मुंबई, रायगड, पालघर येथे ही आता संस्थेच्या वतीने काम सुरू करण्यात येणार आहे. या संस्थेने सुरुवातीला रेल्वे अपघातात मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्यांसाठी मदत मिळावी म्हणून कार्यक्रम केले. यासाठी काही ट्रस्ट आणि संस्थेकडून मदत मिळवून त्यांनी आतापर्यंत सुमारे ५० अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे, तसेच समाजातील गरजू मुलांसह सर्वांसाठीच विविध योजनाही त्यांनी आणल्या आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांच्या मदतीने शिक्षणाची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण पुरवण्यासाठी ‘सद्गुरूकृपा सामाजिक संस्था’ कार्य करीत आहे. गेल्या दोन वर्षातील प्रवासी संख्या पाहू. एप्रिल ते सप्टेंबर २०१५ ची प्रवासी संख्या होती ७२ कोटी सहा लाख, तर एप्रिल ते सप्टेंबर २०१६ मध्ये प्रवासी संख्या होती ७४ कोटी १० लाख. तरीही अपघातग्रस्तांना मिळणारा मदतीचा आकडा हा कमी असल्याने ही संस्थेच्यावतीने नाराजी व्यक्त केली आहे. या संस्थेचे काम सचिव प्रकाश पाटील, सल्लागार आरती सिंह, अध्यक्ष स्वानंद भणगे, कार्याध्यक्ष शशिकांत म्हात्रे व रमेश राजे यांच्या वतीने पाहिले जाते.
 
 
संस्थेचे एक वेगळे काम म्हणजे, मुलीच्या जन्माची चाहूल लागताच गर्भातच मुलींचे जीव घेतले जातात. मुलींचे संरक्षण तसेच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाहिजे तितके उपाय निघाले नसल्याने गेल्या वर्षी एप्रिल २०१६ रोजी ’बेटी बचाव योजने’ अंतर्गत दरवर्षी ५०० रुपये संस्थेमार्फत आणि मुलीच्या पित्याकडून ५०० रुपये घेत मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा काढण्याचा अभिनव उपक्रम सुरू आहे. एखाद्या अपघातग्रस्त रुग्णाच्या आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यास त्या घरातील मुलांना आवश्यक असलेले शालेय साहित्य तसेच २००० रुपयांची आर्थिक मदतही या संस्थेच्यावतीने केली जाते.
 
 
आपण पाहतो की, रेल्वे अपघातात मरण पावलेल्या किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यासाठी विलंब लागतो. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी संस्थेच्या वतीने पीडित कुटुंबांनी संस्थेच्या मोबाईल क्रमांकावर ‘मिसकॅाल द्या व मदत मिळवा’ असा उपक्रम ऑगस्ट २०१७ मध्ये सुरू केला. रेल्वेच्या अपघातानंतर अपघाताचे ठिकाण, अपघातग्रस्तांचा पत्ता याबाबत अनेकदा पोलिसांकडून योग्य प्रकारे नोंद केली जात नाही.त्यामुळे अपघातग्रस्त तसेच मृतांच्या नातेवाईकांना योग्य प्रकारे आर्थिक मदत पोहोचत नसल्याने या उपक्रमामुळे पीडितांना मदत पोहोचविण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला जात आहे. मिस कॉल दिल्यानंतर स्वतः संपर्क करून पीडितांच्या घरची परिस्थिती पाहून या संस्थेच्या वतीने मदत केली जात आहे. यात रेल्वे अपघातग्रस्तांसह रस्ता अपघातग्रस्त पीडितांना संस्थेच्यावतीने मदत दिली जाते.
 
 
हॉस्पिटलमधील उपचाराचा वाढता खर्च व औषधांच्या किमतीचे वाढते आकडे, परिणामी उपचाराकरिता वाढणारे कर्ज आणि अशा कात्रीत अडकलेल्या डोंबिवलीकरांना ‘सद्गुरूकृपा संस्थे’च्या वतीने डोंबिवलीतील ४५ रुग्णालयांत सवलतीच्या दरात उपचाराचा मार्ग खुला करण्यात आला आहे. तसेच अपघातग्रस्त रुग्णासाठी डोंबिवलीतील ११७ हॉस्पिटल्सपैकी ४५ हॉस्पिटलनेही त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. हॉस्पिटलशी संस्था संलग्न असून शहरातील आर्थिकरित्या दुर्बल रहिवाशांना अत्यल्प शुल्क भरून उपक्रमाचे सदस्यत्व घेता येणार आहे. उपक्रमातील सहभागींना संस्थेशी संलग्न असणार्‍या कोणत्याही रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार घेता येणार आहेत.
 
 
याही पुढे जाऊन संस्था रेल्वे गाडीतून पडून मृत्युमुखी पडलेल्या किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेल्यासांठी एक रुपया ही न घेता न्यायालयीन लढा देते. रेल्वे अपघातात कर्ता पुरुष गमावल्यानंतर अनेक कुटुंबीयांवर दुःख आणि संकटांची कुर्‍हाड कोसळते. अनेक कुटुंबे यामुळे उद्ध्वस्त होतात. या सर्व कुटुंबातील लोकांना न्याय मिळावा म्हणून ही संस्था कार्य करीत आहे. यासाठी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकाकडून फक्त कागदपत्रे मागविण्यात येतात. यासाठी संस्थान एक रुपयाही कुटुंबातल्या लोकांकडून घेत नाही.
 
 
प्रकाश पाटील म्हणतात की, ’’रेल्वे अपघाताच्या भयावह रूपाची जाणीव आपल्याला तितकीशी प्रथमदर्शी येत नाही, पण याचे वास्तव आम्हाला काही वर्षांपूर्वी रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने झाली. या स्फोटाने अपघाताची तीव्रता जाणवून दिली. या बॉम्बस्फोटात काही प्रवाशांनी आपला जीव गमवला. त्याची माहिती जगासमोर आली, पण त्यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत आम्ही डोळ्यांनी पहिली. यासाठी काम करणे गरजेचे आहे. याची जाणीव आम्हाला झाली. त्यामुळे मी व आमचे कार्याध्यक्ष शशिकांत म्हात्रे यांनी या कामाला सुरुवात केली. या कामादरम्यान प्रत्यक्ष कुटुंबांना भेटून त्यांना योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला जातो.ही मदत आर्थिक स्वरूपाचीच नसून यात भावनिक पाठबळही या त्रस्त कुटुंबीयांना देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या अपघातग्रस्तांची संख्या जास्त आहे. यात लागेल तेवढे आर्थिक बळ आमच्याकडे नाही यासाठी गोदरेज फाऊंडेशन संस्थेला दरवर्षी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करते.डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थेच्या वतीने हा मदतीचा हात देऊ केला आहे. यामधून संस्था गरजूंना मदत करीत आहे. या साठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारदरबारी खेटे घालीत आहोत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन देण्यात आले असून जिल्हाधिकार्‍यांनीही समाजकार्याला मदत करावी, असे मत पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. तसेच रेल्वे अपघातग्रस्त कुटुंबांना सावरण्यासाठी आमच्या परीने आम्ही काम करत आहोतच पण यासाठी इतर सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थांनी सहकार्य असे आवाहन पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
- रश्मी खोत