आपल्या डोळ्यातील मुसळ!
 महा एमटीबी  20-Dec-2017
 
 
 
शिवसेनेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. विरोधी पक्षांमध्ये असूया असणे हे साहजिक आहे, पण मित्रपक्षातच मतभेदापेक्षा मनभेद वाढले असतील तर मात्र राजकीय मैत्री ही आभासी ठरते. भाजपसारखा पक्ष मागून येऊन राज्य काबीज करतो, हे मोठ्या भावाची भूमिका बजावलेल्या शिवसेनेला अजून रुचत नाहीय आणि ती रुखरुख अजून काही संपत नाहीय. खरं तर मोदीलाटेत सेनेचे आतापर्यंत सर्वाधिक खासदार निवडून आले. मित्रपक्षाची वाढलेली ताकद ही सेनेला मान्यच नाही किंवा ती मान्य करण्याची त्यांची मनस्थितीच नाही. आताही गुजरात निवडणुकीवरून ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-या दैनिकात सेनेने आपला राजकीय बाळबोधपणा दाखवला. गुजरात काठावर पास म्हणून त्यांनी गुजरात निवडणुकीचे वर्णन केले आणि राहुल गांधींची प्रशंसा केली. सेनेने या युवराजांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या युवराजांकडे लक्ष दिले असते तर आता जेवढी वाईट अवस्था आहे तितकी झाली नसती. देशात मोदी लाट असताना युवराजांनीच राज्यात १५० चा हट्ट धरला. पक्षप्रमुखांनीही तो हट्ट मान्य केला. जनतेनेही त्यांच्या पारड्यात ६३ जागा टाकल्या. पदरी पडलं, पवित्र झालं असे म्हणून सेनेने राज्यासाठी कामकरणे गरजेचे होते पण दररोज खुसपटं काढायची, मोदींवर टीका, अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा सपाटाच सेनेने लावला. कालच्या अग्रलेखात भावनिक मुद्द्यावर भाजपने निवडणूक लढवली असे नमूद केले आहे. पण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की, मुंबई राज्यापासून तोडण्याचा डाव आहे अशी आवई कोण उठवतं? पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीमअसे मुद्दे गुजरात निवडणुकीत गाजले, असे सेनेचे म्हणणे आहे. मुस्लिमांचा मताधिकार काढून टाका, असे जहाल मत देणा-या सेनेने अशा मुद्द्यांबद्दल बोलणे कितपत योग्य आहे? काठावर पास असे विश्लेषण सामनात केले गेले पण गेली २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या सेनेला कितीवेळा स्वबळावर पालिका जिंकली आहे? खरंतर सेनेने सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ५० वर्षे जुन्या असलेल्या प्रादेशिक पक्षाला राज्यात अजूनपर्यंत स्वबळावर निवडून येता आले नाही, याचे कारण त्यांनीच शोधणे गरजेचे आहे. सेनेला स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुस-यांच्या डोळ्यातील कुसळ मात्र दिसते.