'हे' आहे रिंकूच्या नव्या चित्रपटाचे नाव...
 महा एमटीबी  19-Dec-2017

 
नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेला सैराट हा मराठी चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला व या चित्रपटाने आतापर्यंतचे मराठीतील सर्व विक्रम मोडीत काढत नवे विक्रम रचले. या चित्रपटाने विक्रम तर रचलेच परंतु त्याशिवाय दोन नवे कलाकार चित्रसृष्टीला मिळवून दिले. त्यातला रिंकू राजगुरू या अभिनेत्रीचा दुसरा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार अशी घोषणा गेल्या काही दिवसात झाली होती. आज या चित्रपटाचे नावही जाहीर करण्यात आले आहे. 'कागर' असे या चित्रपटाचे नाव असेल.
 
 
मकरंद माने 'कागर' हा चित्रपट दिग्दर्शित करत असून यामध्ये रिंकू राजगुरू आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसेल. चित्रपटाच्या नावाचा लोगो आज 'उदाहरणार्थ निर्मित' यांच्या सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टवर लिहिलेल्या मजकुरावरून लगेचच लक्षात येत आहे की या चित्रपटातूनही कोणत्यातरी गहन अशा सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. समाजात घडणारी एखादी अन्यायकारक घटना व त्याविरुद्ध केलेला उठाव म्हणजे बहुदा 'कागर' असावा. रिंकूच्या पहिल्या म्हणजे सैराट या चित्रपटातूनही अशाच प्रकारचे सामाजिक प्रश्नावर जळजळीत भाष्य करण्यात आले होते. 'कागर'च्या नावातही एका पानाची पालवी दाखवली आहे व त्याखाली रक्ताचे प्रतिक असणारा लाल रंग दाखविण्यात आला आहे. मराठीतील एक वेगळ्या धाटणीची 'सस्पेन्स' मूव्ही म्हणून याकडे पहिले जात आहे.
 

 

'कागर' चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते यांच्यासोबत रिंकू राजगुरू
 
 
मकरंद मानेने या पूर्वी 'रिंगण' या राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'कागर' ची कथा व पथकथा मकरंदचीच असल्याने त्याचा दिग्दर्शनावर पगडा असणार यात शंका नाही. रिंकू सोबत या चित्रपटात अभिनेता म्हणून कोण दिसणार किंवा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार या बाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सुधीर कोलते व विकास हांडे यांनी हे या चित्रपटाचे निर्मिते आहेत.