यंदा 'तरुणाई' विषयावर रंगणार १६ वा 'पिफ'
 महा एमटीबी  19-Dec-2017
 
 
 
 
 
 
पुणे : ११ जानेवारी २०१८ पासून सुरु होणा-या १६ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ पुण्यातील चित्रपटगृहात रंगणार आहे. यावेळी या महोत्सवाचा विषय तरुणाईवर आधारित असणार आहे, १६ वे वर्ष सगळ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो म्हणून या १६ व्या वर्षानिमित्त हा विषय निवडण्यात आला आहे, अशी माहिती ‘पिफ’चे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
 
 
या महोत्सवासाठी संपूर्ण जगभरातून वेगवेगळ्या चित्रपट महाविद्यालयातून विद्यार्थी विभागासाठी ३०० एंट्री आलेल्या आहेत यामधील काही चित्रपट हे १२ फिक्शन आणि १४ अॅनिमेशन अशा स्वरुपात विभागले जाणार आहेत. तरुणाईकडून सादर केले जाणारे हे चित्रपट गुणवत्तापूर्ण असणार आहेत.
 
 
तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ‘पिफ’मध्ये दरवर्षी ऑनलाईन नोंदणी करता येते मात्र, या वर्षी ऑनलाईन नोंदणी सोबतच ऑनलाईन पेमेंटची सुविधाही देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी www.piffindia.com या संकेतस्थळावर नोंदणीची सुरुवात झाली असून २० डिसेंबरपासून सिटीप्राईड कोथरुड, सिटीप्राईड सातारा आणि शिवाजीनगर येथील मंगला या चित्रपटगृहांमध्ये प्रत्यक्ष नोंदणीही (स्पॉट रजिस्ट्रेशन) सुरु करण्यात येणार आहे.
 

 
 
‘पिफ’मध्ये सहभागी होण्यासाठी भारतासह अफगाणिस्थान, अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया , बांगलादेश, बेल्जियम, चिली, जर्मनी, ग्रीस, क्युबा, फ्रान्स, इस्राइल, चीन, नेदरलंड, स्वित्झर्लंड यासारख्या ९१ देशांनी सहभाग नोंदवला आहे. या देशांकडून १००८ चित्रपट आले असून यातील २०० पेक्षा अधिक चित्रपट विविध चित्रपटगृहांमध्ये पहायला मिळणार आहेत.