धाकडगर्ल ते विनर रनर
 महा एमटीबी  18-Dec-2017

 
 
धावपटूंचे एक आवडते वाक्य आहे. ’मी थकलोय आता मला धावायला हवे. अर्थात ’एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार होता’ म्हणत ठरवलेल्या ध्येयासाठी वेडेपिसे होऊन तन्मयतेने जीव ओतणारेच आयुष्यात ठरवलेल्या स्पर्धेत यश खेचून आणतात. अशा लक्ष्य ठरवून सातत्यपूर्ण प्रयत्न करणार्‍यांमध्ये संजीवनी जाधव या युवतीचे नाव आज घ्यावेच लागेल.
 
 
१२ जुलै १९९६ रोजी नाशिकच्या चांदवडमधील वडाळीभोई गावात संजीवनीचा जन्म झाला. मुलगा मुलगी भेद न करता संजीवनीला लहानपणापासूनच स्वतंत्र इच्छाआकांक्षा असलेली सुसंंस्कारी व्यक्ती म्हणून घडवले गेले. बालपणापासूनच संजीवनीला जे आवडले ते करायला घरातून आडकाठी केली गेली नाही. त्यामुळे संजीवनीने खास मुलींसाठी ठरवून दिलेल्या खेळांना दूर सारून कुस्ती शिकायचे, खेळायचे ठरवले. (याचे कारण असेही असेल की तिचे आजोबा कुस्तीपटू होते.) पुरोगामी महाराष्ट्रातल्या वडाळीभोई गावासारख्या छोट्या गावाने संजीवनीला बिल्कुल निरूत्साहित केले नाही. संजीवनी कुस्तीचा सराव करू लागली. गावातल्या भल्या भल्या कुस्तीपटूंना चीत करू लागली. संजीवनी कुस्ती खेळते, तिचे डावपेच पाहण्यासाठी पंचक्रोशीचे मल्ल जमत. संजीवनी कुस्तीपटू होणार आणि गावाचे नाव रोशन करणार याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. हो, हेही सांगायलाच हवे की त्यावेळी दंगल सिनेमा प्रकाशित झाला नव्हता की तो सिनेमा पाहून संजीवनीला कुस्तीची आवड व्हावी आणि घरातल्यांनी आणि गावातल्यांनी तिला सहकार्य करावे.
 
 
असो, पुढे संजीवनी नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिकायला गेली. आधीच खेळाची आवड असलेल्या संजीवनीचे लक्ष्य इथे आल्यावर बदलूनच गेले. कुस्तीला राम राम ठोकून ती धावण्यामध्ये रमू लागली. धावायचं. बस्स धावायचं. त्यावेळी नाशिकच्या कन्या कविता राऊत, मोनिका आथरे या धावपटू तारका म्हणून प्रकाशात आल्या होत्या. त्यांची मेहनत, त्यांचा सराव, खेळाप्रती त्यांची निष्ठा, खेळाची आवड असलेल्या संजीवनीला भारावून टाके. कविता राऊत यांचे प्रशिक्षक नाशिकचे साई सेंटरचे विजय सिंग होते. २०१२ साली संजीवनीने त्यांंच्याकडे धावण्याचा सराव करण्याचे शिक्षण सुरू केले. प्रचंड मेहनत, सराव, पथ्य आणि शिस्त यावर हे प्रशिक्षण आधारित. पण कुस्तीसारख्या रांगड्या खेळात भल्याभल्यांना चीत करणार्‍या संजीवनीला धावपटू होण्यासाठीची जीवतोड मेहनत करताना त्रास झाला नाही. त्रास वाटला तरी घेतलेला वसा होताच की ’एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार..’ त्यामुळे कठोर मेहनतीने संजीवनी एक धावपटू म्हणून मैदानात उतरली. सर्वप्रथम २०१३ साली मलेशिया इथे होणार्‍या आशियाई शालेय क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली. वडाळीभोई ते मलेशिया ही फारच मोठी झेप होती पण पहिल्याच प्रयत्नात १५०० आणि ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने बाजी मारली. पुढे संजीवनीने मागे वळून पाहिलेच नाही.
 
 
वर्ल्ड स्कूल ऑलिम्पियाडमध्येही तिनेे विशेष कामगिरी केली तर जुलै २०१७ ला भुवनेश्‍वर इथे झालेल्या आशियान ऍथेलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ५००० मीटर धावण्यामध्ये ब्रॉन्झ पदक मिळवले आणि लगेच ऑगस्टमध्ये २९ व्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेममध्ये १० मीटर धावणीमध्ये रौप्यपदक पटकावले. १५०० मीटर धावणीपासून पुढे १० हजार मीटर धावणीपर्यंत संजीवनीच्या खेळाचा चढता आलेख आहे. अवघी २०-२१ वर्षांची ही नाशिककन्या ’रन भारत रन’ म्हणत भारतीय स्त्री-शक्तीची प्रतिमा दिप्तीमान करत आहे. धाकडगर्ल ते विनर रनर पर्यंतचा संजीवनीचा प्रवास म्हणजे प्रत्येक सेकंद ध्येयशील सरावाचा, शिस्तपूर्ण कष्टाचा आहे.