गुजरात-हिमाचलचे निकाल!
 महा एमटीबी  18-Dec-2017
 
 
पी. व्ही. नरसिंहराव हे एक दार्शनिक पंतप्रधान होते. पंतप्रधानपद गेल्यावर त्यांच्यावर एका प्रकरणात न्यायालयीन कारवाई होण्याचा प्रसंग आल्यावर राव यांची प्रतिकि‘या होती, राजकारणात कधीही पूर्णविराम नसतो, असतो तो स्वल्पविराम. राव फार नेमके व मार्मिक बोलले होते.
 
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होतील. त्यांना फार महत्त्व देत राजकीय कयास लावले जात आहेत. भाजपाची पीछेहाट झाली तर भाजपाला लोकसभा जिंकणे जड जाईल आणि काँग्रेसला थोडे यश मिळाल्यास 2019 मध्ये काँग्रेसचे आव्हान तयार होईल असे जे चित्र रंगिवले जात आहे, तसे काहीही होण्याची शक्यता दिसत नाही.
 
27 वर्षांचा विक्रम
गुजरातमध्ये भाजपा 22 वर्षांपासून नव्हे, 27 वर्षांपासून एकही निवडणूक हारलेली नाही. एकदा चिमणभाई पटेल यांच्यासोबत युती असताना, भाजपाने 12 जागा लढविल्या होत्या व सर्व 12 लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर भाजपाने स्वबळावर लोकसभेच्या सर्व जागा लढविल्या व 26 पैकी 20 जागा भाजपाला मिळाल्या. तो विक‘म मोडला गेला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत. भाजपाने राज्यातील 26 पैकी 26 जागा जिंकल्या आणि आता 2017 च्या शेवटी विधानसभा निवडणूक होत असताना त्यात काय होईल याचे उत्तर आज मिळेल.
 
एक्झिट पोल
गुजरातमधील मतदान 14 तारखेला आटोपले आणि सर्व जनमत चाचण्यांनी भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तविला आहे. या सर्व जनमत चाचण्या खोट्या ठरतील असे वाटत नाही. मात्र, कोणत्या चॅनेलचा एक्झिट पोल खरा ठरेल हेही सांगता येणार नाही.
चाणक्यचा एक्झिट पोल फार नेमका असल्याचे मानले जाते. मात्र, याच चाणक्यने 2015 च्या बिहार निवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांना 155 जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता आणि झाले भलतेच. लालूप्रसाद-नितीशकुमार-काँग्रेस यांच्या महायुतीला 178 जागा मिळाल्या. 2017 च्या प्रारंभी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीबाबतही चाणक्यचा एक्झिट पोल साफ चुकला होता. काँग्रेस व आम आदमी पक्ष यांना 54-54 जागा मिळतील असे या चाचणीत म्हटले होते. प्रत्यक्षात काँग‘ेसला 77 तर आम आदमी पक्षाला 20 जागा मिळाल्या. मात्र, पश्चिम बंगालबाबत चाणक्यचा एक्झिट पोल नेमका ठरला होता. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 294 पैकी 170-180 जागा मिळतील, असे इतर चाचण्यांनी म्हटले असताना, चाणक्यने 210 चा आकडा दिला व ममताला त्यापेक्षा तीन जागा अधिक मिळाल्या. चाणक्यसारखीच स्थिती अन्य चॅनेलवाल्यांची आहे. पंजाब, बिहार या राज्यांत एकाही चॅनेलचा एक्झिट पोल बरोबर निघाला नव्हता. दिल्लीतही हेच झाले होते. हे सारे एक्झिट पोल एकाचवेळी खरे ठरणार नाहीत. यातील एकाचा अंदाज बरोबर ठरू शकतो. तो कोणता असेल हे काही तासात स्पष्ट होईल.
 
सट्टा बाजार
राजकीय नेते एक्झिट पोलपेक्षा सट्टा बाजाराला अधिक महत्त्व देतात. पण, सट्टा बाजाराचे गणित अनेकदा चुकले आहे. गुजरातमध्ये भाजपा जिंकेल असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. ज्या वेळी एक्झिट पोलचा अंदाज चुकला, सट्टा बाजारही चुकला असा अनुभव आहे. एक्झिट पोल करणारे सट्टा बाजाराचे आकडे विचारात घेतात की सट्टा बाजारावाले एक्झिट पोलचा अंदाज घेतात हे सांगणे अवघड आहे.
 
काँग्रेसचा अंदाज
काँग्रेसचा अंदाज स्पष्ट बहुमताचा नाही. सरकार भाजपाचेच येईल हे काँग्रेसला वाटते. मात्र भाजपा शतक गाठू शकणार नाही असा पक्षाचा अंदाज आहे. भाजपा व काँग्रेस यांच्या जागांमध्ये अंतर फार असेल असे सांगताना एक नेते म्हणाले, आमची स्थिती निश्चितपणे सुधारणार आहे. मात्र ती किती सुधारेल हे सांगता येणार नाही. आमच्या जागा वाढतील. 2012 च्या निवडणुकीत आम्हाला 61 जागा मिळाल्या होत्या. त्या आता किमान 80 होतील असा आमचा अंदाज आहे. अपक्षांना दोन-चार जागा मिळतील. म्हणजे भाजपाला 100 पेक्षा कमी जागा मिळतील. तर दुसरीकडे भाजपा गोटातून 110 ते 115 जागांचा अंदाज वर्तविला जात आहे. म्हणजे चाणक्यच्या अंदाजाप्रमाणे 135 वगैरे जागा मिळणार नाहीत व 100 पेक्षा कमी जागाही मिळणार नाहीत. साधारतणत: 115 जागा पक्षाला मिळतील असे पक्षात म्हटले जात आहे.
 
परिणाम नाही
गुजरातचे निकाल काहीही लागले तरी त्याचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा भाजपाला मिळाल्या. विधानसभेच्या 70 पैकी 63 मतदारसंघात भाजपाला आघाडी होती आणि 10 महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 70 पैकी 3 जागा मिळाल्या आणि हा केवळ अपवाद नाही. अनेकदा हे होत आले आहे. डिसेंबर 1998 मध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश या चारही राज्यातील निवडणुका भाजपाने गमावल्या आणि काही महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला या चार राज्यांत चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्ष बाकी आहे. या काळातील घटनाक‘म काय असेल, आर्थिक स्थिती काय होईल याचा अंदाज कुणालाही बांधता येणार नाही आणि म्हणून 2019च्या निवडणुकीवर गुजरातचा परिणाम होईल हेही मानता येणार नाही.
 
एकदिवसीय सामना
लोकसभा-विधानसभांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहात असला तरी निवडणुकींना पाच दिवसीय कसोटी सामन्याऐवजी एकदिवसीय सामन्याचे स्वरूप आले आहे. एकदिवसीय सामन्यात शेवटची पाच सहा षटके महत्त्वाची व निर्णायक ठरतात. तसेच निवडणुकींचे झाले आहे. शेवटचे सहा महिने महत्त्वाचे ठरतात आणि त्याचाच परिणाम निवडणुकीवर होत असतो. कि‘केटच्या एका सामन्याचा परिणाम दुसर्‍या सामन्यावर होत नसतो. तसेच निवडणुकीचे असते. एका निवडणुकीचा परिणाम दुसर्‍या निवडणुकीवर होत नसतो.
 
तेलाचा भडका
नरेंद्र मोदी हे एक भाग्यवान पंतप्रधान आहेत. कारण ते पंतप्रधान झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या नव्हत्या, असे सांगितले जात होते. ते खरेही होते. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. एका बॅरेलची किंमत 65 डॉलरच्या पुढे गेली आहे. मोदी सरकारसाठी ही एक चिंतेची बाब आहे. कारण, तेलाच्या किमती वाढल्या की, त्याचा अर्थव्यवस्थेवर लगेच परिणाम होतो. सामान्य माणूस लगेच नाराज होतो. ओपेक राष्ट्रांनी तेलाचे उत्पादन घटविण्याचे ठरविले असल्याने, या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकारला हे आव्हान हाताळावे लागेल. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका जवळ येत असताना, तेलाच्या किमतीचा उडालेला भडका सरकारसाठी चिंतेचे कारण ठरू शकतो.
गुजरात वा हिमाचल प्रदेशाचे निकाल लोकसभा निवडणुकीला प्रभावित करणार नाहीत, मात्र तेलाच्या वाढत्या किमती लोकसभा निकालांना प्रभावित करू शकतात. कारण, पेट्रोल-डिझेलचे भाव प्रत्येकाच्या खिशाला प्रभावित करीत असतात.