किस्से आणि विरोधकांवर कुराघोडीचा पहिला आठवडा
 महा एमटीबी  17-Dec-2017

विधिमंडळ अधिवेशन समालोचन

 

 
 
  
नागपूर, (राजेश प्रभु साळगांवकर) : नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा आमदार आणि मंत्र्यांचे किस्से भाजपची विरोधकांवर कुरघोडी यांचा होता, असे म्हटले तर वावगे होणार नाही. पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज तहकूब करण्याची परंपरा असताना विधान परिषदेत सभापती निंबाळकर यांनी श्रद्धांजली नंतर सभागृह तहकूब करण्याऐवजी विरोधकांना चर्चा उपस्थित करण्यास परवानगी दिल्याने महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत दादा पाटील आणि गिरीश बापट हे संतप्त झाल्याचे दिसले.
 
पहिल्याच दिवशी परिषदेत त्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. दुसऱ्या दिवशी विरोधकांचा एकत्र मोर्चा - जन आक्रोश आणि हल्लाबोल - असल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडण्यात आले. तिसऱ्या दिवशी विधानसभा सुरळीत सुरू झाली, मात्र विधान परिषदेत गोंधळ सुरूच होता. त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील संतप्त झालेले दिसत होते. एरवी चंद्रकांत दादा शांत असतात. पण विरोधकांच्या "धोरणा"मुळे कामकाज अडल्याने दादांनी संताप बोलून दाखवला. सभापतींकडच्या बैठकीत विरोधक कामकाज करण्याचे मान्य करतात, पण सभागृहात गोंधळ सुरू ठेवतात, असे ते म्हणाले.
 
याविषयावर पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, "सभागृहात आमचे बहुमत आहे, हे लक्षात आणून देण्यासाठी एकच दिवस कामकाज रोखण्याचे धोरण ठरले होते. पण "ते" (राष्ट्रवादी) ऐकत नाहीत, असे दिसते आहे."
 
या आठवड्यात इतके किस्से घडले की हे अधिवेशन किस्स्यांचे अधिवेशन ठरावे. एक दिवस रात्री लुंगी टीशर्ट अश्या वेशात एकटेच फिरत सदभाऊंच्या बंगल्यावर आलेल्या महादेव जानकरांना पोलिसांनी दोन ठिकाणी अडवले. त्यावर जानकरांनी सदाभाऊंना, "तू राज्यमंत्री असून केबिनेट मंत्र्याला तुझा पोलीस अडवतो, असे कसले तुमचे राज्य...?" असा चिमटा काढला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या पाशा पटेल यांनी, "अरे मला सरकार ऑफिस देत नव्हते, तर सदाभाऊंनी मला स्वत:च्या कार्यालयातील कोपरा दिला. त्यांना बोलायचे नाही," असा गोड दम दिला.
 
सभागृहात दुधसंघाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना अजित दादांनी अध्यक्षांच्या सरळ स्वभावाचा फायदा घेत भाजपाला असे अडचणीत आणले की भाजपाच्या नेत्यांनी कपाळाला हात लावला. किस्सा असा झाला की दुधाला २७ रुपये भाव द्यावा हे सरकारी परिपत्रकाचे पालन करणे दुधसंघांना परवडणारे नाही, असा मुद्दा हिरीरीने विरोधक मांडत होते. त्याला भाजपाचे आमदार आपल्यापरीने उत्तर देत होते. मध्येच अजित दादांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना विचारले, "अध्यक्ष महाराज, तुमचा दुधासंघ आहे, तुम्ही सांगा, तुम्हाला परवडते का २७ रुपये भाव देणे..?" सरळ स्वभावाच्या हरिभाऊंनी आढेवेढे न घेता सांगितले,"नाही परवडत." अजितदादांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला,"मग तुम्ही किती भाव देता..?" हरिभाऊ पडत्या आवाजात पुन्हा उत्तरले,"आम्ही २१/२२ रुपये भाव देतो." त्यावर विजयी मुद्रेत फिल्मी स्टाईलने हातवारे करत अजितदादा म्हणाले,"बघा" आणि फिल्मी स्टाईलने खाली बसले. त्याबरोबर सभागृहात आणि वार्ताहर गॅलरीत एकच हशा उसळला. त्यातच एका शिवसेना सदस्याने जानकरांना विचारले,"बोला, आता काय कारवाई करणार अध्यक्षांच्या दुधसंघावर..?" जानकरांनी उत्तर देण्याआधीच परीक्षेत नापास झालेल्या मुलाच्या आवाजात हरिभाऊ उत्तरले,"आम्हाला नोटीस दिलीये ना त्यांनी..!!" त्याबरोबर सभागृहात आणखी हशा उसळला. आणि भाजपा सदस्य आणि मंत्री कपाळाला हात लावताना दिसत होते !!
 
याच चर्चेच्या वेळी अजितदादांना गप्प करण्याचे काम महादेव जानकरांनी केले. अजित दादांचा आवाज चढताच उभे राहत जानकर फिल्मी स्टाईलने पाठीमागे तिरके हातवारे करत फक्त एवढेच म्हणाले,"काय सांगू का कोणी दूधसंघ कसे कसे मोडले..?" जानकरांच्या या प्रश्नावर चेहरा पडून अजितदादा जे खाली बसले ते चर्चा संपेपर्यंत गप्प होते. मात्र सत्ताधाऱ्यांकडून आग्रह होऊनही जानकरांनी संदर्भ सांगितला नाही. रात्री सदर प्रतिनिधिकडे बोलताना जानकर म्हणाले की आघाडी सरकारच्या काळात अमूलसोबत काही कोटी रुपयांचा दुग्धोत्पादन संदर्भात काही करार यांच्याशी संबधित एका दूध संघाने केला होता. त्यावर मंत्री म्हणून त्यांचीच सही होती. त्या घोटाळा प्रकरणात गुजरातमध्ये केस सुरू आहे. त्यांना कधीही अटक होईल अशी स्थिती आहे. त्यामुळे तो विषय काढताच ते गप्प बसले."
 
पत्रकारांच्या शिबिर निवासात येताना परिवहन मंत्र्याचा ताफा पत्ता न सापडल्याने सदर निवसस्थानाच्या भोवतीच तासभर गरगर फिरत राहिला, हा किस्सा जळगाव तरुण भारताच्या वाचकांनी वाचला आहेच.
 
दोन्ही विरोधकांमधील स्पर्धा 
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही जुन्या स्पर्धकांमधील स्पर्धा या अधिवेशनातही दिसत आहेच. १२ डिसेंबरला दोन्ही पक्षांच्या मोर्चाची सांगता एकत्र झाली. काँग्रेसची ताकद या मोर्चात राष्ट्रवादीपेक्षा जास्त दिसत होती. मात्र शेवटचे भाषण शरद पवारांचे झाले. त्यात पवारांनी "कर भरू नये, देणी देऊ नयेत" असे बेजबाबदार आवाहन केल्याने काँग्रेसचे नेतेही संतप्त झाले होते. या प्रतिनिधिकडे अनेक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही या बेजबाबदार वक्तव्याचे समर्थन करता येत नव्हते. "पवारांना तसे म्हणायचे नव्हते" असे जयंत पाटील, दिलीप वळसे पत्रकारांना सांगत होते. पृथ्वीराज बाबांनी तर सभागृहाबाहेर सदर प्रतिनिधीशी बोलताना मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. "आय बिलिव्ह सीएम..!" असे ते म्हणाले. विधान परिषद वारंवार गोंधळ घालून बंद पाडण्याच्या राष्ट्रवादीच्या धोरणाबद्दल पृथ्वीराजबाबानी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज बाबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कामे काशी अडली होती आणि दिल्लीत त्यांची काहीही "वट" कशी नव्हती याचे किस्से सांगत होते.
 
 
तर नेहमी भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचे आमदार आणि नेते मात्र युती काळात असल्याप्रमाणे भाजपाबरोबर जुळवून घेत नीट समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेतील या बदलाकडे पत्रकारांचे लक्ष वेधले.
 
मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सभागृहात आकड्यांच्या आधाराने विरोधकांवर कुरघोडी करताना दिसले. नाथाभाऊंनी आता आमदार म्हणूनच पुन्हा काम करण्याची मानसिकता स्वीकारली असल्याचे दिसत होते. तर मुख्यमंत्र्यांनी नाथाभाऊंचे कर्जमाफीच्या भाषणात कौतुक केले. गिरीश महाजन यांची मंत्री म्हणून विधानसभेत चांगली छाप त्यांच्या उत्तरातून दिसत होती. उत्तर महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी गिरीश महाजन आणि खडसे यांनी मुख्यमंत्र्यांची अमदारांसोबत बैठक मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाशह: बैठकीसाठी सोमवार आणि मंगळवारी वेळ दिल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्याची बैठक सोमवारी आहे.
 
चंद्रकांत दादा पाटील, विनोद तावडे हे विधिमंडळाचे कामकाज नीट पार पडावे म्हणून संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या जोडीने प्रयत्न करताना दिसत होते. सुधीर मुनगंटीवार यांची शस्त्रक्रिया झाली असल्याने हजर नाहीत. त्यांची अनुपस्थिती जाणवते आहे. मात्र भाजपामध्ये सामूहिक नेतृत्व कसे काम करते, त्याचे उदाहरण म्हणून हे विधिमंडळ अधिवेशन लक्षात राहील, असे दिसते आहे.