स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता हवी
 महा एमटीबी  17-Dec-2017


स्वच्छता राखणं अन इतरांना राखायला लावणं हे चांगलं कार्य आहे, कारण एका अर्थानं तो मानवधर्मच आहे. स्वच्छतेचे महामेरू गाडगे महाराजांच्या मतानुसार, ‘‘स्वच्छता मोहीमयशस्वी होण्यासाठी तिला लोकचळवळीचं स्वरूप येणं गरजेचं आहे.’’ तथापि, जोपर्यंत स्वच्छतेसंदर्भात लोकांची मानसिकता सकारात्मक होत नाही, तोपर्यंत शहर स्वच्छता अन ग्रामस्वच्छतेची संकल्पना प्रत्यक्षात साकार होणार नाही. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्यावी की, सुंंदरतेची उत्पत्ती खर्‍या अर्थाने स्वच्छतेतूनच होत असते. सांगायचं तात्पर्य म्हणजे सुंदर शहर (स्मार्ट सिटी) अन निर्मल ग्रामयांची निर्मिती करण्याआधी, सरकारी यंत्रणेने शहरं अन खेडी स्वच्छ करणे काळाची गरज आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, भक्कम इमारत उभारायची असेल तर तिचा पाया आधी मजबूत बांधावा लागतो, त्याप्रमाणेच स्मार्ट सिटी उभारायची असेल तर, ‘तिची’ स्वच्छतेच्या पायावरच उभारणी होऊ शकेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या द्वयनेत्यांनी संकल्प सोडला असून, त्यास यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण सहभागी होऊया अन स्वच्छता मोहीमलोकसहभागातून यशस्वी करूया.
मित्रांनो, दिवसेंदिवस राज्यात नागरीकरणाची अमर्याद व अनिर्बंध वाढ होत आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. शहरांमध्ये तुंबलेली गटारे-नाले, जागोजागी कचर्‍याचे ढीग, डम्पिंग ग्राऊंडमुळे वाढते वायू प्रदूषण, ई-कचर्‍याचा प्रादुर्भाव या नागरी समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. या कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न रूद्ररूप धारण करीत आहे. तसेच अस्वच्छतेमुळे नागरिकांना डेंग्यु व अन्य जिवघेण्या रोगांची लागण होत आहे. उपरोक्त कारणांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियानाला सर्वोच्च प्राधान्य दिलं व याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ’स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविले. शहरा-शहरात, गावा-गावात केंद्रासह राज्य सरकारने स्वच्छता राखण्यासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती केली. वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या व सोशल मिडिया या प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांच्या मनात स्वच्छतेचे महत्व बिंबविण्यात आले. प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना या कामी मदतीचा हात देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब ऑफ इंडिया, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थीनी-अध्यापक वर्ग पुढे सरसावले आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने तर एकाच दिवशी २१ शहरे स्वच्छ करून विश्वविक्रमच केला आहे. प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी, कामाची तळमळ व गतीशिलता पाहून अनेक स्वयंसेवी संस्था या स्वच्छता मोहिमेत स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारींना तर महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी स्वच्छतादुत म्हणून स्वच्छता अभियानाचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर केलं, हे गौरवास्पद आहे. सदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील लहान-मोठे रस्ते, समुद्रकिनारे, नद्या-नाले, रेल्वे स्थानकं, मैदाने, देवस्थाने स्वच्छ व सुंदर झालीत. धर्माधिकारींचा आदर्श ठेऊन विविध वयोगटातील सदस्यांनी समाजाचं देणं आहे, या भावनेतून नि:संकोचपणे झाडू हाती घेऊन परिसर स्वच्छ करण्यात स्वत:ला झोकून घेतले. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे पेशाने वकील असलेल्या अफरोज शाहने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने वर्सोवा बिचला स्वच्छ केलं. मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करून समुद्र किनारे स्वच्छ करण्यासंदर्भात धोरण बनविण्याचे आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर, स्वच्छता मोहिमेत मोलाचं योगदान दिल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी अफरोजच्या महान कामगिरीचे व्यापक तर्‍हेने प्रसारण करून त्याला मोठी दाद दिली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अन अफरोज शहाला मराठी माणसाचा मानाचा मुजरा!

या स्वच्छता अभियानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्य मंत्रीगण, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, सिनेअभिनेता अमिताभ बच्चन, उद्योगपती निता अंबानी आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी झाडू हाती घेऊन रस्ते स्वच्छ केले अन नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केलं.

जागोजागी नागरिकांनी उदंड प्रतिसाद देऊन स्वच्छता मोहिमेस अधिक चालना दिली. खरं तर, शाळा-कॉलेजमधील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन मोठा प्रतिसाद दिला. विद्यार्थीदशेत स्वच्छतेचे महत्व मनात बिंबवल्याने, हेच विद्यार्थी मोठेपणी स्वच्छता धर्म पाळून शहरांसह गावांना स्वच्छ व सुंदर करण्यात योगदान देतील, यात शंका नाही. मुख्यमंत्र्यांनी तर एक पाऊल पुढे टाकून राज्यात येत्या सहा महिन्यात प्लास्टिकवर बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा केली, ही स्तुत्य बाब आहे. सरकारी प्रयत्नांबरोबरच समाजातील सर्व लहान-मोठ्या घटकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला, तर ही मोहीमनक्कीच फलदुप होईल, हे निश्चित.

 
संत तुकाराममहाराज म्हणतात,
‘नाही निर्मळ जीवन,
काय करील साबण
तैसे चित्तशुद्धी नाही,
तेथे बोध करील काई’’

रणवीर राजपूत
(निवृत्त प्रसिद्धी अधिकारी, मंत्रालय)
९९२०६७४२१९