हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती
 महा एमटीबी  17-Dec-2017


भारतीय संस्कृती हा शास्त्रज्ञांसाठी नेहमीच एक गूढ विषय राहिला आहे. त्यातून प्राचीन, अर्वाचीन साहित्यातून त्याबद्दल बरीच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. भारतीय संस्कृतीचा एक गूढ पण तितकाच रंजक इतिहास आपल्यासमोर १०० वर्षांपूर्वी मोहेंजोदडोच्या स्वरूपात आला. इतिहासतज्ज्ञांची परीक्षा सुरू झाली. जवळपास ४ हजार ६०० वर्षांपूर्वीपासून हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. मात्र ती कशी लयाला गेली? काय होतं त्या संस्कृतीचं वैशिष्ट्य की ज्यामुळे आजही मोहेंजोदडो किंवा हडप्पा असे नाव घेतले जाते तेव्हा एखाद्या गूढ विषयाबद्दल बोलले जात आहे, असा भास होतो.
खरंतर मोहेंजोदडो हे एक प्रकारचे गूढ शहरच होते. उत्खननात जेव्हा हे शहर आढळले तेव्हा तिथे बरेचसे मानवी सांगाडे आढळले. म्हणून या शहराला ’मोहेंजोदडो’ म्हटले जाते. मोहेंजोदडो या सिंधी शब्दाचा अर्थच मुळी ’मृतांची टेकडी’ असा होतो. पाकिस्तानातील सिंधू नदीच्या खोर्‍याकिनारी जवळपास ५ हजार किमी अंतरावर पसरलेल्या या शहराचा शोध १८४२ साली चार्ल्स मेसन यांना लागला. त्यांनी या जागा पाहिल्या होत्या. पण काही कारणाने हे गूढ त्यावेळी उकलले गेले नाही. मात्र १९२२ च्या दरम्यान राखालदास बॅनर्जी व दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली येथे खोदकाम सुरू झाले आणि समोर आला तो ४ हजार ६०० वर्षांपूर्वीचा भारताचा आणि तत्कालीन मानवाचा अचंबित करणारा इतिहास. डॉ. लक्ष्मणस्वरूप रामचंद्र यांच्या मते या संस्कृतीचे संस्थापक आर्य होते तर राखालदास बॅनर्जी यांच्या मते ही संस्कृती द्रविड लोकांनी निर्माण केली. पण बर्‍याच विद्वानांचे यावर एकमत आहे की, ही संस्कृती विकसित करण्यात द्रविडांंचा महत्त्वाचा वाटा आहे.
अतिभव्य असलेले शहराचे प्रवेशद्वार, चारही बाजूंनी असलेली विटांची सुरक्षित तटबंदी. आत प्रवेश करताच भव्य इमारती, विस्तीर्ण रस्ते दिसले. बर्‍याच इमारती या दुमजली बांधकाम केलेल्या. इमारतींचे बांधकाम दगडी आणि पक्क्या विटांपासून केलेले. ५ हजार वर्षांपूर्वी जेव्हा येशू ख्रिस्त किंवा गौतम बुद्धाचाही जन्म झाला नव्हता अशा वेळी झालेले हे प्राचीन बांधकाम आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे आहे. उत्खननात मिळालेल्या अवशेषांनुसार त्याकाळी भव्य अशी घरे बांधली जात. त्यात प्रत्येक घराभोवती अंगण असे आणि त्याभोवती प्रचंड अशा चार ते पाच खोल्या. तसेच प्रत्येक घरात शौचकूप आणि स्नानगृह म्हणजेच आताच्या काळातील स्विमिंगपूल. त्या काळात स्नान करण्यासाठी सार्वजनिक स्नानगृहांचा वापर केला जात असावा, जे एवढे मोठे होते की त्यांचा वापर पोहण्यासाठीही केला जात असे, जे आधुनिक स्विमिंगपूलच्या स्वरूपाचे होते. प्रत्येक घरासाठी प्रचंड मोठ्या अशा विहिरी बांधण्यात आलेल्या होत्या. असे म्हटले जाते की, हडप्पा संस्कृतीमुळेच विहिरींचा शोध लागला. हडप्पा संस्कृतीचा मानव इतका बुद्धिमान होता की, त्याने विहिरीच्या पाण्याचा उपयोग करून शेती करण्याचे तंत्रज्ञान अवगत केले होते. त्यासाठी तो अतिउंच ठिकाणी विहिरी बांधत असे आणि ते पाणी चारही बाजूंनी शेतीला पुरवले जात असे. हडप्पा संस्कृतीतील माणसे प्रचंड बुद्धिमान होती, हे त्यांच्या शहरनिर्माणाच्या प्रत्येक वास्तूतून जाणवत होते. त्याकाळी त्यांनी जल-मल निष्कासित करण्यासाठी (वाहून नेण्यासाठी) नाले बांधले होते. ज्याला आपण आधुनिक काळात ’ड्रेनेज सिस्टिम’ म्हणतो. स्नानगृह पक्क्या विटांनी बांधलेले होते, पण त्यातून पाणी बाहेर जाऊ नये म्हणून या विटांवर कोळशाचा थर लावलेला आढळून आला. कोळशामुळे पाणी बाहेर पडण्यास अडथळा येतो. ५ हजार वर्षांपूर्वी या मानवास हे कसे काय कळले असेल? कारण हा शोध त्यानंतर बर्‍याच वर्षांनी शास्त्रज्ञांनी लावला. हेही एक गूढच आहे. बांधकामशास्त्राच्या बाबतीत त्यांची आखणी अप्रतिम आणि तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण होती. 

मोहेंजोदडोच्या नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्यांना तांदूळ, गहू यांची शेती कशी करतात याचे ज्ञान होते. ते जनावरेही मोठ्या प्रमाणात पाळत असत. त्याकाळी कोणत्याही प्रकारची चलनव्यवस्था नसली तरी त्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू म्हणजेच बार्टर सिस्टिम त्याकाळी प्रचलित होती. उत्खननात अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्याकाळीही लोकांना गणिताचे ज्ञान होते. जोडणे, वजा करणे, पट करणे या सर्व गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा समुद्रमार्गाने इतर राज्यांबरोबरही त्यांचा व्यापार चालत असे. दळणवळणाचे हे माध्यमएवढे पुरातन असू शकते यावर अद्याप विश्वास बसत नाही. उत्खननात इमारती, स्नानगृहे, धातूंची भांडी, चांदीची भांडी, फुलदाण्या, मुद्रा, मोहर, अनेक देवतांच्या मूर्त्या आढळल्या. इतिहासकारांच्या मते सर्वप्रथम स्वस्तिक इथेच आढळले. त्याचबरोबर अनेक ताईतही येथे आढळले. त्यावरून या माणसांचा मंत्रतंत्रांवर व भुताखेतांवर विश्वास असावा. इथे प्रचंड असे शिवलिंगही आढळून आले. यावरून तेथे शंकराची आराधना लोक करत असावेत. तसेच येथील दगडांवर कोरल्या गेलेल्या प्रकृती देवीच्या शिल्पावरून या संस्कृतीच्या देवतांचीही माहिती मिळते. हडप्पाकालीन लोकांची फासे, सोंगट्या ही मनोरंजनाची साधने होती तसेच नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी लावून ते स्वतःची करमणूक करीत असत. पुरातत्व खात्याला विविध प्रकारची पण सुबक अशी डोक्याची पुढेमागे हालचाल करू शकणारा बैल, बैलगाडी, पक्ष्यांच्या आकाराच्या शिट्या, खुळखुळे अशी वैविध्यपूर्ण खेळणीही या उत्खननात सापडली तसेच विविध तंतुवाद्येही आढळली. यावरून येथील नागरिकांना मनोरंजनाची आवड होती आणि त्यासाठी त्यांनी विविध प्रकारची संगीतवाद्येही बनविली होती, हे समजते. इथल्या नागरी संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना साफसफईबद्दल प्रचंड आस्था होती. उत्खननात वेगवेगळ्या प्रकारचे कंगवे, साबण तसेच विविध प्रकारच्या औषधीही सापडल्या. तत्कालीन स्त्रिया या रंगीबेरंगीमणी, दगड यांच्यापासून बनविलेले अतिशय सुबक असे दागिनेही परिधान करत, पण सोन्याचे दागिनेही त्याकाळी प्रचलित होते, हे आश्चर्य. उत्खननात सापडलेल्या सांगाड्यांचे निरीक्षण करताना तज्ज्ञांना आढळले की, त्यापैकी काहींचे दात नकली आहेत. याचा अर्थ त्याकाळात त्यांनी ही विद्याही अवगत केलेली होती. येथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याशिवाय तीळ, जव, वाटाणा यासारखी दुय्यम धान्यं ते पिकवत. याशिवाय खजुराचाही त्यांच्या अन्नात समावेश असे. पशुपालनामुळे त्यांच्याकडे दुधदुभतेही भरपूर प्रमाणात उपलब्ध असे.
हडप्पा संस्कृतीचे मोहेंजोदडो हे राजधानीचे शहर होते. या शहरासारखे नगरनिर्माण असलेली जवळपास १ हजार शहरे यानंतर आढळली. त्यात मोहेंजोदडोची नगरप्रणाली जास्त विकसित असल्याचे आढळून आले. यावरून हे अनुमान काढता येईल की, हडप्पा संस्कृतीचा विस्तार भारतभर होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली ही शहरे एकाएकी कशी नाहीशी झाली याबाबत आजही गूढ कायम आहे. येथे करण्यात आलेल्या उत्खननात जे सांगाडे आढळले त्यातले बरेचसे घरांबाहेरील मुख्य रस्त्यात आढळले. हे सांगाडे जणू काही एकाच दिशेला धावताहेत, अशा स्थितीत आढळून आले होेते. मोहेंजोदडो या शहराच्या विलयाबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यातील सर्वाधिक प्रचलित कथा म्हणजे सिंधू नदीला आलेल्या पुरामुळे या शहराला जलसमाधी मिळाली. दुसरी दंतकथा अशी की, ४ हजार वर्षांपूर्वी येथे पाण्याचा प्रचंड दुष्काळ पडला. त्यामुळे या जागेला अक्षरक्षः वाळवंटाचे स्वरूप आले आणि पाण्याच्या अभावी येथील जनजीवन संपले किंवा येथील लोक विस्थापित झाले असावे. अजून एका दंतकथेनुसार तेथे भूकंप होऊन एका क्षणात मोहेंजोदडो कायमचे गाडले गेले असावे. सर्वात मनोरंजक दंतकथा ही की, येथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांची अवस्था पाहून पुरातत्वशास्त्रज्ञांना असे वाटते की, हे मानव एखाद्या स्फोटासमयी जखमी झाले असावेत. पण मग हा स्फोट नेमका झाला कशाचा? तर त्याचा संबंध महाभारताशी लावला जातो. असे म्हटले जाते की, द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा याने पांडवांवर ब्रह्मास्त्र सोडले. त्या ब्रह्मास्त्राला आणि त्यापासून होणारी हानी थांबविण्याकरिता अर्जुनाने दुसरे ब्रह्मास्त्र सोडले. ही दोन ब्रह्मास्त्रे थांबली पण ती नेमकी या मोहेंजोदडो शहरावर पडली आणि त्यात येथे राहणार्‍या निष्पाप लोकांचा बळी गेला. महाभारताचे युद्ध झाले ते ठिकाण आणि मोहेंजोदडो आढळले ते ठिकाण यातील साम्य ही दंतकथा खरी असल्याचा आधार देते.
- रश्मी मर्चंडे