विद्येमुळे मती आली
 महा एमटीबी  16-Dec-2017

 
 
८० चे दशक असेल. सहावीला होते तेव्हा मी. अहमदनगरच्या दहीगावमध्ये त्यावेळी वातावरण काय तर गावात सरळ दोन तट. एक गावातले आणि एक गावकुसाबाहेरचे. पाण्यावरून नेहमी वाद. त्यातल्या त्यात आम्ही जोतिबा फुलेंचे वंशज. महात्मा जोतिबा फुलेंचे समग्र साहित्य वाचले आणि मी खूप अस्वस्थ झाले. माझे बाबा देवराम काळे. आई सरस्वती रूढ अर्थाने अशिक्षित शेतकरी, पण त्यांच्यात माणुसकी ओतप्रोत भरलेली. माझ्या अस्वस्थतेचे कारण बाबांनी विचारले. मी बाबांकडे हट्ट धरला. बाबा आपल्या महात्मा जोतिबांनी स्वत:ची विहीर लोकांसाठी खुली केली. आपण पण आपली विहीर सगळ्यांसाठी खुली करायची? आश्‍चर्य म्हणजे बाबांनी खरोखर घरची विहीर सगळ्यांसाठी खुली केली. त्यावेळी गावात खूप वादळ उठले होते. पण बाबा ठाम राहिले.
 
 
बेबीताई गायकवाड आपल्या लहानपणीची आठवण सांगत होत्या. नववी शिकलेल्या, कुटुंब उदरनिर्वाहासाठी पती अशोकसोबत भाजीचा धंदा करणार्‍या अहमदनगरच्या बेबी गायकवाड. पुस्तके आयुष्य घडवू शकतात, हे बेबी गायकवाड यांच्याकडे पाहून पदोपदी वाटत राहते.
 
 
बेबी गायकवाडांना आजपर्यंत समाजसेवा, साहित्यसेवा क्षेत्रातले ५१ पुरस्कार प्राप्त आहेत. त्यापैकी राज्य शासनाचा कवी मंगेश पाडगावकर पुरस्कार, राज्यस्तरीय सावित्रीच्या लेकी पुरस्कार, दूरदर्शनचा रत्नशारदा पुरस्कार हे विशेष पुरस्कार म्हणायला हवेत. बेबी गायकवाड यांना हे किंवा इतर पुरस्कार मिळाले याचे कारण बेबी गायकवाड यांनी कसलाही हेतू मनात न बाळगता मायमराठी साहित्याची केलेली निःस्वार्थी सेवा. कोंड्याचा मांडा करून बेबी गायकवाड दोन वृत्तपत्रे विकत घेऊ लागल्या. दररोजच्या घडामोडीतून ज्ञान मिळत गेले. या ज्ञानाचा उपयोग त्यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या सगळ्यांच्या भल्यासाठी केला. पुढे भाजीचा धंदा करता करता, दररोज पाच रुपये बाजूला काढून ते वर्षभर साठवून त्यातून त्यांनी अतिशय दर्जेदार साहित्यिक, नैतिक, वैचारिक मूल्यं असलेली ९०० पुस्तके विकत घेतली. भाजी विकता विकता त्या या पुस्तकांची माहितीही लोकांना देत असत. त्यातूनच मग लोक पुस्तकही वाचायला मागू लागले. बेबीताई या लोकांना पुस्तकं वाचायला देताना एक अट टाकायच्या की, तुमच्या ओळखीच्या दहा जणांना वाचायला देऊन मगच ते पुस्तक मला परत द्या. हे ऐकून नवल वाटले. कारण कित्येक सुखवस्तू लोक आपल्या बुकशेल्फमधली पुस्तके खालीही काढायला कचरतात तिथे पोटाला चिमटा घेऊन विकत घेतलेली पुस्तके बेबीताई लोकांना विनामूल्य वाचायला देतात. वर त्यांना वाचन साखळी बनवायला सांगतात. आपल्या गावातल्या महिलांनी वाचावे यासाठीही त्या प्रयत्न करू लागल्या. वाचनातून आयुष्य जगायला काय मिळते? या विषयावर जवळजवळ त्यांनी २०० ठिकाणी व्याख्याने दिली. अर्थात हे सगळं करत असताना आपल्याला कोणी शाबासकी द्यावी, पारितोषिक द्यावे असा त्यांचा मानस नव्हता. तर मनात एकच ध्यास होता की, महात्मा फुले सांगून गेलेत की विद्येविन मती गेली, मतीविन गती गेली. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला जर गती आणि मती आणून महात्मा फुलेंचे स्वप्न पूर्ण करायचे असेल. खर्‍या अर्थाने सावित्रीची लेक व्हायचे असेल तर विद्येचा प्रसार, प्रचार केलाच पाहिजे. त्यामुळे बेबीताई मराठी साहित्याची सेवा करू लागल्या. जगण्यातून आलेल्या संवेदना व्यक्त करत त्या कविताही करू लागल्या. चंदनाला आपल्या सुगंधाची जाहिरात स्वतःला करावी लागत नाही. तसेच बेबी गायकवाडांच्या बाबतीत झाले, त्यांचे साहित्यप्रेम, समाजसेवा याबद्दलची माहिती महाराष्ट्रभर झाली. विविध प्रसारमाध्यमांनी, सरकारने त्यांची दखल घेतली. असे म्हटल्यावर बेबीताई स्मितहास्याने म्हणतात,’विद्येमुळे मती आली.’

 
योगिता साळवी