भटकंतीचे 'सोनेरी' रूप - सह्याद्री
 महा एमटीबी  16-Dec-2017

 
भटकणे....! हे एक असं दैवी व्यसन आहे जे आपल्या जगण्याला परिपूर्ण करतं. आणि माझ्या सुदैवाने हे व्यसन मला ५ वर्षांपूर्वी लागलं आणि आता तर ते नसानसात भिनलंय आणि संपूर्ण शरीरात बेफाम पसरलंय. ह्यातून आता सुटका नाही आणि हि निसर्गाची अटक मला मनापासून मान्य आहे. ज्वलंत आणि अक्राळविक्राळ ज्वालामुखीच्या उद्रेकातून 'माझा 'सह्याद्री जन्माला आला. 'माझा 'हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. आपल्या रोजच्या आयुष्यात काही गोष्टी जश्या 'माझ्या 'असतात, तसाच हा सह्याद्री 'माझा 'आहे आणि त्यावर माझं नितांत प्रेम आहे अशी माझी भावना कायम असते. त्याच्या अंगा खांद्यावर बागडताना नेहमी असं वाटतं कि मीच तो नशीबवान. आणि खरंच मी आहे सुद्धा. हे सारं घडलं कारण त्याला मी 'माझा 'म्हंटलं . त्याला जवळ केलं. त्याच्याशी बोललो. आता दगडाशी काय बोलायचं? असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची थोडीशी गल्लत होत असेल. भटकंती करत असताना निसर्ग तुमच्याशी खूप काही बोलतो. त्याला खूप काही सांगायचं असतं. इतक्या वर्षांच्या आणि मातीखाली दबलेल्या गोष्टींना एकाकी वाचा फुटते. सूक्ष्म कीटकांपासून ते अजस्त्र सुळक्यापर्यंत प्रत्येकाला आपली कथा सांगायची असते. आणि मग तुमच्या माझ्यासारखे भटकी लोकं जेव्हा ह्यांच्या तावडीत सापडतात तेव्हा मात्र आपल्यापुढे ह्या दैवी कथांचं जगच उभं राहतं. आपण पृथ्वीवरच आहोत की नाही अशी शंका यावी जणू. मग हातात कॅमेरा आणि रानावनातून, दगड धोंड्यातून, नदीच्या पात्रातून आणि बेफाम झाडीतून मार्ग काढत काढत ह्या असंख्य कथा आपल्या कानांवर आणि मनावर ठसा उमटवत जातात.
 
 
इतिहासकालीन कथांना मूर्त रूप देण्याचं काम कॅमेरा करतो. आणि मग सुरु होते धडपड हे सारं दृश्य टिपण्याची. तुम्ही वरती हे जे छायाचित्र बघताय त्यामागची कहाणी सुद्धा काहीशी अशीच आहे. नाशिक जिल्ह्यातील 'धोडप 'हा एक अतिशय देखणा, बुलंद ,बलाढ्य आणि सौन्दर्याची खाण असलेला किल्ला / दुर्ग. ह्याचं सौन्दर्य असं की डोळे दिपून जावेत. इथे फोटोग्राफी करताना बरंच दडपण होतं की हे डोळ्याचं पारणं फेडणारं सौन्दर्य नेमकं टिपायचं कसं ? संध्यकाळ तशी रम्य आणि शांत होती. पण काही केल्या मला एक तरी भन्नाट क्लिक हवाच होता. सह्याद्री देवतेला मनापासून प्रार्थना केली की हा तुझा निस्सीम भक्त फार आशेने इथवर आलाय. त्याला रिकाम्या हाती परत नको पाठवू. डोळ्यात अश्रू आले. अंगावर स्फुरण चढलं. वरून कौल मिळाला होता. फोटोग्राफीचं सगळं तंत्र पणाला लावलं आणि बघता बघता सह्याद्रीने माझ्यावर कृपा केली. रिकाम्या आकाशात ढगांचा खेळ सुरु झाला आणि वातावरणाचा नूरच पालटला. सूर्याने ढगांसोबत लपंडाव चालू केला आणि ह्यांच्या खेळात मी कॅमेरा वर हाथ साफ करून घेतला. संपूर्ण परिसर सोनेरी रंगात बुडाला होता आणि मी पुन्हा एकदा सह्याद्रीच्या प्रेमात बुडालो होतो. संध्याकाळ सरत आली तशी सोनेरी दुनिया हलकेच शांत होऊन निल रंग परिधान करत होती. मी मात्र अजूनही बेभान. नेहमीसारखाच. काही दिवसांनी ह्या फोटोला राज्यस्तरीय बक्षीस लाभलं आणि सह्याद्रीची माझ्यावर असलेली कृपा जणू शिक्कामोर्तबच झाली.
 
 
पुढच्या लेखात भेटूया अश्याच एका भन्नाट जागेवर. भटकत राहा !!!
 
-अनिकेत कस्तुरे