वेदांमधले ज्ञान-विज्ञान – वारसा आजही उपयोगी की कालबाह्य? (भाग तिसरा)
 महा एमटीबी  16-Dec-2017

 
 
टिंगल करणार्‍यांपैकी किती जणांची वृत्ती जिज्ञासू असते हा प्रश्नच असतो. जे जिज्ञासू असतात तेदेखील त्यांच्या आवडी-निवडीचे विषय बाजूला ठेवून सर्वच विषयांबद्दल समान आदर ठेवू शकतात का हा प्रश्न असतो. उदाहरणार्थ सध्या प्रचलित असलेल्या अॅलोपथीच्या डॉक्टरांनी आयुर्वेदाची हेटाळणी करण्यामागे आपल्या पेशाचा दुरभिमान हे कारण असू शकते. दुसरीकडे काही अॅलोपॅथ आयुर्वेदाची तत्वे पटलेली असल्यामुळे आपल्या औषधांबरोबरच रूग्णांना इतर उपलब्ध ज्ञानाशी संबंधित सल्ला देताना दिसतात. विविध पद्धतींचे असे अभिसरणच अपेक्षित असायला हवे.
मध्यंतरी मी कणाद ऋषींनी केलेल्या संशोधनात्मक कार्यावर आधारित एक लेख लिहिला होता. न्यूटनचे तीन नियम म्हणून जे आज प्रसिद्ध आहेत त्याचे किमान सैद्धांतिक स्वरूपातील ज्ञान कणाद ऋषींनी न्यूटनच्या कितीतरी आधीपासून मांडल्याचा उल्लेख होता. त्यावर टवाळखोरांच्या अगदी अपेक्षित अशा प्रतिक्रिया आल्या होत्या. आता आइनस्टाइननेही वेदांमधले ज्ञान चोरले असे काही शोधून काढा, झालेच तर कणाद ऋषींनी जे लिहिले ते स्पष्टपणे गद्य स्वरूपात का लिहिले नाही असा स्वरूपाच्या अतिशय उथळ प्रतिक्रिया होत्या. मुळात एखादी गोष्ट सूत्रबद्ध पद्धतीने मांडण्यापूर्वी सैद्धांतिक पातळीवर मांडणे हेदेखील तेवढेच; किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे असते, याचीही अनेकांना जाणीव नसते. तेव्हा मी म्हटले तसे अशा उथळ लोकांकडे दुर्लक्ष करणे इष्ट.
श्रोडिंगरसारख्या मूलभूत विचार करणार्‍यांकडे संस्कृतचे ज्ञान नव्हते, तरी उपलब्ध इंग्रजी व जर्मन अनुवादांचा आधार घेत त्यांनी आपल्या या वारशाचा वापर करत आपले सिद्धांत मांडले. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी तर स्वत: संस्कृत शिकून मूळ स्वरूपातील वेदांचा व गीतेचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला होता. आधुनिक काळामध्ये स्वामीत्व हक्कांचा बोलबाला झालेला असताना आपल्याकडील हा वारसा मात्र सर्वांना मुक्तपणे उपलब्ध आहे. अट एवढीच की शास्त्रीय दृष्टीकोन बाळगा आणि संस्कृत शिकण्याचे कष्ट घ्या. त्यामुळे न्यूटन काय किंवा त्यामानाने बरीच अलीकडची निकोला टेसला-एर्विन श्रोडिंगर-नील्स बोहर-रॉबर्ट ओपेनहायमर- अल्बर्ट आइनस्टाइन अशा संशोधकांची साखळी असो, त्यांनी आपल्याकडील ज्ञान चोरले असा दावा कोणी करत नाही; किंबहुना करण्याचे कारण नाही. आपण एकतर आपल्या या वारशाला कचर्‍यापेक्षा अधिक किंमत देत नाही आणि दुसरीकडे त्याची किंमत असलीच तरी भूतकाळातच रमणे पसंत करतो. या दुसर्‍याबाबतीत आपल्याला साथ देणारे ग्रीक लोकही अगदी अशाच मानसिकतेचे आहेत असे म्हटले जाते. वर उल्लेख केलेल्या संशोधकांनी त्यांनी केलेल्या आपल्या या वारशाच्या अभ्यासाचे उघड दाखले दिलेले आहेत. तेव्हा उपलब्ध असलेले सिद्धांत वापरून ते सुत्रबद्ध करण्याचे यांचे श्रेय असलेच तर ते नाकारण्याचा प्रश्न नाही, मात्र मूळ सिद्धांत मांडणार्‍यांना योग्य ते श्रेय देण्याची तुमची तयारी आहे का, हा प्रश्न अशा कपाळकरंट्यांना विचारायला हवा. याशिवाय ब्रह्मांडाविषयी असोत किंवा इतर अनेक बाबतीत; आजही जे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत, त्यांच्यासाठी या वैदिक ज्ञानातून काही मार्गदर्शन मिळते का हेही जगभरातले संशोधक पहात आहेत. या लोकांचा मात्र नैराश्यवादच चालू असलेला दिसतो.
श्रोडिंगर यांनी स्वत:च म्हटले होते, “Vedanta teaches that consciousness is singular, all happenings are played out in one universal consciousness and there is no multiplicity of selves.” “मला जेव्हा जेव्हा काही प्रश्न पडतात तेव्हा मी उपनिषदांकडे वळतो”, हे नील्स बोहर यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. ओपेनहायमर यांचीही अशी मते प्रसिद्ध आहेत. अणुचाचणीचा तेजोगोल दिसल्यानंतर त्याला गीतेतील श्लोक आठवला, याचे महत्त्व किती जणांच्या लक्षात येते? या थोर पाश्चिमात्यांना आपल्या या वारशाचे कौतुक होते आणि त्यातील ओ की ठो अभ्यास नसलेले आपल्याकडील कपाळकरंटे तो मोडीत काढायला एका पायावर तयार असतात, हा या संशोधकांची नावे सांगण्यामागचा मर्यादित उद्देश आहे.
अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात आइनस्टाइन यांना भेटायला गेलेल्या डॉ. बी. एन गुप्ता या तरूण भारतीय संशोधकांचे त्यांनी संस्कृतमधून स्वागत केले. मात्र हे महाशय निव्वळ इंग्रजीतून शिकलेले असल्यामुळे त्यांना आइनस्टाइन काय म्हणाले हे समजलेच नाही. तेव्हा तुम्ही भारतातून आलात आणि तुम्हाला तुमचीच ही प्राचीन भाषा समजत नाही याबद्दल त्यांनी गुप्ता यांचे ‘कौतुक’ केले. “गेली काही वर्षे मी माझ्या संशोधनासाठी गीता व उपनिषदांकडे वळलेलो आहे.”, असेही त्यांनी गुप्ता यांना सांगितले. यात डॉ. गुप्ता यांना दोष देण्यात अर्थ नाही. आपणच आपल्याला असे बनवून घेतलेले आहे. आपल्याकडे अगदी आजही असेच डॉ. गुप्ता तयार करण्याची फॅक्टरी उघडलेली आहे आणि ती अव्याहतपणे चालू आहे. आणि गंमत म्हणजे आपल्यातील बहुतेकांना त्याचेच कौतुक वाटत असते.
एकीकडे मानसिक गुलामगिरीची आणि टवाळखोरीची प्रवृत्ती आणि दुसरीकडे आपल्या वारशाचा अभिमान बाळगत पुढे डोळसपणे भरीव काही करण्याची इच्छा नसणे यात आपला वैभवशाली वारसा अडकून पडलेला आहे. त्याचे महत्त्व ओळखून आजच्या जगातही आपण काही करू शकलो नाही तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच असू. अशा परिस्थितीतही विविध क्षेत्रातल्या या वारशाचे महत्त्व ओळखून कार्यरत असलेली मंडळी आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे यात किती कष्ट घेणे गरजेचे आहे याची कल्पना असल्यामुळे त्यांना प्रणाम.
ज्ञानार्जनाच्याबाबतीत केवळ शिक्षकांवरच म्हणजे गुरूवरच अवलंबून राहू नये हेदेखील आपल्याकडे सांगितले गेलेले आहे. ज्ञानार्जनाची पद्धत कशी असावी? तर एक तृतीयांश ज्ञान गुरूकडून घ्यावे, एक तृतीयांश स्वत:च्या मेहनतीने मिळवावे आणि उरलेले एक तृतीयांश आपल्या सहकार्यां कडून मिळवावे. सीबीएसईने ही पद्धत स्विकारल्यानंतर त्यांनी ती लंडन विद्यापीठाकडून घेतल्याचा समज आपल्याकडे प्रचलित आहे. मुळात लंडन विद्यापीठाने ती आपल्याकडून घेतलेली आहे याची कोणालाच कल्पना नसते. आपण मात्र इंग्रजांनी काही विशेष कारणाने आपल्यावर थोपलेली कारकून व पढतमूर्ख तयार करणारी व्यवस्था अंगीकारून बसलेलो आहोत; त्यामुळे आपल्यातील कुतुहल व चौकसपणा हरवून गेलेले आहेत याचेही आपल्याला भान नाही. नंतर मात्र आपण तर मॅकॉलेच्याही काही पावले पुढे जात आपली मूल्ये पूर्णपणे विसरून जाऊन शिक्षणाचे बाजारीकरण केले. एवढेच नाही, तर मुळात बुद्धीला चालना देण्याचा हेतु असलेले प्रोजेक्टवर्क किंवा संशोधन यातही आपली आताची व्यवस्था अगदी लहान वयापासून पीएचडीपर्यंत आपण चौर्यकर्माला प्रोत्साहन आणि किंवा संरक्षण देते हे दुर्दैव आहे.
मुर्तीवर किंवा दगडावर अनेक लेपांचे किंवा शेंदराचे थर बसल्यावर मूळ मूर्ती किंवा दगड दिसेनाशी होते तसे आपल्या जनमानसाचे झालेले आहे. बरेचसे ज्ञान सुरूवातीच्या धार्मिक आक्रमकांनी जाळून टाकल्यामुळे आणि नंतरच्या आक्रमकांनी येथून नेल्यामुळे अनेक बिंदू जोडण्याचे काम महाकठीण होऊन बसलेले आहे, यात शंका नाही. त्यातच सुरूवातीला आपल्यावर थोपलेल्या अनेक शतकांच्या गुलामगिरीमुळे आणि नंतर आपणच ती आत्मसात केलेल्या मानसिक गुलामगिरीमुळे आपल्यातले बरेचजण त्यातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. उलट जी काही थोडीफार बुद्धी आहे ती उथळ प्रश्न विचारत या भव्यदिव्य वारशाला मोडीत काढण्यास फार कष्ट पडत नाहीत. वर उल्लेख केल्याप्रमाणे या ज्ञाननिर्मितीत गेलेल्या हजारो वर्षांचा आपण आपल्या उथळ बुद्धीने अनादर करत आहोत हे समजण्याची पात्रताही अशा लोकांच्या अंगी नसते. आपल्या मानसिकतेवरील ही पुटे काढण्यास वेळ लागेल, तोपर्यंत आपल्याकडील संशोधनदेखील असेच लंगडे असेल.
सांगण्यासारखे बरेच काही आहे. या तीन भागात सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणेही शक्य नाही; विस्ताराने सांगणे तर दूरच, याची नम्र जाणीव आहे. तेव्हा येथे थांबतो.
 
 
- राजेश कुलकर्णी