PADMAN Trailer : सुपरहिरो है येह पगला!
 महा एमटीबी  15-Dec-2017
 
 
 
 
खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट पॅडमॅनचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. पॅडमॅन या चित्रपटाला वेगळ्या धाटणीचा चित्रपट असे म्हणण्यास काहीही हरकत ठरणार नाही कारण अतिशय वेगळ्या आशयाचा हा चित्रपट आहे असे ट्रेलरवरून लक्षात येत आहे. ''अमेरीकेकडे स्पायडरमॅन, बॅटमॅन आहे पण भारताकडे 'पॅडमॅन' आहे.'' असा संवाद ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्या आवाजात एक संवाद ऐकायला मिळतो. त्याचबरोबर 'सुपरहिरो, सुपरहिरो, सुपरहिरो है येह पगला हे गाणे संपूर्ण ट्रेलर मध्ये बॅकग्राऊंडला ऐकू येतं.
 
 
 
 
 
एका इसमाने आपल्या पत्नीला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणारा त्रास जाणला आणि यासाठी तो पॅड कसे बनविता येईल याचा अभ्यास करू लागला आणि हा अभ्यास करीत असतांना त्याला आलेल्या अडचणी, सामाजिक टोमणे यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट एका खऱ्या कथेवर आधारित आहे. अक्षय कुमार, अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेत्री राधिका आपटे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे यात मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी गोडबोले सुद्धा दिसत आहे.
 
 
 
 
 
स्त्रियांची मासिक पाळी आणि स्वच्छता या विषयावर हा चित्रपट बनविला गेला असून मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी घ्यायावयाची काळजी तसेच समाजजागृती यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे असे या ट्रेलरवरून लक्षात येते. समाजात ज्या विषयावर बोलण्यास टाळले जाते अशा विषयावर चित्रपट येत असल्याने आता समाजजागृती तसेच मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी घ्यायावयाची काळजी या विषयावर मोकळेपणाने बोलले जाईल असे म्हणण्यास हरकत ठरणार नाही.
  
हा चित्रपट २६ जानेवारी २०१८ रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बल्की हे आहेत.