बांगलादेशातील अंतर्गत राजकरणात हिंदूंचाच बळी
 महा एमटीबी  15-Dec-2017
 
 
हिंदू हे अवामी लीगचे पाठिराखे मानले जातात. १ ऑक्टोबर २००१च्या निवडणूक निकालाआधीच हिंदूंविरोधात दंगे उसळले. बांगलादेशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, २५ दिवसात २६६ मारले गेले व २१३ महिलांवर बलात्कार केले गेले. पण ’डेली स्टार’मधील वृत्तानुसार दक्षिण भोला मधील एका महिला शिक्षिकेने सांगितले की अन्नदा प्रसाद गावात ८ ते ७० वयोगटातील शेकडो हिंदू महिलांवर २ ऑक्टोबर २००१च्या रात्री बलात्कार करण्यात आले. गावातील सर्व घरं पध्दतशीरपणे लुटण्यात आली, हिंदूंना बळजबरीने हुसकावून लावण्यात आले. काहींना ‘संरक्षण पैसे’ भरण्याची सक्ती करण्यात आली. रोझलिन कोस्टानी भोलामध्ये मुलाखत घेतलेल्या ९८% हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले हो ते त्यामुळे वरील महिलेच्या विधानात कोणतीही अतिशयोक्ती नाही हे सिध्द होते. कोस्टा यांनी हेही नमूद केलय की स्थानिक पोलिसांनी अल्पसंख्यांकांवरील हल्ल्याची चौकशी फ़ारच कमी केली किंवा केलीच नाही. IANS (Indian Abroad News Service) नुसार २००१ मधील निवडणूकानंतर ४ लक्ष अल्पसंख्यांचा छळ करण्यात आला.१
बहुतांशवेळी अल्पसंख्यांकाविषयी सहानुभूती असल्याचा समज असणारे अवामी लीगचे पाठिराखेच अल्पसंख्यांकावरील हल्ल्यात सहभागी असतात. नेदरलँडस्थित अधिकारी गट 'Global Human Rights Defence'ने २०१० मधील अहवलात कागदपत्रासह नमूद केले आहे की हिंदू व पारंपारिक अल्पसंख्यांकावरील दडपशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष अवामी लीगमधील सदस्य सहभागी होते.२

 
शहारियार कबीर - 
 

 
 
 
२००१ च्या निवडणूकीनंतर हिंदूंसोबत बौद्ध व ख्रिश्चन ह्या धार्मिक अल्पसंख्यांकांवरील छळात वाढ झाली. २००१ ते २००५ मध्ये अल्पसंख्यांकांचा झालेला भयानक छळ ह्यावर बांगलादेशी पत्रकार, लेखक, चित्रपटनिर्माते व मानवाधिकार कार्यकर्ते 'शहारियार कबीर' ह्यांनी 'An Introduction to the White Paper: 1500 Days of minority persecution in Bangladesh' ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व कार्यकर्त्यांच्या मुलाखती, वर्तमानपत्रातील बातम्या, मानवाधिकार संघटनांचे अहवाल, छायाचित्रे, सर्वेक्षणातील निरीक्षणं इत्यादीची पुराव्यासकट माहिती दिली आहे. हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर लेख लिहिल्यामुळे व पिडितांच्या मुलाखती घेतल्यामुळे २२ नोव्हेंबर २००५ला शहारियार कबीर ह्यांना अटक करण्यात आली होती.
 
 
 
(छायाचित्र सौजन्य: ३)
 
१६ नोव्हेंबर २००५ला चित्तगावमधील नझीरहत महाविद्यालयातील प्राचार्य गोपाळ कृष्ण मुहुरी यांची त्यांच्या घरी हत्या करण्यात आली. चित्तगाव शहरात शिक्षण आस्थापनेत यशस्वी कारकीर्द असणारे प्रमुख हिंदू, महाविद्यालयात राजकीय चळवळीवर त्यांनी घातलेली बंदी व तसेच त्यांना २ वर्षांची वाढीव मुदत मिळाल्यावर महाविद्यालयातील बहुसंख्य मुस्लिम कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेली अस्वस्थता ही त्यांच्या हत्येची महत्वाची कारणे असण्याची शक्यता (Amnesty International च्या अहवालात नमूद करण्यात आली आहेत.४
'Bangladesh Minority Watch' चे संस्थापक रबींद्र घोष सांगतात की मागे माझ्यावरही हल्ला झाला होता पण पोलिस गुन्हेगारांना पकडू शकले नाहीत. बहुतांशवेळी पोलिसांना हल्लेखोरांची माहिती असते पण कृती करत नाहीत.५
 
 
अब्बास फ़ैज ह्या Amnesty International च्या बांगलादेशी संशोधकानुसार,"बांगलादेशातील हिंदू समुदाय विशेषत: देशातील सध्याच्या तणावपूर्ण काळात अत्यंत धोक्यात राहत आहे. धक्कादायक हे आहे की त्यांना केवळ त्यांच्या धर्मामुळेच लक्ष्य केले जात आहे. अधिकारी व्यक्तींनी त्यांना आवश्यक असलेली सुरक्षा पुरवली जाईल ह्याची निश्चिती करायला हवी." बांगलादेशातील युद्धगुन्हेगारांच्या 'आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालया'तील खटल्याच्या पार्श्वभूमीवर एका आठवड्यात इस्लामी पक्षांनी ४० पेक्षा जास्त मंदिरे उध्वस्त केली. हिंदूंची घर, दुकान जाळून शेकडो लोकांना बेघर करण्यात आले. हल्ल्यातून बचावलेल्या पिडितांनी Amnesty Internationalला दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे विरोधी पक्ष जमाते-ए-इस्लामी व त्यांची विद्यार्थी संघटना ’छात्रा शिबिर’ ह्यांच्या मोर्च्यात सहभागी होते, पण जमाते-ए-इस्लामीने हे सर्व आरोप फ़ेटाळून लावले आहेत.६
संदर्भ - 
१. Karlekar, Hiranmay; Bangladesh: The Next Afghanistan?, Sage Pub, 2005, पृष्ठ २५४-२५५,
२. Mukherji, Dr. Saradindu; Hindus Betrayed- Religious Cleansing in Bangladesh, India Policy Foundation Publication, 2013
३. Kabir, Shahriar, An Introduction to the White Paper: 1500 Days of minority persecution in Bangladesh, Ekkattorer Ghatak Dalal Nirmul Committee (Committee for Resisting Killers & Collaborators of 1971)), पृष्ठ ६२
४. Bangladesh- Attacks on members of the Hindu minority, 1 December 2001, Amnesty International
५. Mukherji, Dr. Saradindu; Hindus Betrayed- Religious Cleansing in Bangladesh, India Policy Foundation Publication, 2013
६. Bangladesh: wave of violent attacks against Hindu Minority, 6 March 2013, Amnesty International
 
 
- अक्षय जोग