ढाई अक्षर प्रेम का…
 महा एमटीबी  15-Dec-2017

व्ही. शांताराम यांचा ’दो आंखें बारह हाथ’ हा ’माईलस्टोन’ चित्रपट पाहण्यासाठी मी केव्हाही तयार असतो. हा चित्रपट म्हणजे अगदी बावनकशी सोनं आहे. यातला अगदी सुरुवातीचा एक छोटासा प्रसंग तर मनावर खूपच मोठा प्रभाव करुन गेला आहे. भयंकर गुन्हे करुन आलेल्या सहा कैद्यांची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेत आणि त्याच्यात परिवर्तन व्हावे यासाठी त्यांना मोकळ्या वातावरणात घेऊन तरुण इन्स्पेक्टर आदिनाथ निघाला आहे. पहिल्याच घासाला माशी लागावी तसा एक भयंकर कैदी या मोकळेपणाचा फ़ायदा घेऊन पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला आहे. सोबत मोकळ्या स्थितीतील अन्य पाच गुन्हेगार आणि डोळ्यासमोर पळुन जात असलेला हा सहावा. अशा वेळी नेमके काय करावे, अशा गोंधळात फ़सलेला आदिनाथ शेवटी एका उंच दरडीवर उभा राहून या कैद्याला आपल्या हृदयाच्या तळापासून केवळ ’शंक ss र…..’ इतकीच साद घालतो. या एका हाकेत इतका ओतप्रोत जिव्हाळा भरलेला असतो की, पळुन जाणारा हा शंकर नावाचा कैदी जागीच थबकतो आणि अखेरीस नाइलाजाने का होईना, पण परत येतो. शुद्ध प्रेमाचा महिमा हा असा आहे. अशा शुद्ध प्रेमामुळे खूप अवघड वाटणारी कामेदेखील अगदी सहज होऊन जातात.
रक्तपेढीसारख्या सामाजिक प्रकल्पाचे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला अशा शुद्ध प्रेमाची केवळ ओळखच असून भागत नाही तर त्याच्या बोलण्यातून, वर्तनातून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या मूल्यांची सहजपणे अभिव्यक्तीही व्हायला हवी असते. जनकल्याण रक्तपेढीच्या सुदैवाने अशा शुद्ध प्रेमाने ओतप्रोत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा / कर्मचाऱ्यांचा एक समृद्ध वारसा रक्तपेढीला लाभला आहे. रक्तपेढीचे काम करायला लागल्यानंतर विविध कामांच्या निमित्ताने अनेक कार्यालयांमध्ये, कंपन्यांमध्ये, बॅंकांमध्ये सातत्याने जाणे होत असे. मला आश्चर्य वाटायचे, जेव्हा अशा जवळपास प्रत्येक ठिकाणी आवर्जून ’मराठेकाका कसे आहेत ?’ अशी चौकशी केली जाई. हे मराठेकाका म्हणजेच श्री. दौलतराव मराठे – रक्तपेढीच्या स्थापनेपासून आजतागायत हरप्रकारच्या कामात मोलाचे योगदान दिलेले एक ’सेवाव्रती.’ सुरुवातीच्या काळात स्वत:ची नोकरी सांभाळुन आणि निवृत्तीनंतर तर जवळ-जवळ पूर्णवेळच त्यांनी रक्तपेढीच्या कामासाठी देऊ केला. रूढार्थाने रक्तपेढीशी संबंधित तांत्रिक अथवा सामाजिक असे कोणत्याही प्रकारचे शिक्षण मराठेकाकांनी घेतलेले नाही. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, कठोर परिश्रम आणि अंगभूत जिव्हाळ्याच्या आधारावर समाजातील सर्व स्तरांतून रक्तदान शिबिरे मिळविण्यासाठी मराठेकाकांनी अक्षरश: आपल्या वहाणा झिजविल्या आहेत. कितीतरी व्यक्ती आणि समूहांना केवळ आपल्या प्रेमाच्या बळावर मराठेकाकांनी रक्तपेढीशी बांधून ठेवले आहे. रक्तपेढीत आणि शिबिरांमधून मराठेकाकांचा नुसता वावरही त्या वातावरणामध्ये आपुलकी निर्माण करतो.
रक्तपेढीमधला मदतनीस महिला कर्मचाऱ्यांचा वर्गसुद्धा – ज्यांना आम्ही मावशी म्हणतो – असाच आपुलकी जपणारा. प्रत्येक मावशीची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. काहींचा लुकलुकाट असतो तर काहींचा गडगडाट, पण रुग्ण किंवा रक्तदाता यांची काळजी घेण्याच्या विषयात मात्र सर्वांचे वात्सल्य सारखेच. रक्तपेढी म्हटलं की रक्तदात्यांचा आणि रुग्णांच्या नातलगांचा वावर नित्याचाच. या सर्वांशी अगदी घरगुती पद्धतीचा संवाद जर कुणाचा होत असेल तर या मावश्यांचाच. रक्तदात्याला कॉफ़ी आणून देणं असु दे किंवा क्वचित एखाद्या रक्तदात्याला काही त्रास झाला तर त्याची सर्व प्रकारे काळजी घेणं असु दे, या मावश्या प्रेमाने आणि खंबीरपणे पुढे झाल्या नाहीत असं कधीच होत नाही. रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबद्दल सांगणं हे खरं तर मावश्यांचं काम नव्हे, पण आंतरिक प्रेमापोटी कॉफ़ी वगैरे देताना ’बरं वाटतंय ना ? जायची घाई करु नका बरं का, सगळी बिस्कीटं संपवायची आहेत बरं का’ अशी छोटी छोटी वाक्यंही सहज मावश्यांच्या तोंडुन येतात आणि या सलगीनेदेखील रक्तदाता सुखावतो. काही वेळा रुग्णासाठी रक्तघटक नेण्यास आलेला नातेवाईक जवळपासच्या खेड्यातून आलेला असतो. रक्तपिशवीची (लाल रक्तपेशी) वाहतुक करताना तिचं तापमान योग्य राहण्यासाठी ही पिशवी बर्फ़ामध्ये घेऊन जाणं आवश्यक असतं. ही बाब या व्यक्तीला माहिती नसते. अशा वेळीदेखील या मावश्याच या व्यक्तींना ’थांबा. आइसपॅक घेतल्याशिवाय जाऊ नका’ असे आग्रहपूर्वक सांगतात शिवाय स्वत: आइसपॅकमध्ये ती पिशवी ठेवुन ती कशी सांभाळायची याबाबतही सूचना देतात. रुग्णशय्येवर असलेल्या आपल्या नातलगाची आपल्यासारखीच काळजी इथे घेतली जात आहे, हे रक्तपिशवी न्यावयास आलेल्या व्यक्तीलाही सहजपणे जाणवते.
एक घटना तर कायम लक्षात राहील अशी आहे. एके दिवशी सकाळीच संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि जनकल्याण समितीचे प्रांत संघटनमंत्री श्री. शरद खाडीलकर यांचा मला फ़ोन आला. घरामध्ये ज्येष्ठ आणि कर्त्या व्यक्तीचे जे स्थान असते तेच स्थान रक्तपेढीतील आम्हा अधिकाऱ्यांसाठी शरदभाऊ खाडीलकरांचे आहे. त्यांनी स्वत: होऊन फ़ोन केला म्हणजे काहीतरी खास असणार असा अंदाज मी बांधतच होतो. ते फ़ोनवर मला म्हणाले, ’एक घटना तुझ्या कानावर घालण्यासाठी फ़ोन केला होता..’ आणि यानंतर त्यांनी ही घटना मला थोडक्यात सांगितली. आदल्याच रात्री उशिरा कोल्हापूरहून जनकल्याण समितीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते स्वारगेट बसस्थानकावर उतरले. उतरताना दुर्दैवाने त्यांच्या पायाला बसचा पत्रा लागला आणि पायाला चांगलीच जखम झाली. पायातून रक्तस्त्राव होत असलेल्या स्थितीतच ते बसस्थानकाबाहेर आले. बराच उशीर झाला असल्याने अन्य कुठला दवाखाना वगैरे सापडण्याची शक्यताच नव्हती. फ़ोनवर कुणीतरी दिलेल्या सूचनेवरुन जवळच असलेली जनकल्याण रक्तपेढी त्यांनी गाठली. रक्तपेढीत त्यांना यावेळी भेटला तो रात्रपाळीवर कार्यरत असलेला सहाय्यक तंत्रज्ज्ञ विश्वजीत. रक्तपेढीचे काम चोवीस तास चालु असते, तसे ते याही वेळी चालु होतेच. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विश्वजीतने तातडीने या कार्यकर्त्यांवर प्रथमोपचार तर केलेच पण त्याबरोबर त्यांच्याशी सुसंवाद साधत, त्यांच्या जेवण्या-खाण्याचीही आत्मीयतेने चौकशी केली. एकंदरीत ’ते योग्य ठिकाणी आले आहेत’ हे त्याने या कार्यकर्त्यांना जाणवून दिले. यानंतरही एका कुरियर कर्मचाऱ्याच्या मदतीने त्यांना जनकल्याण समितीच्या कार्यालयात सोडण्याची व्यवस्थाही विश्वजीतने लावुन दिली. हा सर्व प्रसंग शरदभाऊंनी आवर्जुन मला फ़ोनवर सांगितला. वास्ताविक ’प्रथमोपचार करणे हे आमचे काम नव्हे’ किंवा ’असं करा, तुम्ही फ़ोन करुन कुणाला तरी बोलावुन घ्या’ असं काहीही उत्तर येणं, तेही पुण्याच्या स्वारगेट परिसरात तर सहज शक्य होतं. पण कुठल्याही पूर्वपरिचयाशिवाय आणि त्यातही जनकल्याण समितीच्या कामाची काहीही माहिती नसतानादेखील विश्वजीतने केवळ प्रेमाच्या शब्दांनी आणि कृतीने या कार्यकर्त्यांचे हृदय जिंकले होते.
रक्तपेढीत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेला आमचा जवळचा मित्र संतोष अनगोळकर याच्याही बाबतीत घडलेला एक विलक्षण प्रसंग मला आमच्याच एका डॉक्टरांनी सांगितला. झालं असं, प्लेटलेटदान करण्यासाठी एक दाता एके दिवशी रक्तपेढीत आला. अशा स्वयंस्फ़ूर्त आणि समर्पित प्लेटलेटदात्यांचा संच बांधण्यात संतोषचे फ़ारच मोठे योगदान आहे. हा प्लेटलेटदाता रक्तपेढीत आला तेव्हा योगायोगाने संतोष नव्हता. पण या दात्याने आमच्या डॉक्टरांना आल्या आल्याच प्रश्न टाकला, ’हे संतोष सर कोण आहेत हो ?’ आणि यानंतर पुढे बोलताना तो म्हणाला ’यांची आणि माझी अजून प्रत्यक्ष भेट झालेलीच नाहीये, मात्र फ़ोनवरुन बोलतानाच या माणसाच्या बोलण्यात इतकी आपुलकी असते की, केवळ हा माणूस म्हणतो म्हणून मी प्लेटलेटदान करायचे ठरवले आणि ते नियमित करता यावे याकरिता माझ्या जीवनशैलीमध्येही बदल केले. काही चुकीच्या सवयीदेखील निग्रहाने बदलल्या. या बदलाचे श्रेय केवळ या व्यक्तीलाच आहे. आता मी नियमित प्लेटलेटदान करु शकेन याचे मला खरोखरीच समाधान आहे.’ हे डॉक्टरांकडुन ऐकत असताना मीही चकित झालो. केवळ फ़ोनवर झालेल्या आपुलकीच्या संभाषणामुळे या व्यक्तीने स्वत:ला आमुलाग्र बदललं होतं. ही खरोखरीच एक ’सक्सेस स्टोरी’ होती. संतोषच्याच बाबतीत दुसरा एक नियमित रक्तदाता मला म्हणाला होता, ’संतोष सर आमच्याशी इतकं गोड बोलतात की यांच्या सांगण्यावर केवळ रक्तदानच नव्हे तर आम्ही अवयवदानही आनंदाने करु.’ हे विधान त्याने आलंकारिक म्हणून केलेलं नव्हतं तर तो अत्यंत मनापासून बोलत होता, हे मला त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. किती विलक्षण गोष्ट !
अर्थात ही सर्व उदाहरणे तशी प्रातिनिधिकच म्हणता येतील. रक्तपेढीच्या सर्वच विभागांमध्ये असा निष्कपट जिव्हाळा जपणारी माणसे आहेत. ’शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है’ हाच मंत्र इथल्या मदतनीस मावश्यांपासून ते संचालकांपर्यंत सर्वांनीच जपला आहे. रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातही, रक्तपेढीत आलेले रक्तदाते, रुग्ण इ. जणांशी त्यांनी साधलेला अगदी दोन-तीन वाक्यांचा संवादही या लोकांना आश्वासक वाटतो, ’डॉक्टरांना आपली काळजी आहे’ असा सार्थ विश्वास देणारा वाटतो. स्वाभाविकच रक्तदाते, शिबिरसंयोजक, रुग्ण वगैरेंकडुनही हा सर्व जिव्हाळा रक्तपेढीला जशाला तसा, किंबहुना थोडा अधिकच परत मिळतो.
 
जनकल्याण रक्तपेढी ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आधुनिक रक्तपेढी मानली जात असली तरी तिचा गाभा आहे तो असा हा निखळ स्नेहाचा. याच प्रेमाच्या आधारावर अनेक मोठमोठी कामे सहजपणे होऊन जातात. कबीराने अशा प्रेमाचे अगदी यथार्थ वर्णन केले आहे –
’पोथी पढी पढी मुआ, पंडित भया न कोय

ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय’
खरेच आहे. प्रेमाचीच अडीच अक्षरे एकदा नीटपणे गिरवली की त्यायोगे जगही जिंकता येते. रक्तपेढीसारख्या सेवाप्रकल्पाचे मुख्य भांडवल आहे ते हेच !
- महेंद्र वाघ