‘जय गिरनारी’
 महा एमटीबी  14-Dec-2017


सहलीला जाणं, ट्रेकिंग करणे हा सध्या सगळ्यांच्या आवडीचा विषय बनला आहे. सुट्टीच्या दिवशी लोक कुठे ना कुठे जायची योजना आखतात. मात्र, त्यामध्ये कधी कधी वाद होतात ते म्हणजे देवदर्शनाला जायचं की ट्रेकिंग करायला जायचं? पण जर या दोघांचा मेळ एकाच ठिकाणी साधता आला तर? हो. हे शक्य आहे. त्यासाठी गिरनार पर्वताला जाण्याची योजना कधीही मस्त...
गिरनार पर्वत म्हणजे खूप उंचच उंच डोंगर आहे. जो पार केल्यानंतर आपल्याला डोंगराच्या सर्वात वरच्या निमुळत्या टोकावर दर्शन घडते ते दत्ताचे आणि इतका डोंगर चढून गेल्याचा सर्व शीण तिथे निघून जातो. गिरनार हा गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर आहे. गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात हा विशाल डोंगर उभा आहे. सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिररक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगांपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव हे 'गिरीनारायण' असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला 'गिरनार' असे म्हटले जाते.
 
गिरनार डोंगराची उंची १,११७ मी. आहे. त्याचा घुमटाकृती मध्यभाग डायोराइट व माँझोनाइट यांचा बनलेला आहे. गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत. सुभद्राहरण येथेच झाले. श्रीकृष्णकालीन रैवतक महायात्रा येथे हल्ली कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरते. असे म्हटले जाते की, अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैनांचा पहिला तीर्थंकर ऋषभदेव यानेही त्याचा उल्लेख केला आहे. येथे इ.स.पू. २५० मधील अशोककालीन शिलालेख आहे. इ.स. १५० च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे.
 
 
सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्थान दत्तोपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतीप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणी समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे. यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका हे विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.
 
 
गिरनार हे शाक्त, दत्त व जैनपंथीयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दाम्पत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरुशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचा बाविसावा तीर्थंकर नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्याचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही, या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरूंत जैन बहुसंख्य असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.
 
 
जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. या डोल्या वाहून नेणारी माणसे तो इतका विशाल पर्वत असा काही चढतात की जसे काही सरळ-सरळ रस्ता चढत आहेत आणि त्यांना बघून आपल्यासारख्या कधीतरी जाणाऱ्याला आश्चर्याचा धक्का न बसावा म्हणजे नवल. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायर्‍या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारे दहा हजार पायर्‍यांची चढ-उतार करावी लागते.
 
 
गिरनारला गेल्रावर तिथे राहायच्या उत्तम सेवेसह धर्मशाळा आहेत. त्यातील दिगंबर धर्मशाळेपासून गिरनार पर्वत चढण्यासाठी मुख्य दरवाजा आहे. चढताना सुरुवातीला काळ्या दगडांचा वापर करून पायऱ्या बनवल्या आहेत. चढताना मध्ये मध्ये पुजारी, विद्वान यांच्या छोट्या छोट्या गुंफा दिसतात. चढताना प्रत्येक भाविक 'जय गिरनारी' या मंत्राचा उच्चार करत करतच वर चढतो.
गिरनार चढताना आपण जवळजवळ पाच डोंगर चढतो आणि उतरतो. त्यापैकी पहिला डोंगर चढताना ४४०० पायऱ्या आपण चढतो. गिरनारच्या या पहिल्या टोकावर जैन लोकांची मंदिरे आहेत. जी भारतीय कलाकृतींचे उत्तम नमुने आहेत. तिथूनच पुढे जाताना पद्मावतीची मूर्ती तिथे दिसते. तिथून पुढे गेल्यानंतर दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी ९०० पायऱ्या चढाव्या लागतात. तिथे डाव्या बाजूला मुनिश्री अनिरूद्ध कुमार यांच्या प्राचीन पादुका आहेत. त्यांच्या बाजूलाच अंबादेवीचे मोठे मंदिर आहे. तिसऱ्या डोंगरावर चढताना ७०० पायऱ्या आहेत. तिसऱ्या डोंगराच्या टोकावरून खाली उतरावे लागते. तिथे १५०० पायऱ्या चढल्या आणि उतरल्यावर चौथा डोंगर लागतो. इथे मात्र चढण्यासाठी पायऱ्या नाहीत. दगडच एकमेकांवर आहेत. तिथे जागोजागी चढताना भाविकांच्या मार्गदर्शनासाठी लाल रंगाने बाण काढले आहेत. हा सर्वात कठीण टप्पा असतो. चढायला खूप कष्ट लागतात. तिथून पाचव्या डोंगराच्या टोकावर जाण्यासाठी सुरुवात होते. हे सर्वात उंच शिखर आहे आणि विशेष म्हणजे तिथे पोहोचल्यावर तिथून चारही बाजूंचे दृश्य मनमोहक असते.
 
 
मुख्य पर्वतावर जाण्याआधी खाली दोन द्वार लागतात. त्यातील एक द्वार वरील दत्ताच्या मंदिरापर्यंत जाते तर दुसरे खाली कमंडलू कक्षापर्यंत जाते. पर्वतावर गेल्यावर ढग अगदी आपल्या बाजूने जाण्याचा जो काही आनंद असतो ना तो शब्दात मांडणे कठीण आहे. तिथे वर प्रचंड वारा असतो. त्या वाऱ्यामुळे आपण एका ठिकाणी नीट उभेदेखील राहू शकत नाही. मात्र, तरीही इतका उंच पर्वत चढण्याचा केलेला खटाटोप, कष्ट सगळे काही तिथे येऊन त्या वातावरणात गेल्यावर विस्मरणात जाते आणि आपण पूर्णपणे त्या थंडगार वाऱ्यात स्वतःला झोकून देतो. शेवटच्या डोंगराच्या त्या टोकावर पत्र्याने बांधलेले छोटेसे मंदिर आहे आणि त्यात दत्ताची अगदी सुबक अशी मूर्ती मधोमध आहे. तिच्या बाजूने गोलाकार कुंपणासारखे असून दर्शन घेतल्यावर लगेच बाहेर पडावे लागते. कारण ते मंदिर इतके छोटे आहे आणि त्यात ते पत्र्याचे असल्याने त्यावर वारा प्रचंड वेगात येऊन आपटत असल्याने पत्र्याचा भयंकर आवाज येत असतो.
  
हा प्रवास कधीही करा. दिवसा करा किंवा रात्री करा. भीती तर वाटतेच, पण मनात उत्साह असेल तर तो तुम्ही नक्कीच पार करू शकता. आमचा भर पावसाळ्रात रात्रीचा केलेला प्रवास न विसरण्राजोगा होता. जसजसे वर जात होतो तसतसे पाण्याचे टपोरे थेंब अंगावर पडत होते. प्रचंड वारा होता. लाईटच्या वारर्सदेखील वाऱ्यासोबत हलत होत्या. पावसामुळे त्या ओल्या झाल्या होत्या, आम्ही ओले झाले होतो. त्यामुळे प्रचंड काळजी घेत एक-दुसऱ्याचा हात पकडत आम्ही चढत होतो. पावसामुळे की काय माहीत नाही मात्र, वर लाईट नसल्याने हातात बॅटरी घेऊन जावे लागले होते. ते सर्व सांभाळत वर चढत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी सूर्याचे प्रथम दर्शन आम्ही ढगातच बसून घेतल्याचा सुंदर अनुभव आम्हाला आला. गिरनारसारख्या ठिकाणी एकटे जाण्याऐवजी मोठ्या ग्रुपने गेल्यास अजून मजा येते. प्रत्येकाने एकदा तरी गिरनार पर्वताला भेट द्यायलाच हवी. त्याचा सगळ्यांनाच अविस्मरणीय अनुभव मिळेल, यात शंका नाही.
 
 
- पूजा सराफ