कर्जतच्या आमसभेत कोणताही निर्णय नाही
 महा एमटीबी  14-Dec-2017

अनेक खात्यांचा तर आढावाही नाही

 
 
 
 
कर्जत : प्रतिवर्षीप्रमाणेच कर्जत तालुका पंचायत समितीच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी यंदाही कर्जतमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र जनतेच्या प्रश्नांना अर्धवट उत्तरे देणारी आणि कोणताही ठोस निर्णय देणारी नसल्यामुळे या आमसभेनंतर सर्वांची घोर निराशाच झाली अशी प्रतिक्रिया जनसामान्यांकडून व्यक्त केली गेली आहे.
 
यंदा या आमसभेचे आयोजन कर्जत नजीकच्या किरवली येथील शेळके मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले होते. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आमसभेला पंचायत समितीचे सभापती अमर मिसाळ, उपसभापती सुषमा ठाकरे, प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे, सुधाकर घारे, अनसूया पादिर, रेखा दिसले आणि सहारा कोळंबे, पंचायत समिती सदस्य प्रदीप ठाकरे, रवींद्र देशमुख, नरेश मसणे, काशीनाथ मिरकुटे, राहुल विशे, अरुणा हरपुडे, कविता ऐनकर, जयवंती हिंदोळा आणि सुजाता मनवे आदींसह गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, सहाय्यक गटविकास अधिकारी ए. के. रजपूत हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
 
विशेष म्हणजे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची आवर्जून उपस्थिती असलेली आमसभा ज्या खात्यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केली होती; त्यातील अनेक खात्यांचा आढावा जनतेसमोर आलाच नाही. दरम्यान, ही आमसभा अधिकारी वर्गाला पाठीशी घालण्यासाठीच घेतली जात असेल; तर अशी आमसभा नसली तरीही चालेल अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी याप्रसंगी व्यक्त केली.
 
मागील सभेचे इतिवृत्त वाचून सभेचा प्रारंभ करण्यात आला. यावर तासभर चर्चा झाल्यानंतर हे इतिवृत्त मंजूर झाले. या इतिवृत्तात अनेक त्रुटी आढळल्या. त्यावर मागील आमसभेत प्रश्न उपस्थित केलेल्यांनी आक्षेपदेखील घेतला. मात्र सभाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना सावरलेले दिसून आले. दिवंगत ग्रामसेवक एस.ए.बुरूड यांच्या कुटुंबियांना पाच वर्षानंतरही निवृत्तीवेतन सुरू झाले नसल्याबद्दल सभाध्यक्ष आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली, त्यावेळी मागील आमसभेत दिलेल्या उत्तराप्रमाणेच एक महिन्यात प्रश्न निकाली काढू असे गुळमुळीत उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. मागील इतिवृत्तात समाविष्ट असलेल्या विषयांवरील चर्चेतदेखील समाधानकारक कार्यवाही झाली नाही. त्यावेळी जनतेतून त्यावर नोंदविलेल्या आक्षेपाची गांभीर्याने नोंदही घेण्यात आली नाही.
 
कर्जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेताना; रायगड जिल्हा परिषदेने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. सन २०१५-१६ मध्ये बांधकाम विभागाकडे केवळ पंधरा लाखांची तरतूद असताना बेचाळीस लाखांच्या कामाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आणि ती कामे पूर्ण झाली असल्याने त्या ठेकेदारांची बिले अदा कशी करणार हा प्रश्न आमसभेत अनुत्तरितच राहिला. त्यावेळी सन २०१४-१५ मधील १ कोटी ६० लाख रुपयांची बांधकाम विभागाची बिले अदा करताना पंचायत समितीने दिव्यांग, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, आरोग्य आणि शिक्षण विभाग यांचा निधी खर्च करून ती बिले देण्यात आली. त्याबद्दल सुदाम पेमारे, वामन ठोंबरे, पांडुरंग बदे यांनी खेद व्यक्त करीत; दिव्यांगांसाठीचा राखीव निधी बांधकामावर खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर जैतू पारधी यांनी महिला बालकल्याणचे चाळीस लाख रुपये बांधकामाकडे वळविल्याने तालुक्यात कुपोषण वाढले असल्याचे दाखवून दिले. आज तालुक्यातील ठेकेदारांचे लाखो रुपये अडकले असून त्यांची बिले अदा करण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने हे ठेकेदार संकटात सापडले आहेत. मात्र यावेळीदेखील; सभाध्यक्ष आमदार लाड यांनी; या गटविकास अधिकाऱ्यांमुळेच सत्य बाहेर आल्याचे सांगत या महत्त्वाच्या प्रश्नी गटविकास अधिकाऱ्यांची पाठराखण केली.
 
तालुका विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम दीड महिन्यांपूर्वी ठरला असूनही त्याच दिवशी आणि त्याच वेळी पंचायत समितीची मासिक सभा कशी लावली जाते, विज्ञान प्रदर्शनाचे निमंत्रक ही सभा कशी घेऊ शकतात, या दीपक पाटील यांच्या प्रश्नावर असे पुन्हा होऊ नये याबाबत खबरदारी घ्यावी असे सुचवून जबाबदार असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांचीच बाजू घेतली गेली.
 
चांधई येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सध्या केवळ दोनच शिक्षक आहेत. आम्हाला सलग सदतीस दिवस पाठपुरावा करूनही शिक्षक मिळाले नसल्यामुळे सोमवारपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी आमसभेत सांगितले. त्यावेळी त्या शाळेला शिक्षक मिळवून देण्याऐवजी; शिक्षकांच्या बदलीची ही वेळ नसून शाळा बंद ठेवली तर तुमच्याच मुलांचे नुकसान होईल असे सुचवून सभाध्यक्ष आमदार लाड यांनी सांगितले आणि निर्णयाविना हाही प्रश्न संपून गेला.
 
प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नसल्याचा प्रश्न सोमनाथ विरले यांनी उपस्थित केला असता; शेजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने औषधे उपलब्ध करून देण्याची सूचना सभाध्यक्षांनी केली. मात्र नेरळ आणि कळंब या दोन्हीही केंद्रामध्ये औषधे शिल्लकच नसल्याने तेथे कोणी औषध पुरवठा करायचा हे मात्र जाहीर केले गेलेच नाही. त्यामुळे हाही प्रश्न अनुत्तरितच राहिला. प्राथमिक आरोग्य केंद्रात खिचडी बनविण्यासाठी फक्त तांदूळ आला असून अन्य कडधान्याबाबत काय करायचे अशी विचारणा मारुती विरले यांनी केली. ग्रामपंचायतीने त्यासाठी निधी देण्याची सूचना सभाध्यक्ष लाड यांनी केली. परंतु कडधान्य येणे का बंद झाले; याबद्दल कोणतीही माहिती दिली गेलीच नाही. धामोते गावातील रस्त्याच्या प्रश्नाबाबतही; ग्रामपंचायतीला काही विचारण्याचा अधिकार आमसभेला नाही असे उत्तर आमदार लाड यांनी दिले. कोणत्याही ठोस निर्णयाविना उरकल्या गेलेल्या या आमसभेमुळे उपस्थितांपैकी बहुसंख्य नागरिकांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.