'शॉप फॉर चेंज' एक अभिनव संकल्पना
 महा एमटीबी  14-Dec-2017

 
एका मराठी म्हणीप्रमाणे ‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’, म्हणजे आधी पोटात अन्न असेल, भूक भागलेली असेल तर आपण कोणतेही काम पटापट पूर्ण करू शकतो. मात्र, हे अन्न आपल्यापर्यंत पोहोचविणारे शेतकरी किती कष्ट घेतात, परत त्यांना मिळणारा मोबदला, कर्ज इ. सर्व बघता त्यांना त्यांच्या हक्काचे, कष्टाचे पैसे मिळवून देणे या जाणिवेने समीर आठवले या गृहस्थाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी 'शॉप फॉर चेंज' या अभिनव संकल्पनेचा पाया रचला. समीर यांना शेती आणि त्याविषयीच्या कामांचा काहीच अनुभव नसतानाही त्यांनी शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला भाव व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. समीर हे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
 
 
सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात माहिती देण्याचा आणि त्याद्वारे मार्केटिंग करण्याचा व्यवसाय करता करता समीर यांनी देशातील लहानमोठ्या किमान पन्नास हजार शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला. अभियंता असल्याने त्यांचा शेतीशी संबंध येण्याचा प्रश्‍न नव्हता मात्र, शेतकरी आणि ग्राहक या दोघांमधील मध्यस्थांचा होणारा त्रास त्यांनी जवळून पाहिला असल्याने ती स्थिती बदलण्यासाठी काहीतरी करावे, असा विचार त्यांच्या मनात आला.
 
 
समीर यांच्या मते शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेला मध्यस्थ जास्त नफा खाऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मेहनतीचे पैसे मिळावे आणि ग्राहकांना ताजा आणि भेसळमुक्त माल मिळावा यासाठी 'शॉप फॉर चेंज'ची स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. समीर म्हणाले की, ''ग्राहक चांगल्या वस्तूला जास्त पैसे देऊन घ्यायला तयार आहे मात्र, त्याला दर्जा हवा आहे. मात्र, याचा फायदा मध्यस्थ व्यक्ती घेऊन हवा तो भाव लावतो आणि मग शेतकऱ्यांना कमी पैसे मिळतात. आठवले यांनी या विषयावर पूर्ण वेळ देण्याचे ठरविले आणि घरच्या कौटुंबिक जबाबदार्‍या त्यांच्या पत्नीने स्वीकारल्रा आणि त्यांना या क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्यास वाव मिळाला.
 
 
समीर यांनी या कामाची सुरुवात केली ती 'धुळ्यातील बारीपाडा येथील शेतकर्‍यांनी पिकवलेला सुवासिक सेमी पॉलिश इंद्रायणी तांदूळ तुम्हाला आपल्या डोंबिवली, ठाणे व विक्रोळी येथील केंद्रांद्वारे उपलब्ध करून देण्यात आम्हाला आनंद होत आहे,' या जाहिरातीने.
 
 
ते म्हणाले की, ''हा तांदूळ बारीपाडा येथील मेहनती व प्रगतीशील शेतकर्‍यांनी पिकवलेला आहे. तांदळाच्या प्रत्येक पॅकवर (५ किलो किंवा १० किलो) पिकवणार्‍या शेतकर्‍यांचे नाव देण्यात आलेले आहे. बारीपाडा येथील शेतकरी व त्यांचे नेतृत्व चैतरामजी पवार यांच्याकडे आहे. त्यासाठी डोंबिवली येथील सेवाभावी संस्था विवेकानंद सेवा मंडळाचे सहकार्य त्यांना लाभले.''
 
 
आठवले म्हणतात की, ''माल रास्त भावाने थेट ग्राहकांना मिळतो आणि शेतकर्‍याला त्यांच्या उत्पादनाला किंमतही मिळते.'' त्यांची www.shopforchange.in वेबसाईट देखील आहे. तसेच ग्राहक ९३२००३२६७५ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर फोन न करता फक्त नाव, पत्ता व माल किती किलो हवा आहे आणि डिलिव्हरीची सोयीची वेळ सांगून मागणी देखील करु शकता. त्याशिवाय ०२२- ६५३३५७७१ या नंबरवर सोमवार ते शनिवारमध्ये १० ते ६ या वेळात फोन करून मागणी नोंदवू शकता. जुलै २०१६ पासून चालू झालेल्या 'शॉप फॉर चेंज'ने फेब्रुवारी २०१७ पर्यंत अनेक मोठे टप्पे पार केले. १५ ते २० मराठी तरुणांसाठी रोजगार उपलब्ध झाला. समीर यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी ते ग्राहक हे तयार करून दिलेले व्यासपीठ अनेक शेतकऱ्यांना एक चांगली सोबत आहे.
- पूजा सराफ