दिव्यांग विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी...
 महा एमटीबी  13-Dec-2017

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक

 

 
 
सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी अर्थात नाशिक आणि नागपूर येथे असलेली प्रसिद्ध भोसला मिलिटरी स्कूल या नावाने ओळखली जाणारी संस्था. लष्करी शिक्षण हा संस्थेच्या कार्याचा प्रमुख विषय असला तरी समाजजीवनात अनेक अर्थाने लोकोपयोगी कार्य ही संस्था करीत आहे. खेळ आणि साहसी खेळ हा संस्थेच्या कार्याचा महत्चाचा भाग आहे. संस्थेच्या कुशल मार्गदर्शकांनी अनेक खेळाडू घडविले आहेत, त्यांना नवा आत्मविश्वास दिला आहे. आणखी एका नव्या क्षेत्रात संस्थेच्या भोसला स्विमिंग क्लबच्या दिव्यांग खेळाडूंनी गेल्या चार दोन वर्षात अनेक राष्ट्रीय सुवर्ण पदके मिळवून देणारी लक्षणीय कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे या मुलांनी इतर दिव्यांग आणि सर्वसामान्य मुलांसमोर आदर्श निर्माण केला असून पालकांना देखील नवी ओळख दिली आहे.
 
व्यंग व्यक्तींच्या स्पर्धा भरतात, त्याला पॅराऑलिम्पिक स्पर्धा म्हटले जाते. विविध कॅटेगरीत या स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या दिव्यांग मुलांनी नेत्रदीपक कामगिरी केली. देशात अनेक ठिकाणी झालेल्या अशा पॅराऑलिम्पिक स्पर्धांतून यश मिळवून नाशिकचे नाव या स्पर्धकांनी उंचावले आहे. या मुलांच्या यशाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. यशस्वी मुलांच्या कर्तबगारीमध्ये भोसलाचे प्रा. प्रकाश पाठक, सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, नारायण दीक्षित, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर आदी पदाधिकारी, स्पोटर्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रशिक्षक शंकर मादगुंडी, घनःश्याम कुंवर, भूषण कुंवर यांच्याबरोबरच या मुलांच्या पालकांचादेखील मोठा वाटा आहे.
 
दिव्यांग मुलांचे पालक आपले मूल सर्वसामान्य मुलांसारखे कसे होईल, या चिंतेत असतात. देशभरात दिव्यांग मुलांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत. दिव्यांग मुलांचे पालक मुलांच्या भवितव्यासाठी कायम चिंतेत असतात. त्यासाठी ते विविध उपचार करीत असतात. याचाच एक भाग म्हणून त्यांना पोहणे शिकविले तर त्यांच्या क्षमता सुधारतील असे सांगितले जाते. नाशिकच्या पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. आपल्या मुलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी पालकांनी त्यांना भोसला मिलिटरी स्कूलच्या तरणतलावात पोहण्याचे प्रशिक्षण दिले. नुसते पोहण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या शारीरिक क्षमतांचा विकास करण्याचे स्वप्न पाहिले नाही तर मुलांच्या आयुष्यात ध्येय पेरून त्याद्वारे त्यांना आत्मविश्‍वास देण्याचेही ठरवले.
 
याकामी पालकांच्या सोबतीला होते भोसलाचे प्रशिक्षक, पदाधिकारी. त्यांनी मुलांना नुसते पाण्यात पोहणे शिकवले नाही तर मुलांनी जगाच्या पटलावर स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे, याचेही प्रशिक्षण दिले. मुलांच्या आत्मभानाच्या जाणिवा रूंदावण्यासाठी प्रशिक्षकांनी, भोसलाच्यापदाधिकार्‍यांनी हरप्रकारे प्रयत्न केले. ’प्रयत्ने वाळूचे, कण रगडिता तेलही गळे,’ असे म्हणतात. या दिव्यांग मुलांच्या बाबतीतही तेच झाले.
 
पालक आपल्या मुलांना नाशिकच्या भोसला प्रांगणात श्री राम मंदिराच्या मागे असलेल्या स्विमिंग टँककडे घेऊन येतात. सायंकाळी आपण जर या तरणतलावाकडे गेलो तर आपल्याला अनेक मुले पोहण्याचे प्रशिक्षण घेत असलेले दिसतात. आसपास त्यांचे पालकदेखील असतात. अनेक विद्यार्थी सायंकाळी मौजमजा करीत असतात तेव्हा ही मुले पोहण्याची साधना करताना दिसतात. पोहण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते हे तर जगजाहीरच आहे. त्यामुळे या मुलांचे कौतुक वाटते.
 
सुवर्णपदके मिळविणार्‍यांमध्ये अनेक नावे येतात. त्यांची कामगिरी पाहूया.
 
सुनील वाल्मिक पवार
विविध स्पर्धांतून सर्वाधिक सुवर्णपदके आणि अन्य पदके मिळवून विक्रम करणारा सुनील वाल्मिक पवार हा गुणी जलतरणपटू गेल्या ११ वर्षांपासून म्हणजे २००६ पासून या क्षेत्रात आहे. विशेष म्हणजे भोसला परिसरात आपला सराव करून यश मिळविणार्‍या सुनीलला गेल्या दोन वर्षांपासून तेथे कायमस्वरूपी नोकरीदेखील देण्यात आली आहे. त्याचे लग्न देखील झालेले आहे. ३६ वर्षांच्या सुनीलने सांगितले की, पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी वयाचे बंधन नसते. पहिली दोन वर्षे सराव केल्यानंतर तो स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. राजस्थानमधील उदयपूर येथे ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. कोलकाता, मुर्शिदाबाद, औरंगाबाद अशा अनेक स्पर्धांतून त्याने यश मिळविले आहे. कुलाब्याला झालेल्या नेव्हीच्या खुल्या गटात तो सहावा सातवा आला होता. २ तास ५५ मिनिटांत त्याने १९ किलोमीटर लांब पल्ल्याची शर्यत पूर्ण केली आहे. रोटरी क्लब, माळी समाज संस्था, शिव सह्याद्री आणि दिव्यांग कल्याणकारी संस्था अशा अनेक संस्थांनी त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याचा यथोचित गौरव केलेला आहे. सातत्याने प्रयत्न करून यशाची कमान खेचून आणणार्‍या सुनीलचे ध्येयाप्रतीचे सातत्य प्रेरणादायी आहे.
 
 
पूजा राजेंद्र पवार
एस १० कॅटेगरीतील अनेक सुवर्णपदकांची मानकरी असलेल्या पूजाला येथे आणले तेव्हा तिला चालता येत नव्हते. त्यावेळी पालकांना तिच्या भवितव्याविषयी काळजीने नक्कीच ग्रासले असणार, पण तिच्या पालकांनी हिम्मत हरली नाही. त्यांनी पूजाला स्वतःच्या पायावर उभे करायचे ठरवले. तिला तिचे अस्तित्व निर्माण करू द्यायचे. त्यासाठी तिची ट्रीटमेंट करणे गरजेचे होते. त्यांनी तिला ट्रीटमेट देण्यासाठी स्विमिंग शिकविले आणि ती चालू लागली. त्यानंतर सुमारे दोन वर्षात ती विविध स्पर्धांतून भाग घेऊ लागली. २०१० मध्ये माजी महापौर दशरथ पाटील यांच्या संस्थेतर्फे तिला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढला. २०११ पासून तिने अनेक स्पर्धांतून चमक दाखविली. त्यात बेळगाव, चेन्नई, जयपूर, कोल्हापूर अशा विविध राष्ट्रीय स्पर्धांतून प्रामुख्याने सुवर्ण, रौप्य अशी २५ पदके मिळविली. फ्रीस्टाईल बॅक स्ट्रोकमध्ये ती पारंगत झाली असून २० वर्षीय पूजा सध्या दहावीत शिकत आहे. खेळाबरोबरच अभ्यासातही पूजा मोठ्या तयारीने उतरली आहे. भविष्यात यश तिचेच आहे, यात काही शंका नाही.
 
सायली सुनील पोहरे
हसतमुख, हौशी असलेली सायली सध्या एसएनडीटीमध्ये फाईन आर्टचे शिक्षण घेत आहे. एस ६ श्रेणीत विविध स्पर्धांतून भाग घेत तिने २० सुवर्ण, १२ रौप्य,१-२ ब्रॉंझ अशी २८ ते ३० पदके मिळविली आहेत. विशेष म्हणजे तिला एमपीएससी परीक्षा देऊन शासकीय अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी ती कसून मेहनत घेताना दिसत आहे. २०११ ते २०१७ दरम्यान तिने काही राज्य स्पर्धांतून यश मिळविल्यानंतर चेन्नई, उदयपूर, कोल्हापूर, जयपूर, बेळगाव अशा प्रत्येक स्पर्धेत तिने भाग घेतला. सक्षम संस्था तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत तिचा जाहीर सत्कार झालेला आहे. पोहण्याचे शिक्षण घेण्यापूर्वी तिचा उजवा हात नीट फिरत नव्हता, मात्र नंतर तो फिरू लागला. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. मालवण समुद्रात २ किलोमीटर अंतर १ तासात पोहून तिने विक्रम नोंदविला आहे. सायलीच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा विचार करता जाणवते की, सायलीसारख्या युवती समाजाच्या मार्गदर्शिका आहेत.
 

सिया सचिन पाटील
दहा वर्षांची सिया गेल्या दोनच वर्षांपासून पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे, मात्र इतक्या कमी वेळात तिने मिळविलेले यश लक्षणीय आहे. एस ७ सब ज्युनियर गटात तिने २०१५, १६, १७ मध्ये बेळगाव, जयपूर,उ दयपूर येथील स्पर्धांतून भाग घेऊन एकून ९ सुवर्णपदके मिळविली. तिने राज्य स्पर्धांतून मिळवलेली पदके पाहिली तर एकूण २२ सुवर्णपदके तिला मिळालेली आहेत. पन्नास मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये तिची चांगली प्रगती आहे. सोलापूरमध्ये तिला राज्यस्तरीय ’सह्याद्री भूषण बेस्ट अचिव्हमेंट पुरस्कार २०१७’ प्रदान करण्यात आला. सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी असलेल्या सियाला शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान देखील मिळालेला आहे. विविध पारितोषिकांची मानकरी ठरलेली सिया, तिला मिळालेले यश हे सहज नाही. त्यासाठी तिने अपार कष्ट केले. सराव केला. सरावातून यशाचा मार्ग ठरवला.
 
सिद्धी मिलिंद भांडारकर
एस ८ श्रेणीतील ११ वर्षीय सिद्धी गेल्या दोन वर्षांपासून पोहण्याचा सराव करीत आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये तिला राज्य पुरस्कार मिळाला. पुण्याच्या बालेवाडी येथे झालेल्या स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले. त्यानंतर जयपूरमध्ये झालेल्या ’टी १६’ स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले. चित्रकलेची आवड असलेली सिद्धी ही मराठा विद्या प्रसारक मंडळ समाजाच्या अभिनव बालविकास मंदिरात शिक्षण घेत आहे. पोहण्याच्या व्यायामातून अनेक शारीरिक कमतरतांवर मात करता येते, हे सिद्धीने दाखवून दिले आहे. पी. एन. जी. (गाडगीळ सराफ), मविप्र शिक्षणसंस्था आदींनी तिच्या कामगिरीची दखल घेऊन सत्कार केलेला आहे. पहिल्या प्रथम पोहण्याचे प्रशिक्षण घेताना कदाचित सिद्धीने यशाचा विचार केला असेल का? पण एकचित्ताने आणि मनःपूर्वक केलेल्या सरावामुळे जिद्दीने तिने यश खेचले.
 
 
गौरी सुनील गर्गे
विस्डम हाय इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी गौरी १६ वर्षांची असून तिने ’एस ६’ गटात अनेक विक्रम नोंदविले आहेत. २०१० मध्ये तिने पोहण्याचा सराव सुरू केला. २०१३ पासून ती विविध स्पर्धांतून सहभागी होऊ लागली. मुंबई, पुण्यातील स्पर्धांनंतर तिने इंदोर,(४ सुवर्ण, ३ रौप्य) जयपूर (१ सुवर्ण,२ रौप्य), उदयपूर (६ सुवर्ण,४ रौप्य) येथील राष्ट्रीय स्पर्धा उत्कृष्ट यश संपादन करून गाजविल्या. विशेष म्हणजे तिला चेसची आवड आहे. सक्षम, पी. एन. जी. (गाडगीळ सराफ), आयकर खाते यांनी तिच्या कामगिरीबद्दल गौरव केलेला आहे. गौरीच्या कामगिरीकडे पाहून वाटते की, कुठे पोहणे आणि कुठे बुद्धिबळ? पण गौरी या दोन्ही खेळांमध्ये पारंगत आहे. तिची क्षमता बैठे तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये समान आहे.
 
 
सर्व काही असताना क्षणिक निराशा झाल्यावर आत्महत्येचा विचार करणारे आपल्या समाजात पैशाला पासरी आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करत, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार्‍या या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याचबरोबर त्यांना प्रेरणा देणार्‍या, मार्गदर्शन करणार्‍या भोसला मिलिटरी स्कूलचेही कौतुक आणि अभिनंदन!
 
मुलांनी मिळवलेल्या यशाचा अभिमान सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या आम्हा सर्वांना आहे. समाजाच्या मापदंडात दिव्यांग म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुलांनी आपल्या कर्तृत्वाने समाजासमोर नवे मापदंड उभे केले आहेत. या मुलांच्या पालकांचेही अभिनंदन की त्यांनी हिम्मत न हारता चौकटीपलीकडे जाऊन मुलांच्या भवितव्याचा विचार केला. ’सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ या होतकरू आणि सर्वार्थाने गुणी मुलांच्या सदैव पाठीशी आहे.
                                 
 
सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी