राधिका आपटे बनली अक्षय कुमारची बायको
 महा एमटीबी  13-Dec-2017

 
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'रोबोट-२' हा रजनीकांत यांच्या सोबतच चित्रपट जानेवारी मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता त्या चित्रपटाच्या जागी अक्षयचा 'पॅडमॅन'हा चित्रपट येत आहे. या अगोदर या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. आज तिसऱ्या पोस्टरमधून राधिका आपटे व अक्षय कुमार सर्वांच्या भेटीला आलेले आहेत. या चित्रपटात राधिका प्रथमच अक्षयच्या बायकोच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ' माझी बायको सुद्धा मला विचारात आहे की, या चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार?' अशी कॉमेंट अक्षयने या पोस्टवर केली आहे.
 
 
 
हा चित्रपट खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी पॅड्स तयार करणाऱ्या कोईमतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंथम यांच्या जीवनावर आधारित आहे. मासिक पाळी हा आपल्याकडे गुप्ततेचा विषय, त्यामुळे त्या काळातील स्वच्छता ही तर दुर्लक्षिलेलीच बाब आहे. मात्र, याच विषयावर अक्षयचा चित्रपट भाष्य करणार असल्यामुळे त्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना निर्मित व आर. बाल्की दिग्दर्शित 'पॅडमॅन' हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले.
 
 

या आधी प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर अक्षय कुमार हातात 'पॅड'धरून उभा असल्याचे दिसून येते. हे पोस्टर शेअर करत अक्षयने लिहिलं की, ‘हे पॅड महिलांचं आयुर्मान दोन महिन्यांनी वाढवतं. ते कसं याचा शोध घेण्यासाठी तुम्हाला पाहावा लागणार ‘पॅडमॅन’. नेहमीच ग्लॅमरस आणि हॉट साकारणाऱ्या राधिकाला ये चित्रपटातून एक वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. राधिका सोबतच यामध्ये सोनम कपूरही आपल्याला पाहायला मिळेल.