ध्यास प्लास्टिकमुक्तीचा
 महा एमटीबी  13-Dec-2017

सहयोग सामाजिक संस्था

 
 
 
२००५ च्या प्रलयंकारी महापुराला कारणीभूत असलेल्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र कालांतराने ही बंदी कागदावरच राहिली. त्याचपाठोपाठ ही बंदी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने करण्यात आली व कालांतराने ही बंदीसुद्धा कागदावरच राहिली. मात्र कल्याण पूर्वेतील विजय भोसले यांच्या सहयोग सामाजिक संस्थेने या कामी पुढाकार घेत ’प्लास्टिकमुक्तीचा’ ध्यास घेतला आहे. गेली ९ वर्षे विविध क्षेत्रांत काम करणार्‍या या संघटनेच्या वतीने गेल्या वर्षीपासून ५० मायक्रॉनपेक्षा खालील प्लास्टिक विकत घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. २००८ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या वतीने गरीब मुलांना स्वेटर वाटप करणे, त्यांचे अनाथ आश्रमाच्या माध्यमातून संगोपन करणे असे अद्यावत उपक्रम राबवले जातात. याचबरोबर भोसले यांच्या सहकार्‍यांनी गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर २०१६ पासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तसेच थर्माकोल जे भंगारवाला घेत नाही, ते १० रु. किमतीने दर रविवारी विकत घेतले जाते. यात गेल्या वर्षभरात ४ हजार ५० किलो प्लास्टिक व थर्माकोल गोळा करण्यात आले आहे. याचबरोबर कचरा उचलण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर तेथे जाऊन कचरा उचलण्याचाही प्रयत्न या संस्थेच्या वतीने केला जातो.
 
गेल्या वर्षी केडीएमसीच्या वतीने नवीन बांधकामांना ’रेनवॉटर हार्वेस्टिंग’ ही संकल्पना बंधनकारक करण्यात आली पण या संकल्पनेपासून वंचित महापालिका कार्यालये तसेच शाळांमध्ये सहयोग सामजिक संस्थेच्या वतीने रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम करण्यात आले. या संस्थेच्या वतीने कचरा विकत घेण्याच्या उपक्रमाला नागरिकांच्या वतीने ही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील किशोरी शहाणे, पूजा सावंत, स्मिता तांबे, सुशांत शेलार यांनी पाठिंबा दिला होता.
 
तसेच प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर राज्यातील आयात आणि निर्यातीवर बंदी आणण्याबाबत विनंती करणारा ठराव महासभेत मंजूर करून तो राज्य सरकारला पाठवून द्या, अशी मागणीही संस्थेच्या वतीने महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. संस्थेने खत प्रकल्प हाती घेतला असून महापालिकेच्या क प्रभागक्षेत्र कार्यलयाच्या पाठीमागे तसेच १०० फुटी हाजीमलंग रोडवर याचे काम सुरू आहे.
 
संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले म्हणताात की, ’’एक प्लास्टिकची कॅरीबॅग तयार करायला ०.१४ सेकंद लागतात आणि ती नष्ट करायला १४ हजार वर्षे. एकदा वापरून फेकलेल्या बॅगवर धूळ माती बसून ज़र ती जमिनीखाली दाबली गेली तर वरून पडलेले पाणी हजारो वर्ष ती जमिनीत झिरपू देत नाही आणि तेथील जमीन नापीक होते. तर विचार करा, आपण सगळे दिवसातून किती कॅरी बॅग्ज वापरतो आणि किती पर्यावरणाचे नुकसान करतोय. खरंच कॅरीबॅगची आवश्यकता आहे का? फक्त एक गोष्ट करा, कायम घराबाहेर जाताना आपल्या ऑफिस बॅग/ गाडीच्या डिकीत/ खिशात/ पर्समध्ये एक कापडी पिशवी ठेवा आणि बघा आपल्याला कॅरीबॅगची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे हे काम हाती घेण्याचा संस्थेचा मानस आले.’’
 
कचरा व्यवस्थापनाच्या कामात कसे आलात? या प्रश्‍नाला उत्तर देताना विजय म्हणाले, ’’मी माझ्या मित्रांसमवेत सिंगापूरला गेले होते. तिथे जहाजातून बेटावर फिरायला गेलो असताना एका मित्राने प्लास्टिक थाळी पाण्यात फेकली. यावर एका महिलेकडून ’असे करू नका’, असे सांगण्यात आले पण याकडे माझ्या मित्राच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आले व त्याने सर्व मित्रांकडील प्लास्टिक थाळ्या गोळ्या करून परत तिथेच टाकल्या. ते पाहताच त्या महिलेने ’इंडिया इज नाईस कंट्री बट इंडियन पीपल आर व्हेरी बॅड’, असे म्हणत आमचा अपमान केला. त्यामुळे आम्हाला हा प्रश्‍न पडला की आपण एवढे वाईट आहोत का ? त्यात इथे येताच सर्वत्र पसरलेला कचरा पाहून आम्हाला याबद्दल काहीतरी करणे गरजेचे आहे असे वाटले आणि आम्ही शनिवार, रविवारी दूरध्वनीवरून फोन केल्यास घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतला.’’
 
असो, संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली असता जमा झालेला हा कचरा पाहताच यात सर्वाधिक प्रमाण हे प्लास्टिकचे असल्याचे आढळून आल्याने संस्थेने त्यावर काम करण्याचे योजिले. त्यानंतर पंतप्रधानांच्या ’स्वच्छ भारत अभियाना’ने प्रेरित होऊन या फुकट मिळणार्‍या प्लास्टिकला विकत घेण्याचे ठरवले. कारण ज्याला किंमत नसते तेच फेकले जाते आणि ज्याला किंमत असते ते जपून ठेवले जाते हे संस्थेच्या लक्षात आले. या उपक्रमासाठी संस्था कोणत्याही सामाजिक तसेच राजकीय संस्थेकडून पाठिंबा घेत नाही तर यासाठी लागणारा पैसा हा संस्थेच्या सदस्यांकडूनच उभा केला जातो. यात नागरिकांकडून कमी अधिक स्वरूपात सहकार्य मिळते पण जास्तीत जास्त माल हा भंगारवाल्याकडून आणून दिला जातो. दर रविवारी गोळा करण्यात आलेले प्लास्टिक महापालिकेच्या गाडीत भरून ’ऊर्जा फाऊंडेशन’ संस्थेकडे सुपूर्द केले जाते व त्यानंतर हे प्लास्टिक रिसायकल करण्यासाठी पाठवले जाते.
रोशनी खोत