खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...!
 महा एमटीबी  12-Dec-2017

 
खुल्लम-खुल्ला प्यार करेंगे हम दोनों
इस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनों
प्यार हम करते हैं चोरी नहीं
मिल गए दिल ज़ोरा-ज़ोरी नहीं
हम वो करेंगे दिल जो करे
हमको ज़माने से क्या
खुल्लम-खुल्ला प्यार …
 
अगदी चित्रपटात शोभून दिसेल अशा पद्धतीचं लग्न काल इटलीमध्ये झालं. या जोडप्याने गेल्या चार वर्षात प्रेम अगदी खुल्लम खुल्ला केलं, पण लग्न मात्र कमालीची गुप्तता पाळून झालं. ही गुप्तता का पाळली याची अनेक कारणं आहेत, त्यातली काही वैध असतील काही अवैध ठरतील. पण या सगळ्या पेक्षाही या दोघांचं लग्न तमाम भारतीयांनी सोशल मीडियावरून अनुभवल आणि तेही केवळ दोन छायाचित्रातून. काल म्हणजेच ११ डिसेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास अनुष्का शर्मा व विराट कोहली या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृतरित्या लग्न झाल्याचे जाहीर करून दोन छायाचित्र प्रसिद्ध केली. त्या दोघांचा रॉयल पोशाख, ज्या रिसॉर्टमध्ये हे लग्न झालं तिथली नयनरम्य सजावट आणि विशेष म्हणजे इटलीत जाऊन भारतीय पद्धतीने केलेला विवाह या सगळ्याच गोष्टी सर्व भारतीयांना खुश करून गेल्या.
 
 
 
असं म्हणतात की, विराट अनुष्का २०१३ साली एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने भेटले. त्यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हे जोडपे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. अनेकदा अनुष्का विराटच्या परदेशी दौऱ्यांमध्ये समाविष्ट झाली होती तर बऱ्याच वेळा विराट अनुष्काच्या पेज-३ पार्ट्यांमध्ये तिचा बॉयफ्रेंड म्हणून वावरला होता. दोघांचे फॅन फॉलोईंग प्रचंड असल्याने अल्पावधीतच ही जोडी 'हिट' झाली. बेधडक, बिनधास्त, पण तितकाच मर्यादित प्रेम त्यांनी त्यांच्या पिढीसमोर ठेवलं. मैदानात शतक ठोकेल्यावर अनुष्काच्या दिशेने बॅट दाखवून तिला फ्लाइंग किस देणार विराटही आपण बघितलाय आणि त्याच्या खराब खेळाचा दोष अनुष्काला दिल्यानंतर संयमानी माध्यमांना सामोरा जाणारा विराटही आपण पाहिलाय.
 
मध्यंतरीचा काळ या दोघांच्या प्रेमाची सत्वपरीक्षा पाहणारच होता. विराटचा खेळ सातत्याने घसरत चालला होता आणि दुसरीकडे प्रेम अधिक जवळ येत गेलं. या काळात त्यांनी 'खुल्लम खुल्ला' प्रेमाचा फॉर्मुला थोडा बाजूला सारत आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. अनुष्काच्या 'सुलतान'ला मोठं यश मिळालं तर दुसरीकडे विराटचा खेळही बहरू लागला. पण मधल्या परीक्षेच्या काळात दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. बऱ्याचदा अशा कारणांमुळे 'सेलिब्रेटी कपल'चे ब्रेकअप झाल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. पण विराट अनुष्का यातून तावून -सुलाखून बाहेर पडले. गेल्या काही महिन्यात विराटकडे भारतीय क्रिकेट टीमची धुरा सोपविण्यात आली. ती जबाबदारी अगदी कालपर्यंत त्याने उत्कृष्टरित्या पार पडून दाखविली. त्याच्या खेळातून त्याने या दोघांच्या संबंधावर भाष्य करणाऱ्यांचे तोंड बंद केले.
 
 
 
गेल्या नोव्हेंबर महिन्यात युवराज सिंगच्या लग्नात हे जोडपे एकत्र वावरले. त्याआधीही ते अनेक ठिकाणी एकत्र गेल्याची चर्चा होतीच पण या दृष्ट लागावी अश्या या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चेला खरे उधाण आले ते सचिन तेंडुलकरच्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने. या सोहळ्याला विराट अनुष्काने एकत्र उपस्थिती लावली, ते एकत्रच माध्यमांशी बोलले आणि सर्व प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या झहीर-सागरिकाच्या रिसेप्शन पार्टीत अनुष्का-विराट बेधुंद होऊन नाचले. त्याचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला. एकूणच काय तर या दोघांनी प्रेम करताना किंवा ते व्यक्त करताना समाजाचा फार विचार केला नाही. त्यांना त्या वेळी जे करावंसं वाटलं ते त्यांनी केलं. हीच आजच्या पिढीची ओळख आहे. फक्त राहून राहून प्रश्न एकाच पडतो की एवढं खुल्लम खुल्ला प्रेम करणाऱ्या या दोघांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळून इटलीत जाऊन का लग्न केलं असेल...?

 
जसं प्रेम खुल्लम खुल्ला केलं तसं लग्नही केलं असतं तर कदाचित कालपासून जेवढं प्रेम त्यांना मिळालंय त्यापेक्षा कैकपटीने अधिक मिळालं असतं. पण असो, शेवटी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. एक मात्र नक्की आहे की, आजपर्यंत बॉलीवूड आणि क्रिकेट यामधली ही सर्वात 'हिट' आणि 'क्युट' जोडी आहे! God blessed you both!!!
 
- प्रथमेश नारविलकर