नागपूरला महाराष्ट्र व देशाची राजधानी बनवावे!
 महा एमटीबी  12-Dec-2017

जे नागपूर शहर पूर्वी सीपी अ‍ॅण्ड बेरार या राज्याच्या राजाधानीचे शहर होते, ते आज महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर आहे. देशातील हे एकमेव उदाहरण असावे. शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ ज्या शहराने राजधानीचा थाट अनुभवला, त्या शहराला नंतर दुय्यम राजधानीचा दर्जा मिळावा आणि या दुय्यम राजधानीकडे राज्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे दुर्लक्ष करावे, हे नागपूरकरांचे अन् नागपूर शहराचेही दुर्दैवच म्हटले पाहिजे. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी वसलेले शहर आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाचे हिरवेगार शहर आहे. या शहराला भूकंपाचा धोका नाही, या शहराला पुराचा धोका नाही, या शहराला कधी वादळाचा फटका बसला नाही, या शहराला शत्रुराष्ट्रांपासूनही धोका नाही. इथले हवामानही उत्तम आहे. उन्हाळ्यातले थोडे कडक ऊन सोडले, तर हे शहर सर्व दृष्टींनी उत्तम आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजधानीसाठी नागपूर शहराचा विचार झाल्यास ते फायदेशीरच ठरेल!

या मुद्यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. श्री श्री रविशंकर यांनीही मध्यंतरी हा विषय छेडला होता. नागपूरला देशाची राजधानी का बनविले पाहिजे, याच्या कारणांचीही चर्चा सध्या देशात अनेक ठिकाणी सुरू आहे. सध्या देशाची राजधानी दिल्ली आहे. दिल्लीत अतिशय घनदाट लोकसंख्या आहे. जवळपास तीन कोटी लोक दिल्लीत राहतात आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ट्रॅफिक जाम आणि प्रदूषण हा दिल्लीला भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना नुकताच दिल्लीत खेळला गेला. तो अनिर्णीत राहण्यात जशी अन्य कारणे होती, तसेच एक कारण प्रदूषण हेही होते. प्रदूषणाचा त्रास झाल्याने श्रीलंका संघातील खेळाडू चक्क तोंडाला मास्क लावून मैदानात उतरले होते. त्यावरून भारतीयांनी त्यांची फिरकीही घेतली. पण, वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दिल्लीत प्रदूषणाचा स्तर फार वाढला आहे. अधूनमधून दिल्लीला भूकंपाचे सौम्य धक्केही बसत असतात. शिवाय, दिल्ली, पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांनी घेरली आहे. यापैकी तीन राज्यांना लागून पाकिस्तानची सीमा आहे. सीमेपलीकडून सध्या भारताला असलेला धोका लक्षात घेता, दिल्लीलाही धोका आहेच. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीहून अन्यत्र हलविली पाहिजे, यात शंका नाही. यावर वरिष्ठ स्तरावर अतिशय गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

अमेरिकेतले सगळ्यात मोठे आणि गजबजलेले शहर न्यूयॉर्क हे आहे. पण, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन ही आहे. वॉशिंग्टनची लोकसंख्या कमी आहे. तिथे सर्व प्रकारच्या नागरी सुविधा आहेत. राजधानी म्हणून जे जे काही असायला हवे, ते सगळे तिथे आहे. संपूर्ण अमेरिकेच्या कारभारावर तिथून लक्ष ठेवता येणे त्यांना शक्य झाले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचेही आहे. सिडने हे सगळ्यात मोठे अन् गजबजलेले शहर असतानाही राजधानी मात्र कॅनबेरा ही आहे. आपल्या देशातही आंध्रप्रदेशची राजधानी आता अमरावती होत आहे. हे अमरावती आपले नव्हे, आंध्रप्रदेशातीलच आहे. वेगळे तेलंगणा राज्य झाल्यानंतर हैदराबाद हे तेलंगणा राज्याच्या राजधानीचे शहर झाले. त्यामुळे आंध्रप्रदेश सरकार आता अमरावती शहराचा राजधानी म्हणून विकास करीत आहे. माझ्याकडे जी माहिती आहे त्यावरून असे लक्षात येते की, अमरावती ही देशातील सगळ्यात उत्तम राजधानी असेल. त्याचप्रमाणे अहमदाबाद हे गुजरातमधील सगळ्यात महत्त्वाचे शहर आहे. पण, प्रशासकीय सोईच्या दृष्टीने गुजरातने गांधीनगरला राजधानीचे शहर बनविले आहे. आपल्या शेजारी छत्तीसगढ आहे. या राज्याची राजधानी रायपूर आहे. पण, आता तिथल्या सरकारने न्यू रायपूर सिटी विकसित केली आहे. विधानभवन, मंत्रालय, आमदार-मंत्र्यांची निवासस्थानं, सरकारी अधिकार्‍यांची निवासस्थानं, उत्तम रस्ते, इमारती अशी सगळी विकास कामं वेगाने तिथे सुरू आहेत. त्यामुळे सरकारला काम करता येणे सुलभ होणार आहे.
जी स्थिती आज आपल्या देशाच्या राजधानीची आहे, तीच स्थिती महाराष्ट्राच्या राजधानीची आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. संपूर्ण देशातून लोक मुंबईत येत असल्याने मुंबईवरचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवाय, मुंबईत पावसाळ्यात दरवर्षी अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण होते. वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे आणि तो दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. नागपूरहून मुंबईला विमानाने जायला जेवढा वेळ लागतो, त्याच्या दुप्पट वेळ तर विमानतळापासून मंत्रालयापर्यंत पोचायला लागतो! वेळ आणि पैसा या दोन्हींचा अपव्यय होतो. मुंबईचा विस्तार होण्यास भौगोलिक मर्यादा आहेत. प्रचंड लोकसंख्येमुळे मुंबईवरील ताण वाढतोच आहे. तिथेही प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. आता, कालपरवाच मुंबईत सगळीकडे धुकं होतं. दहा मीटरच्या पलीकडे अंधुक दिसत होतं. शिवाय, जेव्हा पाऊस आणि वादळाची स्थिती असते, तेव्हा मुंबईचं जनजीवन विसकळीत होते. हा नेहमीचा अनुभव आहे. या सगळ्या बाबी विचारात घेतल्यात, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईहून दुसरीकडे हलविणे गरजेचे आहे आणि नागपूरपेक्षा जास्त सुरक्षित आणि उत्तम शहर दुसरे दिसत नाही!

नागपूर हे शहर देशाच्या हृदयस्थानी असल्याने या शहराला विशेष महत्त्व आहे. नागपूर हे शहर सीपी अ‍ॅण्ड बेरार या राज्याच्या राजधानीचे शहर होते. शिवाय, नागपूरला आजच विधानभवन आहे, राजभवन आहे, मंत्र्यांसाठी लागणारे मोठे बंगले आहेत, आमदारांसाठी ५०० खोल्यांचे निवासस्थान आहे, नागपुरातील रस्त्यांचा विकास झपाट्याने होतो आहे, नागपूर मेट्रो रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे, नागपुरात २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे, विजेची कुठलीही समस्या नाही, देशातील दुसर्‍या क्रमांकाचे हिरवेगार शहर असल्याने प्रदूषण नाही. शिवाय, नागपूरचा विस्तार करण्यास भौगोलिक स्थिती चहुबाजूंनी अनुकूल आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद या देशातल्या प्रमुख शहरांना नागपूर शहर रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गे जोडले आहे. नागपूरहून चहुबाजूंनी चौपदरी रस्त्यांचे जाळे विणले गेले आहेे, विणले जात आहे. नागपूर विमानतळाचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारकडून पंधराशे कोटी रुपये मिळणार आहेत. आज नागपूरहून शारजाहला आणि कतारमधील दोहा इथे डायरेक्ट फ्लाईट आहे. नागपूरच्या आकाशातून आजच तीनशेपेक्षा जास्त विमानं पास होत असल्याने नागपूरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला सतर्क राहावे लागते. मिहान प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि विमानतळाचा विस्तार झाल्यानंतर सर्व दिशांनी आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू करता येणे अशक्य नाही. या सगळ्या बाबींचा विचार करून नागपूरला राज्याची आणि देशाचीही राजधानी म्हणून विकसित करायला हरकत नाही. 

नागपूरला बॉम्बे हायकोर्टाचे खंडपीठ आहे. भलेमोठे जिल्हा व सत्र न्यायालय आहे. राष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्था आहेत. आता ट्रिपल आयटी, आयआयएम, एम्स, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अशा मोठ्या संस्थांचे कामही प्रारंभ झाले आहे. ही सगळी परिस्थिती, नागपूरची भौगोलिक स्थिती आणि इतर बाबी लक्षात घेत नागपूरला महाराष्ट्राची आणि देशाची राजधानी करणे उपयुक्तच ठरेल. प्रशासकीय सोय म्हणून राजधानीसाठी नागपूरचा विचार झाला पाहिजे. बाकी मुंबईत जे उद्योग-व्यवसाय आहेत, ते तसेच कायम ठेवावेत. दिल्लीत सुप्रीम कोर्ट आणि अन्य व्यवस्था आहेत, त्या तशाच ठेवाव्यात. फक्त संसदभवन आणि अन्य सर्व प्रकारची कार्यालये तेवढी नागपूरला हलवावीत. हीच बाब मुंबईलाही लागू होते. पर्यावरण, बाह्य सुरक्षा, कॉस्मोपॉलिटन स्वरूप, जीवनशैली या बाबींचा विचार करता नागपूरचा राजधानीसाठी विचार होण्यास काहीच हरकत नसावी...
- डॉ. वाय. मोहितकुमार राव
९५४५८४७७९९