‘इमेज’च्या नावाखाली दडले व्यसन...
 महा एमटीबी  12-Dec-2017

‘इमेज’ या शब्दाला अलिकडच्या काळात जास्त महत्त्व आले आहे. समाजामध्ये, चार माणसांमध्ये आपली छबी, प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपले व्यक्तिमत्त्व कसं खुलून दिसेल, शोभून दिसेल याचा विचार केला जातो. मग यासाठी आपण सतत स्वतः मध्ये काही बदल करून घेतो, काही गोष्टी नव्याने शिकून घेतो. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मंडळींच्या सवयी, त्याचा ऍटिट्यूड आपल्याला आवडला तर मग आपण त्याचे अनुकरण करत असतो. अर्थात, बदलत्या काळानुसार स्वतः मध्ये काही बदल करून घ्यायलाच हवे, पण हे बदल करताना चांगले आणि वाईट यामधील फरक करता येणे हेही तितकेच गरजेचे आहे. अनेकदा काही सवयी चुकीच्या असल्या तरी त्या प्रतिष्ठेच्या आहेत, असं काही मंडळींना वाटत असतं. मग ही अशी खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी स्टेटस सिम्बॉल निर्माण करण्यासाठी अनेकदा चुकीची पावलं उचलली जातात. या सवयी घातक असल्या तरी त्याचे अनुकरण केले जाते. अशीच एक सवय पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी आत्मसात केली आहे, ती म्हणजे स्मोकिंग अर्थात ध्रूमपान...
 
 
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ५० टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण की त्यामुळे त्यांचा तणाव कमी होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच ‘स्मोकिंग’ केल्यामुळे मित्रांमध्ये ‘कूल इमेज’ तयार होते. स्मोकिंगमुळे दरवर्षी ७० लाख लोकांचा मृत्यू होतो. जगभरात २०१६ मध्ये झालेल्या ६४ लाख मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू स्मोकिंगमुळे झाले आहेत. भारत, चीन, रशिया आणि अमेरिकेत स्मोकिंगमुळे ५२.२ टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्मोकिंगमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ९० टक्के मृत्यू फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे होतात, तर १७ टक्के मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. सहा राज्यांमधील १,९०० शाळकरी विद्यार्थी या सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते. या सर्व्हेत सहभागी झालेल्या ७५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की, जेव्हा कधी त्यांचे मित्र सिगारेट पिण्यासाठी आग्रह करतात, तेव्हा त्यांना नकार देणं कठीण जातं. त्यामुळे ४६ टक्के विद्यार्थ्यांनी तर आपण मित्रांमध्ये ‘कूल’ दिसावे, यासाठी सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्याचे कबूल केले आहे. एवढेच नव्हे, तर या सर्वेक्षणानुसार, ५२ टक्के तरुणांनी धूम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते, असाही दावा केला आहे.
 
 
खरंतर वयाचा विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतर मित्र-मैत्रीण हे जास्त जवळचे वाटायला लागतात. त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणे, मजा-मस्ती करण्याबरोबरच मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या जातात. मग याच मित्र-मैत्रिणींसोबत राहून त्यांची संगत, सवयी नकळतपणे लागतात. तसेच या वयामध्ये चित्रपटाचे ‘ग्लॅमर’ जास्त खुणावत असते. चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्रींचे कपडे, त्याचे वागणं-बोलणं, त्यांच्या सवयी या जास्त आकर्षक वाटू लागतात. चित्रपट, मालिकांमध्ये धूम्रपान करण्याची दाखवली जाणारी दृश्ये तरुणांना जास्त आकर्षित करत असतात. मग निव्वळ त्याचे अनुकरण करण्यासाठी, त्याची ‘क्रेझ’ निर्माण झाल्याने सिगारेट हातात घेतली जाते आणि मग त्याचे सवयीमध्ये रूपांतर होते. मग हळूहळू सिगारेट म्हणजे रोजच्या सवयीमधला एक अविभाज्य घटक बनून जाते. सिगारेट हा डाएटिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पूर्वी लपून-छपून धूम्रपान करणाऱ्या मुली आता सर्रास धूम्रपान करू लागल्या आहेत. प्रत्येक नाक्यावर, कॉलेजच्याबाहेर, तर कधी गाडी चालवताना, पार्ट्यांमध्ये धूम्रपान करताना अनेक तरुण-तरुणी दिसतात. सिगारेटमुळे भूक मरते आणि डाएटिंग करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात तर सिगारेट ओढणे, हे कूल समजले जाते. पार्टीजमध्ये सिगारेट, दारू ही तुम्ही किती फॉरवर्ड आहात, याचं लक्षणं मानलं जातं. धूम्रपान ही हल्ली ‘फॅशन’ बनली आहे. परंतु, अनुकरणातून लागलेली ही सवय अतिशय धोकादायक आहे. धूम्रपान केल्याने आजपर्यंत कोणाचेही भले झालेले नाही आणि भविष्यात ते कधीच होणार नाही. काही तरी नवीन करायचे, सर्व काही ट्राय करायचे, असा काहीसा विचार आजची जनरेशन करू लागली आहे. केवळ कुतूहलापोटी प्यायलेली पहिली सिगारेट नंतर आयुष्याची सोबती बनून जाते. क्षणिक सुखासाठी अनेकदा आयुष्यभराच्या आजाराला यामुळे बळी पडावे लागते. मग सिगारेटचे ‘फॅड’ हळूहळू नशा बनत जाते आणि कितीही वाटलं तरीही ती सवय सोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याबरोबरच धीर धरणे गरजेचे आहे. आणि यामध्ये काही जणांना यश आले आहे. सोडता येत नाही, पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत का? जरुर प्रयत्न कर यात यश मिळविलेले देखील भरपूर तरुण-तरुणी आहेत. सिगारेट व विडी ओढण्याने ते व्यसन असणार्‍यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम तर होतोच पण त्याचबरोबर आजूबाजूला वावरणार्‍या काही व्यक्तींना त्याचा त्रास भोगावा लागतो.
 
पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या कारणांसाठी व्यसन असल्याचे अभ्यासाने सिद्ध झाले आहे. पुरुष अनेक वेळा धूम्रपान एक सवय किंवा बाह्यरूपाची सकारात्मक संवेदना दर्शवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी धूम्रपान करतात. तर याउलट बहुतांश स्त्रिया ’स्टेटस’ जपण्यासाठी सिगारेट ओढतात, परंतु धूम्रपान करणार्‍या स्त्रिया, तरुणी त्यातही बहुतांश तरुणी नकारात्मक भावनेविरुद्ध प्रतिबंधात्मक म्हणून (बफर) धूम्रपान करतात. तसेच सर्व्हेक्षणातून असे ही दिसून आले की, ५६ टक्के पुरुष हे आपल्या मित्रांसोबत असताना किंवा प्रवासात सिगारेट पितात. त्या तुलनेत ४८ टक्केच स्त्रिया घराबाहेर सिगारेट ओढतात. विशेषतः काही महिला गरोदरपणाच्या काळात सिगारेट ओढतात. परंतु या गरोदरपणाच्या काळात ओढलेल्या सिगारेटमुळे त्या स्त्रियांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच पण त्याचबरोबर त्याचा परिणाम पोटात वाढणार्‍या गर्भावर होत असतो. गरोदरपणाच्या काळात अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात. मग अशा वेळेत कोणत्याही ताणामुळे मन अस्वस्थ झाल्यास काही महिला धूम्रपान करताना दिसतात. आज शारीरिक आरोग्याच्या तक्रारींबरोबरच अनेक मानसिक आजारांनी डोके वर काढले आहे. बदलती जीवनशैली, ताण-तणाव, नात्यांमधल्या तणावामुळे अनेकदा मनावर दडपण येते. अशा मनस्थितीमध्ये खरंतर योग्य सल्ल्याची तसेच मानसिक आधाराची गरज असते, परंतु तो सहसा मिळत नसल्याने अनेकदा सिगारेट, अमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्या परिस्थितीमध्ये अशा व्यक्तींना ताण हलका करण्यासाठी त्यावर उपाय करण्यासाठी धूम्रपान करणे, दारू पिणे हे पर्याय योग्य वाटत असतात. धूम्रपानामुळे कर्करोग, हृदयरोग आणि फुप्फुसाचा रोग यांसारखे असंसर्गजन्य रोग होतात हे बहुधा सगळ्यांनाच माहीत आहे पण, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते धूम्रपानामुळे क्षयरोगासारखे संसर्गजन्य रोगदेखील जडू शकतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ शकतो. धूम्रपान केल्याने शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. याला तुमचे कामजीवनही अपवाद असू शकत नाही. सिगारेटमध्ये असलेल्या घातक रसायनांचा शरीरावर परिणाम झालेला असला तरी त्याची शरीराला एक प्रकारची सवय लागलेली असते.त्यामुळे ती पूर्ण झाली नाही की काही बदल जाणवू लागतात. त्यामुळे या वाईट सवयी सहसा लवकर सुटत नाहीत. त्याला बराच वेळ द्यावा लागतो. सर्वेक्षणामध्ये असेही दिसून आले आहे की, धूम्रपान करणार्‍यांपैकी ९० टक्के लोकांना ते सोडायचे असते पण त्यांना ते फारच कठीण वाटते. सिगारेटची सवय सोडताना त्या व्यक्तींमध्ये आढळणार्‍या लक्षणांमध्ये अस्वस्थता, चिडचिड, डोकेदुखी, आतड्यातील व्यवधाने, वाढत्या प्रमाणातील झोपेतून जाग येणे, असहनशीलता, गोंधळ आणि एकाग्रता साधण्यातील अडचणी येत असतात.मार्गदर्शनपर ध्यानधारणा, शास्त्रीय ध्यानधारणा, एकाग्रता वर्ग, प्राणायाम, योग यांच्याबरोबर किंबहुना सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक आधार, मदत. जेव्हा जेव्हा या व्यक्तींना ती गोष्ट घेण्याची तल्लफ येते तेव्हा तेव्हा घरच्या कुणी किंवा मित्रमैत्रिणींनी जर त्यांना ते करण्यापासून परावृत्त केलं, त्यांना समजून घेत मदत केली तर ही माणसं नक्कीच या व्यसनातून बाहेर पडू शकतील, असे येवढं मात्र नक्की.
 
 
धूम्रपान कमी करण्यासाठी केली शक्कल
 
तरुण-तरुणींबरोबरच छोट्या ऑफिसपासून थेट मोठमोठया कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारीवर्ग धूम्रपान करताना दिसतो. धूम्रपान केल्याने कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच पण त्याचबरोबर त्याच्या वर्तणुकीवर तसेच कामावरही परिणाम होऊ लागला आहे. ही बाब गंभीर असल्याने जपानमधील एका कंपनीने अनोखा नियम तयार केला आहे. धूम्रपान न करणार्‍या कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांना वर्षात सहा दिवसांची अतिरिक्त सुटी दिली जात आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, स्मोकिंग करणारे कर्मचारी दिवसातून अनेकदा ब्रेक घेतात. आपले कार्यालय २९ व्या मजल्यावर आहे. कर्मचारी तेथून तळघरात तयार केलेल्या स्मोकिंग झोनमध्ये जातात आणि सिगारेट पिऊन परत येतात. एक स्मोकिंग ब्रेक किमान १५ मिनिटांचा असतो. दिवसभरात किमान पाच ब्रेक होतात. या हिशोबाने जे धूम्रपान करत नाहीत, ते धूम्रपान करणार्‍यापेक्षा जास्त वेळेपर्यंत काम करतात. त्यामुळे धूम्रपान न करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी एका वर्षात सहा दिवस अतिरिक्त सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
- सोनाली रासकर